मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दरवर्षी १ ऑगस्ट रोजी अर्थात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरणं केलं जातं. यावर्षी हा राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. कार्यरत असलेल्या पंतप्रधानांना प्रथमच या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. लोकमान्यांच्या १०३ व्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच एक ऑगस्ट रोजी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यातआल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.

 

पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. डॉ. टिळक म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये स्मारक त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून देशाला जागतिक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

 

कार्यक्रमासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे दीपक टिळक महताले. कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे. आतापर्यंत एस. एम. जोशी, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरद पवार, एन. आर. नारायणमूर्ती, जो. माघवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, एम. एस. स्वामिनाथन, डॉ. वर्गीस कुरियन अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

शरद पवार प्रमुख पाहुणे; अजित पवारही निमंत्रित

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे महाराष्ट्रातील राजकारण गेल्या आठ दिवसांपासून ढवळून निघाले आहे. अशा पार्श्वभूमीवर टिळक पुरस्काराचा कार्यक्रमात होत आहे. 'राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रमुख पाहुणे असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 'राष्ट्रवादी'चे नेते अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.