रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : मुस्लीम मतदारांचा कल कुणाकडे?

Story by  Awaz Marathi | Published by  Sameer Shaikh • 10 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध विद्यमान खासदार विनायक राऊत अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राऊत यांनी मतदार संघात प्रचाराच्या फेऱ्यांवर फेऱ्या पूर्ण करणाऱ्यावर भर दिला आहे. युतीचा उमेदवार उशिरा जाहीर झाला आहे. त्यात या मतदार संघातील २ लाख ५५ हजार मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना ‘आपलेसे’ करण्याचे आव्हान आहे.

कोकण पट्ट्यातील मुस्लीम समाज इथल्या मातीशी जोडला गेला आहे. कोकणी मुस्लिमांची एक वेगळी संस्कृती इथे उदयाला आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर भागापेक्षा इथल्या मुस्लीम समाजाची इथल्या प्रदेशाशी घट्ट नाळ जोडलेली आहे. त्यामुळे इथले सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर हा समाज खंबीर आणि थेट भूमिका घेण्यासाठी ओळखला जातो. या प्रदेशातील मुस्लीम लोकसंख्या राजकीयदृष्ट्या प्रभाव टाकणारी असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे राजकारण्यांच्या सोयीचे नसते.    

मुस्लीम समाजाची ही मते निर्णायक ठरू शकतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सलग तिसऱ्यावेळी पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या विनायक राऊत आणि राणे यांच्यामध्ये लढत होत आहे. त्यामुळे मागील दोन पराभवांची परतफेड राणे करणार की, विनायक राऊत विजयाची हॅट्‌ट्रिक साधणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. नीलेश राणे यांनी २००९ मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी घेत विजय मिळवला.

त्या वेळी सुरेश प्रभू यांचा पराभव करून त्यांनी शिवसेनेची विजयी परंपरा खंडित केली. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा काँग्रेसने उमेदवारी दिली, तर शिवसेनेने विनायक राऊत यांच्या रुपाने नवीन चेहरा मैदानात उतरवला. त्या वेळी नीलेश राणे यांचा पराभव झाला. २०१४ ला आलेल्या मोदी लाटेचाही नीलेश राणे यांना फटका बसला. २०१९ मध्ये पुन्हा नीलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले, तेव्हा विनायक राऊत यांनाच उमेदवारी दिली गेली.

त्या वेळी विनायक राऊत यांनी १ लाख ७० हजार मताधिक्याने नीलेश राणे यांचा पराभव केला. आता २०२४ च्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा राणे विरुद्ध राऊत असा सामना रंगणार आहे. मात्र, या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः नारायण राणे उभे ठाकल्यामुळे चुरस वाढली आहे. शिंदे गट व अजितदादा गट यांच्यामुळे राणे यांचा विजय सोपा होऊ शकतो. सध्या कागदावर तरी महायुतीची बाजू भक्कम दिसते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter