सायबर सिक्युरिटी : पार्सल, कुरिअरचे मायाजाल

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 14 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अलीकडे कस्टममधून किंवा पोलिसांकडून फोन असल्याचे भासवून भरभक्कम रक्कम लुबाडल्या जाण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अनेक लोकांना मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन येतो. "आम्ही मुंबईतून कुरिअर कंपनीमधून बोलत आहोत. आपल्या नावावर एक आंतरराष्ट्रीय पार्सल आले आहे, कस्टमद्वारे ते तपासण्यात (intercept) आले असून, त्यात अमली पदार्थ आहेत किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आहेत. चौकशी करणे आवश्यक असल्याने तुम्हाला सूचना देण्याकरिता फोन केला आहे," असे सांगितले जाते. त्यावर तुम्ही, अशा कोणत्याही पार्सलबाबत माहीत नाही, असे म्हटले तर तत्काळ ती व्यक्ती तुम्हाला मदत करण्याची तयारी दर्शवत, 'स्काईप'च्या (skype) माध्यमातून पोलिस स्टेशनला फोन जोडून देतो, असे सांगते. पोलिसांचे नाव घेतल्यावर आपल्यासारखी कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती घावरून जाते. याच मनःस्थितीचा फायदा घेऊन समोरची व्यक्ती आणखी दबाव आणण्यास सुरुवात करते.

'स्काईप'च्या माध्यमातून व्हिडिओ कॉल सुरू होतो, पोलिसांच्या गणवेशातील एक अधिकारी आधार कार्ड नंबर तपासणीसाठी मागतो. तो दिल्यानंतर या आधार कार्ड नंबरशी निगडित परदेशी चलनातील काही कोटींचा आणखी एक गुन्हा आहे, असे तो सांगतो आणि त्वरित रिझर्व्ह बँकेच्या तोतया अधिकाऱ्याची विंडो ओपन करतो. या गुन्ह्यातून वाचायचे असेल, तर जामीन घेण्यासाठी तत्काळ एक रक्कम भरा, असे तो अधिकारी सांगतो. त्यावर विश्वास ठेवून आपण त्यांनी सांगितलेल्या खात्यात पैसे भरले, की सर्वजण गायब होतात आणि हा 'ट्रॅप' होता, असे लक्षात येते.

अशी घ्या काळजी...

■ आपले कोणीतरी परदेशी असेल, तर आपण यात अलगद अडकू शकतो. कारण आपल्या ओळखीच्या व्यक्तीने काहीतरी पाठवले असेल, अशी आपली धारणा होते. त्यामुळे अशा परदेशस्थ व्यक्तीचा हवाला देत फोन आला, तर आधी त्या व्यक्तीला फोन करून खात्री करून घेतो, असे उत्तर द्या.

■ भारतात अशी घटना झालीच, तर फोन, व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावर त्याची तपास करण्याची पद्धत नाही, हे लक्षात ठेवा.

■ आपल्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात असेल, तर त्याची नोटीस सही, शिक्क्यासह समक्ष येते. त्यावर आपण वकील नेमू शकतो. प्रत्यक्षात त्या अधिकाऱ्याकडे म्हणणे मांडू शकतो.

■ ताबडतोब ऑनलाइन पैसे भरा, असा आग्रह केला जात असेल, तर काहीतरी गडबड आहे, हे नक्की समजा.

■ अशा वेळी न घाबरता संपूर्ण माहिती घ्या आणि योग्य व्यक्तीशी बोला. काहीही झाले, तरी पैसे ट्रान्स्फर करायचे नाहीत.

समजा, पैसे पाठवले गेले तर...

https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

https://sancharsaathi.gov. in या साईटला भेट द्या. त्यावर मार्गदर्शक माहिती मिळेल.

त्वरित १९३० किंवा १५५२६० या नंबरवर संपर्क साधा. या नंबरवरची यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करेल. या नंबरवर फोन करण्याआधी पैसे ट्रान्स्फर केल्याच्या व्यवहाराचा बँकेतून आलेला संदर्भ क्रमांक (Transaction ID) पोलिसांना लागेल, तो तयार असू द्या. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने तत्काळ कारवाई होऊ शकते.

सायबर गुन्ह्यांची ३९० प्रकरणे
इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या अहवालानुसार, जानेवारी २४ आणि फेब्रुवारी २४ मध्ये अशी ३९० प्रकरणे नोंदवली गेली असून, त्यात चोरट्यांनी कोट्यवधी रुपये लुबाडले आहेत.