राज्यात दुसऱ्या टप्प्यासाठी आज ‘मतसंग्राम'

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 10 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील ८८ मतदारसंघांत आज मतदान होणार असून राज्यात विदर्भातील पाच आणि मराठवाड्यातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह एकूण १२१० उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंद होणार आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या टप्प्यात ८९ मतदारसंघात मतदान होणार होते. परंतु मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसपच्या उमेदवाराचे निधन झाल्याने तेथे तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मतदान होणाऱ्या ८८ मतदारसंघांमध्ये नऊ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी तर सहा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. या टप्प्यात केरळमधील सर्व २० मतदारसंघांत मतदान पूर्ण होणार आहे.

याशिवाय आसाम (५), बिहार (५), छत्तीसगड (३), कर्नाटक (१४), मध्य प्रदेश (६), महाराष्ट्र (८), मणिपूर (१), राजस्थान (१३), त्रिपुरा (१), उत्तर प्रदेश (८), पश्चिम बंगाल (३) व जम्मू व काश्मीर (१) या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात मतदान होत असून या टप्प्यानंतर राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांतील मतदान संपलेले असेल.

देशातील प्रमुख उमेदवार
ओम बिर्ला (कोटा), राहुल गांधी (वायनाड), गजेंद्रसिंह शेखावत (जोधपूर), व्ही. मुरलीधरन (अट्टिंगल), सी. पी. जोशी (भिलवारा), हेमा मालिनी (मथुरा), अरुण गोविल (मेरठ), एच. डी. कुमारस्वामी (मंड्या), तेजस्वी सूर्या (बंगळूर दक्षिण), शशी थरूर व राजीव चंद्रशेखर (तिरुवनंतपुरम), भूपेश बघेल (राजनांदगाव), पप्पू यादव (पूर्णिया), के. सी. वेणुगोपाल (अलापुझ्झा), दानिश अली (अमरोहा)

उष्णतेसाठी अधिकाऱ्यांना सूचना
पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का सुधारावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित राज्यातील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेत सूचना केल्या. उष्णतेची लाट असल्यास मतदान केंद्रांवर काय उपाययोजना करायला हव्यात, याबाबत मार्गदर्शनही केले.

केरळमध्ये सर्व २० जागांवर मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व २० जागांवर निवडणूक होत आहे. या जागांसाठी १९४ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी केवळ २५ महिला आहेत. राज्यात एकूण दोन कोटी ७७ लाखांहून अधिक मतदार असून पाच लाखांहून अधिक जण प्रथम मतदार आहेत.

मतदारांच्या बोटांना शाई लावण्यासाठी एकूण ६३ हजार १०० बाटल्यांचा वापर होणार आहे. वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्यासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन आणि माकपच्या नेत्या ॲनी राजा यांचे आव्हान असून तिरुअनंतपुरम येथे काँग्रेसच्या शशी थरुर यांच्यासमोर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे आव्हान आहे.

प्रमुख उमेदवार
प्रकाश आंबेडकर (अकोला)
नवनीत राणा (अमरावती)
रविकांत तुपकर, प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडकर (बुलडाणा)
रामदास तडस (वर्धा)
 
राज्यातील मतदान
विदर्भ : अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, बुलडाणा
मराठवाडा : परभणी, हिंगोली व नांदेड
 
एकूण उमेदवार : २२३