'अपघात' हा केवळ एक शब्द उच्चारला तरी काळजात धस्स होते. मग प्रत्यक्ष अपघात स्थितीला सामोरे जाण्याची कल्पनाच न केलेली बरी. अर्थात कितीही नको म्हटले, तरी अपघाताच्या छोट्या, मोठ्या घटना या सातत्याने होतच असतात. अपघातामुळे एका क्षणात होत्याचे नव्हते घडते. प्रियजनांना गमावून आयुष्यभराचे दुःख उराशी वागविण्याची वेळ कुटुंबांवर येते. गंभीर जखमींनाही पुढे कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागते.
एखाद्या अपघाताच्या क्षणी तातडीने मिळणारी मदत अपघातग्रस्थांसाठी जीवनसंजीवनी ठरते. अशा प्रसंगात केवळ मदत न मिळाल्यामुळे बरेचदा खूपकाही गमवावे लागते. समोर अपघात घडूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे, प्रसंगी मोबाईल चित्रीकरणात रस असणारेही अनेकजण पाहावयास मिळतात. त्याउलट अपघातानंतर कशाचीही तमा न बाळगता अगदी तत्परतेने मदतीचा हात पुढे करणारेही काही देवदूतही समाजात असतात.
सातारा तालुक्यातील नागठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सुतार हे यांपैकीच एक. परिसरात ते 'पिंटूशेठ' या नावाने प्रसिद्ध आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते अपघातग्रस्तांसाठी आधारवड बनले आहेत. ५२ वर्षीय अब्दुलभाईंनी आजवर शेकडो अपघातात जखमींना तातडीने मदत मिळवून देण्याची मोलाची कामगिरी बजाविली आहे.
मुळात नागठाणे हे पुणे- बंगळूर महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण. आले पिकाची राज्यातील महत्त्वपूर्ण बाजारपेठ. या महामार्गावर परिसरातील अनेक ठिकाणे ही अपघातप्रवण क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. त्यातील शेंद्रे ते काशीळ या टप्प्यात तर कायम अपघाती घटना घडतच असतात. अशावेळी अब्दुलभाई वेळेची पर्वा न करता अपघातस्थळी पोहोचलेले असतात. थंडी असो, पाऊस असो वा रात्र- अपरात्र असो त्यांची अपघातस्थळावरची उपस्थिती ही चुकत नाही.
अब्दुलभाई म्हणतात, "अपघातात मृत्यूला सामोरी जाणारी, वेदनांनी तडफडणारी माणसे पाहणे मोठे वेदनादायी असते. कुणाच्या दुर्दैवी मृत्यूचे साक्षीदार होणे, हेही तितकेच दुःखदायक असते. महामार्गामुळे आमच्या परिसरात अपघातांचे प्रमाण अधिक आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळणे आवश्यक असते. मदतीअभावी मृत्यू आला तर ती व्यक्ती आणि तिचे संपूर्ण कुटुंबच उध्वस्त होते. यावर काहीतरी केलं पाहिजे असा विचार एक दोन अनुभवांनंतरच आला. माझ्या धर्माने मला मानवता शिकवली. प्रेषित मोहम्मदांचे एक वचन माझ्या महान घर करून राहिले होते. तुमचे शेजारीपाजारी, दिनदुबळे, याचक यांची मदत करणे हे मुस्लीम म्हणून तुमचे कर्तव्य आहे. या कर्तव्यभावनेतूनच मी आजवर हे सगळं करत आलो. धर्माने सांगितलेलं मानवतेचं हे तत्वज्ञान आमची प्रेरणा बनली आणि वडलांच्या पावलावर आम्ही पाऊल टाकले. ते आमचे मार्गदर्शक ठरले."
अब्दुलभाईंना कुटुंबातूनच लोकसेवेचा वारसा मिळालाय. त्यांचे दिवंगत वडिल इब्राहिम सुतार हे समाजातील मातब्बर कार्यकर्ते होते. सुतार कुटुंब मूळचे कऱ्हाड तालुक्यातील खंडोबाच्या पाली इथले. व्यवसायाच्या निमित्ताने ते नागठाण्यात आले आणि इथेच स्थायिक झाले. त्यांनी लाकडाच्या वखारीचा व्यवसाय सुरु केला. यानिमित्ताने समाजातील विविध घटकांशी त्यांचा संपर्क आला.
इब्राहिम सुतार यांनी आपल्या हयातीत अनेक गोरगरिबांना सढळ मदत केली. हीच परंपरा अब्दुलभाईंनी पुढे चालवली आहे. सुरूवातीच्या काळात त्यांच्याकडे एक ट्रॅक्टर होता. अपघात झाला, की अपघातग्रस्त वाहने बाजूला काढायला पोलिस त्यांना पाचारण करत. अर्थात व्यवसायापेक्षा सहकार्य वृत्तीचा मूळचा स्वभाव त्यांना स्वस्थ बसू द्यायचा नाही.
अपघातातील जखमींना वाहनाबाहेर काढणे, त्यांना रूग्णालयात उपचारासाठी पाठविणे याकडेच त्यांचा प्राधान्यक्रमाने कल असायचा. पुढे त्यावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले. अपघातानंतर मदतकार्य अधिक वेगाने व्हावे आणि जखमींना तातडीने उपचार मिळावेत म्हणून त्यांनी एक रुग्णवाहिकाच खरेदी केली. उल्लेखनीय म्हणजे अपघात घडल्यावर परिसरातील पोलिसही सर्वात आधी अब्दुलभाईंशीच संपर्क करतात.
अब्दुलभाईंनी आजवर शेकडो जखमींना तातडीचे उपचार मिळवून दिले आहेत. अनेकांचे प्राण वाचवले आहेत. जखमींना जिल्हा रूग्णालयात पोचविण्यासाठी धडपड केली आहे. कैक छिन्न- विछिन्न मृतदेह वाहनाबाहेर काढले आहेत. केवळ माणसांचेच, नव्हे तर मुक्या प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. विहिरीत पडलेली अनेक जनावरे त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढली आहेत. नदीतील, विहिरीतील अनेक मृतदेह बाहेर काढण्यासाठीही त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आहे.
अब्दुलभाईंची परंपरा पुढच्या पिढीनेही कायम ठेवली आहे. सुहेल, अजीम ही त्यांची मुले समाजसेवेची ही खानदानी परंपरा पुढे घेऊन जात आहेत. अब्दुलभाईंकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे. समाजसेवेच्या कामात त्यांना इस्माईल, रफिक, अस्लम या बंधूंचेही वेळोवेळी सहकार्य लाभते. अलीकडेच त्यांनी आधुनिक सुविधायुक्त असलेली कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी केली आहे. सोबतच मदतकार्यात उपयोगी पडेल अशी १७ टनी अवजड क्रेनही त्यांच्याकडे आहे.
सामाजिक बांधिलकी
अब्दुलभाईंनी 'मदरसा दारुल उलूम ट्रस्ट'च्या माध्यमातून शिक्षणासाठी पुढाकार घेतला. १९९५ मध्ये त्यांनी उर्दू हायस्कूल स्थापन केली. सोबत धार्मिक शिक्षण देणारी शाळाही (मदरसा) सुरू केली. आता तिथे बालवाडी ते बारावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. तिथे आजवर शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेले. त्यात अनाथ, बेघर, वंचित यांची संख्या अधिक आहे. त्यांच्या भोजनापासून आरोग्य आणि शैक्षणिक साहित्यापर्यंतचा भार अब्दुलभाईंच्या संस्थेतर्फेच उचलला जातो. त्यांच्यासाठी येथे मोफत वसतिगृह असून सध्या त्यात ९० हून अधिक विद्यार्थी राहतात. विशेष म्हणजे या शाळा आणि मदरसा यांसाठी अब्दुलभाईंच्या कुटुंबीयांनी तब्बल दहा गुंठे जमीन दान केली आहे.
प्रगल्भ सामाजिक जाणिवा
अब्दुल सुतार यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत. त्यांच्या सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ आहेत. समाजासाठी काहीतरी करायला हवे, ही धारणा सदैव क्रियाशील बनवते, असे ते सांगतात. 'ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन' या राष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. यामाध्यमातून विविध योजना गरजूंपर्यत पोहोचवण्यासाठी मेळावे, परिसंवाद, जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. कोविड काळातही त्यांनी गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी भरीव प्रयत्न केले.
- सुनील शेडगे, सातारा