गुड फ्रायडे : ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र दिवस

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 28 d ago
येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले तो क्षण
येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले तो क्षण

 

पवित्र गुरुवारी लास्ट सपरच्या (शेवटचे भोजन)  वेळी येशू ख्रिस्ताने धर्मगुरु संस्थेची स्थापना केली असे म्हणतात. ``हे माझ्या आठवणीसाठी करत जा'' असे येशू म्हणाला आणि अशाप्रकारे चर्चमध्ये दरदिवशी आणि रविवारी मिस्साविधी होतो आणि `लास्ट सपर'ची उजळणी होते. 
 
हे शेवटचे भोजन झाल्यावर या भोजनात सहभागी झालेला यहूदा किंवा ज्युडास मग आपल्या प्रभूचे चुंबन घेऊन त्याला त्याच्या मारेकऱ्यांच्या हवाली करतो. 
 
रात्रभर येशूचा छळ होऊन दुसऱ्या दिवशी रोमन साम्राज्याचा प्रतिनिधी पिलात येशूला रोमन रिवाजानुसार क्रुसावर खिळण्याची सजा फर्मावतो. क्रुसावर शेवटचा श्वास घेण्याआधी येशू म्हणतो : हे बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना माहीत नाही.'' हा दिवस म्हणजे गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार.
 
येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगल्यानंतर दुपारी तीनला 'हे बापा, मी माझा आत्मा आता तुझ्या स्वाधीन करतो' असे म्हणून त्याने अखेरची मान टाकली, म्हणून भर उन्हात येशूच्या मरणप्राय वेदनांच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेच्या प्रार्थना व्हायच्या. 
 
पृथ्वीतलावरचे आपले जीवितकार्य सुरु करण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस एकांतवासात उपवास केले, त्यानुसार ख्रिस्ती धर्मपरंपरेत हा चाळीस दिवसांचा उपवासकाळ आणि प्रायश्चितकाळ पाळला जातो. 
 
उपवासकाळातील सुरुवातीचा भस्म बुधवार आणि शेवटचा उत्तम शुक्रवार यादिवशी उपास पाळणे करणे हे बंधनकारक होते, कॅथॉलिक चर्चच्या आजच्या रितीनियमांनुसार आजही हे दोन्ही दिवस उपास पाळणे बंधनकारक (ऑब्लिगेटरी) आहे. आजारी व्यक्ती आणि सज्ञान नसलेली मुले यांना उपास करणे बंधनकारक नाही. 
 
हा उपवासकाळ चाळीस दिवसांचा आहे असे मानले जाते तरी प्रत्यक्षात हा काळ त्याहून अधिक दिवसांचा असतो, याचे कारण म्हणजे या उपवासकाळात येणारे रविवार आणि चर्चच्या सणाचे (फेस्ट) दिवस यातून वगळले जातात. 
 
या लेन्ट सिझन किंवा उपवासकाळातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे होली विक किंवा पवित्र सप्ताह किंवा आठवडा. पाम संडे किंवा झावळ्यांच्या रविवारी सुरु होणाऱ्या या आठवड्यात पवित्र गुरुवार, गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार येतो आणि ईस्टर संडे किंवा ईस्टर रविवाराने या आठवड्याची सांगता होते. यावेळी २९ मार्चला गुड फ्रायडे,  ३१ मार्चला  ईस्टर संडे आहे. 
 
ख्रिस्ती धर्मातील सर्व पंथीय भाविक पवित्र आठवडा भक्तिभावाने पाळतात, ख्रिसमस किंवा नाताळाइतकेच या पवित्र सप्ताहाला आणि विशेषतः गुड फ्रायडे आणि ईस्टरला आहे. 
 
पवित्र गुरुवारी रात्री त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असलेल्या ज्युडासने येशूचे ते विश्वासघातकी चुंबन घेऊन त्याला शत्रूंच्या ताब्यात दिले आणि दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेला येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. 
 
मात्र तरीसुद्धा हा दिवस `गुड फ्रायडे’, याचे कारण म्हणजे येशूच्या क्रुसावरच्या मरणाने अख्ख्या मानवजातीचे तारण झाले असे मानले जाते. मात्र तिसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या भल्या पहाटे येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून पुनरुज्जिवित झाला अशी श्रद्धा आहे. नाताळापेक्षाही ईस्टर संडेला अधिक महत्त्व आहे ते या अर्थाने. 
 
चर्चमधल्या रविवारच्या मिस्साविधीचा काळ प्रवचनासह साधारणतः एक तासापुरता असतो , गुड फ्रायडेची प्रार्थना मात्र थोडी अधिक काळ चालते. या दिवसांच्या प्रार्थनाविधीत मला विशेष भावणारा भाग म्हणजे या दिवशी केल्या जाणाऱ्या श्रद्दावंतांच्या प्रार्थना. 
 
जगभर या दिवशी नेहेमीच्या इतर प्रार्थनांबरोबरच ज्यांच्या माध्यमातून देव मानवजातीसमोर प्रकटला त्या ज्यू लोकांसाठी, येशू ख्रिस्तावर श्रद्धा नसलेल्या लोकांसाठी आणि हो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणाऱ्या नास्तिक लोकांसाठीही प्रार्थना केली जाते. लेन्ट सिझनची गुडफ्रायडेलाच सांगता होते. 
 
बहुसंख्य कॅथोलिक भाविक फक्त रविवारच्या आणि इतर सणांनिमित्त मिस्सासाठी चर्चमध्ये जात असले तरी चर्चमध्ये वर्षभर दररोज सकाळी वा संध्याकाळी मिस्सविधी होत असतोच, यास एकमेव अपवाद असतो गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे यामध्ये येणाऱ्या शनिवारचा.. 
 
गुड फ्रायडेच्या दिवशीसुद्धा पूर्ण मिस्साविधी नसतो. ख्रिस्ताच्या दुःखसहनाच्या स्मरणार्थ प्रार्थना झाल्यावर लगेच कम्युनियन दिले जाऊन विधी संपतो. नंतरच्या शनिवारी येशू कबरेत असल्याने चर्चमध्ये दिवसभऱ कुठलाही प्रार्थना वा विधी नसतो, शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी भाविक जमतात ते येशूच्या पुनरुत्थानाचा सोहोळा साजरा करण्यासाठीच.
 
ईस्टरच्या पूर्वसंध्येला शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सकाळीही ईस्टरनिमित्त मिस्साविधी होतो. येशूच्या पुनरुस्थानाचा हा सण आनंदाने साजरा केला जातो. 
 
काळाच्या ओघात या प्रायश्चितकाळाचे स्वरूप बदलत गेले आहे. बायबलच्या जुन्या करारात प्रायश्चित करण्यासाठी लोक जाडेभरडे गोणपाटाचे कपडे घालत, उपवास करत आणि संपूर्ण अंगावर राख चोपडून शोक करत परमेश्वराची दयायाचना करत असत. त्यामुळे देवाला दया येऊन, त्याचा क्रोध कमी होऊन त्याच्या कृपादृष्टीचा प्रायश्चित करणाऱ्यांना लाभ होई. येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरच्या मरणाने नव्या कराराची निर्मिती झाली, नव्या करारातील परमेश्वर क्रोधी नाही तर दयाळू आहे. त्यामुळे प्रायश्चित करण्याचे स्वरुपही आता खूपच सौम्य आणि केवळ प्रतिकात्मक राहिले आहे. 
 
मकबूल फिदा हुसेन यांनी रेखाटलेले "द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट'' 
`द लास्ट सपर' किंवा `येशूचे शेवटचे भोजन या विषयाने जगभरातील चित्रकारांना आकर्षित केले आहे. लिओनार्दो दा व्हिन्सी याने रेखाटलेले ते प्रसिद्ध चित्र किंवा त्या चित्राची प्रतिकृती ख्रिश्चनांच्या घरात विशेषतः डायनिंग टेबलाच्यावर भिंतीवर असतेच. माझ्याही घरात आहेच. 
 
गुड फ्रायडेला क्रुसावर दुःखसहन करून देहत्याग करणाऱ्या ख्रिस्ताने आपल्या बारा शिष्यांसह आज पवित्र गुरुवारी ( Maundy Thursday) संद्याकाळी आपले `शेवटचे भोजन' केले. `The Last Supper ' त्यावेळी ज्युडास इस्किर्योत हा त्याचे चुंबन घेऊन विश्वासघात करणारा शिष्यसुद्धा होता. त्यावेळचे येशू आणि त्याच्या शिष्यांचे चित्रण करण्याचे आव्हान चित्रकारांसमोर असते. 
 
जेवणासाठी बसण्याची आसनव्यवस्था, बाराही शिष्यांचे ओळख पटण्यासारखे चित्रण आणि 'तुमच्यापैकी एक जण आता माझा विश्वासघात करणार आहे' हे येशूने सांगितल्यावर या शिष्यांमध्ये उमटणारी अस्वस्थता लिओनार्दो द व्हिन्सीने The Last Supper ' या चित्रात उत्तमरित्या सादर केली आहे. 
 
भारतातील अनेक चित्रकारांनी `द लास्ट सपर' रेखाटण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे. मकबूल फिदा (एम. एफ.) हुसेन, जेमिनी रॉय, फ्रान्सिस न्युटन सोझा, अँजेलो दा फोन्सेका वगैरेंनी. ही सर्व चित्रे अर्थातच भारतीय शैलीत म्हणजे भारतीय प्रतिमांसह आहेत. 
 

 
एम. एफ. हुसेन यांनी ख्रिस्ती धर्माच्या संकल्पनेवर खूप चित्र रेखाटलेली आहेत आणि त्यांचा अर्थातच `भारतीय ख्रिस्ती कला' मध्ये समावेश केला जातो.  एम. एफ. हुसेन यांनी आपल्या खास शैलीत रेखाटलेले `द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट' चे (२००८) हे एक चित्र. 
 
हे चित्र हुसेन यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील आहे. हुसेन यांच्या या चित्रात ख्रिश्चन आणि इस्लामिक संस्कृतीचा मिलाप दिसतो. चित्रात उंट, देवदूत आणि इतर अनेक प्रतिमा आहेत, त्याबद्दल केवळ कला समीक्षकच लिहू शकतील. 
 
- कामिल पारखे
(लेखक पत्रकार असून ख्रिस्ती समाज आणि संस्कृती यांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.) 

कामिल पारखे यांचा हा लेखही जरूर वाचा 

लेंट सिझन : ख्रिस्ती धर्मियांमधील उपवासाचे चाळीस दिवस

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter