मध्ययुगीन काळात हैदराबादमध्ये ‘असा’ साजरा व्हायचा रमजान

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 21 d ago
चारमिनार
चारमिनार

 

सय्यद शाह वाएज
 
 
रमजान ईद हा मुस्लीम समाजातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. ज्याप्रमाणे मुस्लिमांमध्ये मोहर्रमशी निगडीत संस्कृती व त्याचा इतिहास आढळतो, त्याचपध्दतीने रमजान सणाचेही ऐतिहासिक संदर्भ सापडतात. रमजानच्या इतिहासाचा दोन-तीन टप्प्यात विचार करता येऊ शकतो. तुर्कांच्या आगमनानंतरच्या दिल्ली आणि परिसरातील रमजानच्या सांस्कृतिक खाणाखूणा, कालांतराने आग्रा, अलीगढ व लखनऊ परिसरात मुस्लिमांची लोकसंख्या वाढीस लागल्यानंतर या परिसरात निर्माण झालेल्या रमजान ईदच्या परंपरा आणि संस्कृती आणि मुसलमान राज्यकर्त्यांनी दखनेत पाऊल ठेवल्यानंतर हैदराबादमध्ये रमजान ईदच्या संदर्भात पडत गेलेले नवनवे पायंडे हे तीन टप्पे. हैदराबादच्या प्रभावातच पुढे औरंगाबाद, गुलबर्गा या शहरांमध्ये रमजानची उपप्रादेशिक संस्कृती निर्माण झाली. आपण या लेखात रमजानच्या हैदराबादी संस्कृतीचा इतिहास समजून घेऊयात. 

कुतूबशाही काळातील ईद
कुतूबशाही काळात रमजानचा चंद्र दिसल्यानंतर विविध उपक्रमांना सुरुवात व्हायची. रमजानच्या महिन्यात नित्योपचारही बदलायचे. दरबारातल्या कामकाजाच्या वेळा, दौरे, युध्दमोहीमा सर्वकाही या काळात थांबवल्या जात. दरबारी रसिकतेच्या मैफली बंद केल्या जात. चंद्रदर्शनानंतर रमजानच्या पहिल्याच दिवशी दारुचे अड्डे बंद केले जात. शाही महालातील अनेक गोष्टींवर चंद्रदर्शनानंतर बंदी आणली जात होती. मोहम्मद कुली कुतूबशाह स्वतः दारु प्यायचा. दारुचा शौकीन म्हणून त्याची इतिहासात ओळख आहे. पण रमजान महिन्यात तो दारु पिणे बंद करत असे. त्यामुळे शाही महालातील अनेक व्यक्तींना दारु आणि नृत्याच्या मैफीली बंद कराव्या लागत. कुली कुतूबशाह हा लोकप्रिय कवी होता. त्याने मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर अनेक मर्सिये लिहीले आहेत. त्याच पध्दतीने त्याने रमजान ईदविषयी तब्बल अकरा कवितांमध्ये चर्चा केली आहे. त्याने ईदवर एक स्वतंत्र अशी दिर्घ कविताही लिहिली आहे. त्याच्या एका लोकप्रिय कवितेत तो म्हणतो, 

“ईद ए सुंई लियां खुशीयां आनंद 
इस आनंद अन्सोकरी खुबां आनंद ”

(शेवयाची ईद आनंद घेऊन आली आहे. या आनंदात अनेकांना सामवून घेतेले जाते. ईदच्या पार्श्वभूमीवर आपल्या मित्र आप्तेष्टांना घरी बोलावून मेजवान्या दिल्या जायच्या त्याचा उल्लेखही कुली कुतूबशाहने कवितेत केला आहे.) 
 
ईदच्या या वैशिष्ट्यांसह अल्लाहच्या नामजपाचा उल्लेखही कुलीने त्याच्या कवितांमध्ये केला आहे. कुली हा प्रेमकवी होता. त्यामुळे अमीर खुसरो ज्यापध्दतीने आपल्या प्रेमकवितांची रचना अल्लाहवरील प्रिती जाहीर करण्यासाठी करत त्याचपध्दतीच्या कविता लिहिण्याचा प्रयत्न कुली कुतूबशाहने केला आहे. कुलीच्या कवितांव्यतिरक्त ईदच्या अनेक नोंदी हैदराबादच्या इतिहासामध्ये कुतूबशाही ईदच्या संदर्भाने आढळतात. 

ईदच्या दिवशी बादशाह दानधर्म करीत असत. शिवाय शाही जुलुसने ईदगाहच्या दिशेने शाही खानदान कशापध्दतीने जात असे, याचीही वर्णने आढळतात. कुतूबशाहीच्यानंतर हैदराबादमध्ये आसिफजाही घराण्याची सत्ता स्थापन झाली. या काळातही ईदला एक विशेष परंपरा होती.  

आसिफजाही काळातील ईद 
आसिफजाही काळात चंद्रदर्शनानंतर रमजानच्या तरावीहच्या विशेष नमाजची व्यवस्था केली जात होती. नमाजसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जात. काही ठिकाणी फक्त रमजानच्या काळात सामुहिक नमाजपठणासाठी मोठमोठे मांडव टाकून व्यवस्था केली जात असे. आसिफजाही काळात इफ्तारच्या कार्यक्रमांना खूप महत्त्व होते. जहागीरदार, वेगवेगळे सरदार, पायगाहचे (जिल्ह्याचे) प्रमुख आधिकारी मस्जिदींमध्ये इफ्तारसाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून पाठवत असत. आसिफजाहीमध्ये ‘उमूर ए मजहबी’ या नावाने धार्मिक बाबींचे कामकाज पाहणारा विभाग होता. या विभागाचे प्रमुख म्हणून मौलवी अन्वारुल्लाह फजीलतजंग हे होते. त्यांनी रमजानच्या काळात खाण्यापिण्याचे पदार्थ विकणारी दुकाने आणि सराय, हॉटेलवर दिवसा उपवासाच्या काळात पडदे लावण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केला जात असे. आसिफजाही काळातील या आदेशाचा परिणाम आजही पाहायला मिळतो. परंपरेने आजही हॉटेल मालक अशा पध्दतीचे पडदे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लावतात. 

रमाजनच्या ईदची तयारी हिजरी कॅलेंडरच्या शाबान या रमजानच्या महिन्यापुर्वी येणाऱ्या महिन्यापासून सुरु केली जात असे. त्याकाळात कपड्यांची दुकाने ही फक्त लाडबाजार परिसरात होती. पत्थरगट्टीमध्ये काही मोजकी दुकाने होती. त्याकाळात हाजी जियाअली साहेबांचा अपवाद वगळता इतर मसाल्याची, कपड्यांची दुकाने ही हिंदू व्यापाऱ्यांचीच होती. ही दुकाने सकाळपासून रात्रीपर्यंत उघडी ठेवली जात. या काळात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असे. रमजानच्या काळात सुगंधी मसाले, अत्तर, टोप्यांची दुकाने, खाद्यपदार्थांची विक्री, अन्नधान्यांच्या दुकांनांची विक्री इतर महिन्यांपेक्षा दुप्पटीने होत असे. काही व्यापारी या काळात पाच ते सहा लाख रुपयांची विक्री करत होते, अशाही नोंदी आढळतात. रमजानच्या शेवटच्या आठवड्यात तर कपडे शिवणाऱ्या शिंप्यांची दुकाने रमजानमध्ये रात्रभर उघडी ठेवली जात होती.

चंद्रदर्शन व ईदची नमाज
महिनाभर रोजे राहिल्यानंतर ईदच्या चंद्रदर्शनाची प्रतिक्षा केली जात असे. बिदर हे हैदराबादपासून ८० मैल अंतरावरचे शहर. जमीनीपासून बऱ्यापैकी उंचवट्यावर असल्यामुळे हे शहर चंद्रदर्शनासाठी प्रसिध्द होते. शहरातील काही बुरुजांवर चंद्र पाहण्यासाठी विशेष व्यवस्था केली जात असे. चंद्र पाहिल्यानंतर एक आधिकारी हैदराबादला रवाना होत असे. तो रात्रीच्यावेळी हैदराबादला पोहोचत असे. त्यांनंतर दवंडी देऊन ईदची घोषणा केली जात असे. घोषणेनंतर महिला मिठाई, खीर, शिरखुर्मा बनवण्याच्या तयारी लागत असत. ईदच्या चंद्रदर्शनाच्या एक दिवस आधी शहरातील गवळी दुध साठवून ठेऊन ते चंद्रदर्शनाच्या रात्री विक्रीसाठी उपलब्ध करत. सामान्य काळापेक्षा ईदच्यावेळी दुधाचे दर वाढवले जात. एक रुपयाला दोन ते अडीच शेर दुध विकले जात असे. दुधविक्रीसाठीदेखील शासनाकडून काही खास उपाययोजना केल्या जात होत्या. 

शासनाकडून ईदच्या नमाजची व्यवस्था केली जात असे. शहराचे कोतवाल पोलीसांच्या लवाजम्यासह जुलूस घेऊन ईदगाहकडे येत. कोतवाल हत्तीवर स्वार होत. त्यांच्याशिवाय शहराचे काजी, मस्जिदचे खतीब आणि ईदगाहचे इमामदेखील हत्तीवर येत असत. ईद उल फित्रच्या नमाजवेळी ईदगाहमध्ये पंधरा ते वीस हजारांचा जमाव असे. ईदच्या दुसऱ्या खुतब्यात खतीब (खुतबा पठण करणारे) आला हजरत (हैदराबाद राजवटीचे निजाम) यांचे नाव घेत. त्यानंतर त्यांच्यासाठी विशेष दुआ पठण केली जात असे. यावेळी सरिश्ता ए मजहबी उमूर विभागाकडे विशेष खिलअत (राजवस्त्रे) प्रदान केली जात असे. 

ईदच्या नमाजनंतर २१ तोफांची सलामी दिली जात असे. सलामीनंतर शासकीय आधिकारी व सरदार जात. त्यानंतर सामान्य नागरीक जुलूसमध्ये सहभागी होऊन आपआपल्या घरी परतत. शासकीय आधिकारी निजामांच्या महालावर जाऊन ईदचा नजराणा सादर करत त्यानंतर आपल्या घरी परतत. ईदच्या दिवशी राजमहालावर वेगवेगळ्या मेजवान्यांचे आयोजन केले जात असे. ईदच्या दिवशी राजमहालातून शहरातील प्रतिष्ठातांना भेटवस्तू पाठवल्या जात. शाही मेजवान्या ईदच्यानंतर दोन ते दिवस चालत असत. शहरातील अनेक घरांमध्येही अशा मेजवान्या होत. ज्यांचे नव्याने विवाह झाले आहेत, त्या वधू वरांना अनेक प्लेटमध्ये वेगवेगळ्या मिठाया खायला दिल्या जात. 

ईद मिलनचे आयोजन
ईदनंतर शासनाकडून ईदमिलनचे आयोजन केले जात असे. या ईद मिलनमध्ये मुसलमान आधिकाऱ्यांसोबतच हिंदू आधिकाऱ्यांचाही सन्मान केला जात असे. राजा मुरली मनोहर हे सद्र ए मुहासिब (मुख्य हिशोबनीस), राजा फतेहनवाबसाहेब, हायकोर्टाचे जज रघुनाथप्रसाद यांच्याकडे जे मुसलमान नोकर होते ते त्यांच्या भेटीसाठी येत. त्यानंतर पानसुपारीचा कार्यक्रम होत असे. हिंदू आधिकाऱ्यांकडे मुसलमानांसोबतच हिंदूही येत असत, त्यामुळे ही ईद सर्वधर्मीय सोहळा बनत असे. ईदच्यावेळी जवळपास चार दिवस सुट्टी असायची. ईदच्या आधी शब ए कद्र (प्रार्थनेच्या बड्या रात्री) च्या सुट्ट्या वेगळ्या दिल्या जात. ईदच्या दिवशी व त्यानंतर आठ दिवस नौबतवाले, रौशनचौकीवाले (चौकात दिवे लावणारे) आणि नर्तकी जहागीरदार आणि आधिकाऱ्यांच्या घरी ईदी घेण्यासाठी जात असत. 

हैदराबाद शहराचे शासकीय व्यवस्थापन करणाऱ्या आधिकाऱ्यांकडे काही विशेष जबाबदाऱ्यादेखील दिल्या जात. पोलीस दलाकडून संचलन केले जाई. सांस्कृतिक विभागाकडून मुशायरे, संगीताच्या मैफीलींचे आयोजन केले जात असे. निजामशाही राजवट १९४८ मध्ये भारतीय संघराज्यात विलीन झाल्यानंतर ईदच्या शासकीय आयोजनात बदल करण्यात आले. आजही त्याकाळातील काही सुविधा दिल्या जातात. परंपरांच्या बाबतीत हैदराबादेत आजही अनेक मध्ययुगीन परंपरा पाहायला मिळतात. रमजान ईदच्या अशा अनेक नोंदी हैदराबादच्या इतिहासात आढळतात.
 
-सय्यद शाह वाएज

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter