एका सामान्य मुस्लिम तरुणाने सर्वांसाठी देशभक्तीचा आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या कार्याने दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे.
चौक मंडई येथील इलियास अत्तार अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. सरस्वती नाला परिसरात रस्त्यावर आर्टिफिशिअल ज्वेलरी, बांगड्या विक्रीचा गाड्यांवर व्यवसाय करतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घराचा उदरनिर्वाह भागवत असतो. असे असताना देशाप्रति आपल्या संवेदना आणि देशभक्ती व्यक्त करण्याचा त्याने अनोखा मार्ग अवलंबिला.
स्वखर्चातून त्याने वाहनांवर लावणारे तिरंगी झेंडे, चारचाकीचा आतील प्लॅस्टिक क्रॉस झेंडे, तिरंगी फुगे, देशभक्तिपर संदेश देणारे बॅच अशा विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.
सोमवारी (ता. १४) सकाळपासून रात्रीपर्यंत चिमुकल्यांसह नागरिकांना मोफत या वस्तूंचे वाटप केले. मंगळवार (ता. १५) स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुपारपर्यंत त्याचा उपक्रम सुरू होता.
प्रत्येक जण देशासाठी काही ना काही योगदान देत असतो. सामान्य कुटुंबातील असल्याने खूप काही करू शकत नाही. तशी आर्थिक परिस्थितीही नाही. देशावरील प्रेम, सद्भावना यामुळे असा उपक्रम राबवावा, अशी इच्छा झाली. त्यातूनच देशभक्तिपर वस्तू खरेदी करून नागरिकांमध्ये वाटप केले. असे करत असताना आत्मिक समाधान वाटत होते.
काहींनी तर वस्तू घेऊन पुढे मार्गक्रमण करत असताना हा तरुण वेडा तर नाही ना, खिशातील पैसे खर्च करून आणलेल्या वस्तू मोफत वाटप आहे, अशी चर्चा करत होते. त्यांच्या चर्चेपेक्षा मला मिळालेला आनंद मोलाचा वाटला, अशी प्रतिक्रिया तरुणाने व्यक्त केली.