अजूनही आठवते बालपणातील रमजान ईद

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 22 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

डॉ.एस एन पठाण 
 
ईद म्हणजे आनंदाचा दिवस. वाटल्यास आनंदाचा सण, इस्लाममध्ये तसे सणवार फारसे नाहीत. त्यामुळे या ‌‘रमजान ईद‌’चे मुस्लिम बांधवांना फार आकर्षण असते. पवित्र कुराणच्या आज्ञेप्रमाणे म्हणजेच ईश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे मुस्लिम बांधवानी गेले ३० दिवस उपवास केले असतील. हे उपवास तसे कष्टप्रद असतात. दिवसभर काही खायचेही नाही, पाणीदेखील प्यायचे नसते. दिवसभराची पाच वेळची प्रार्थना (नमाज), पवित्र कुराण पठण, रात्रीची विशेष सामुदायिक प्रार्थना (तरावीही). एकूण दिवसभर मुस्लिम बांधव-भगिनींचे जीवन एका घट्ट शिस्तीने बांधलेले असते. त्या घट्ट शिस्तमय जीवनाची एक महिन्यानंतरची सांगता म्हणजे ‌‘रमजान ईद‌’.

प्रत्येक संस्कृतीमध्ये या सणावारांच्या माध्यमातून आध्यात्मिक संस्कार रुजविले जातात. अशा वेळी आपणास आपल्या आई-वडिलांची आठवण होते. माझी आई अशिक्षित होती, परंतु ती नित्याने उपवास करायची. बरे त्या वेळचे दिवस म्हणजे अगदी साधारण. तसे म्हटले तर गरिबी पाचवीला पुजलेली असायची. त्या वेळी आपला देशच गरीब होता. पण रमजान ईदच्या उपवासाच्या वेळी कशी व्यवस्था व्हायची देव जाणे.

आई आम्हा भावांना पहाटेच उठवायची. त्या माउलीने पहाटे गरमगरम स्वयंपाक केलेला असायचा. आम्ही डोळे चोळत चोळत ते अन्न खायचो. दुपार झाली की आईला शंका यायची की तहान लागली तर आम्ही गुपचूप पाणी पिऊ, मग ती आमच्यावर नजर ठेवायची आणि सारखे सांगायची की बाळांनो, तुम्ही गुपचूप काही खाऊ नका, पिऊ नका. कारण, आपला ईश्‍वर आपल्याला सतत पाहत असतो. संध्याकाळ झाली की, कधी एकदाची इफ्तारी (उपवास सोडण्याची वेळ) होते, याची आम्ही मशिदीत जाऊन वाट पाहत बसायचो. मग मशिदीमध्ये सायंकाळी इफ्तारीला येताना गावातील कुणी काही काही पदार्थ आणत असत. मोठी माणसे फारसे खायची नाहीत. आमचे मात्र लक्ष केवळ खाण्यावर असायचे. मग ‌‘ईद‌’साठी आम्हाला नवीन कपडे घेतले जात. घरातील मोठी माणसे, नातेवाईक आम्हाला रोख पैसे (ईदी) देत. मग काय आनंदी आनंद. ‘ईद‌’च्या दिवशी घरात गोडधोड जेवण, शिरखुर्मा (गोड खीर) एकमेकांच्या घरी जाऊन खायची पद्धत आजही पाळली जाते.

पुढे मी महाविद्यालयात शिक्षणासाठी सातारला विज्ञान महाविद्यालयात आलो, तेव्हापासून रमजानच्या उपवासाची सवय मी सुरूच ठेवली आहे. आज मात्र आमच्या घरी मोठ्या उत्साहात ईद साजरी होते. सर्व जातिधर्मातील मित्रांना आम्ही शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतो. गेली ५० वर्षे हा उपक्रम चालू आहे.
 
- डॉ.एस एन पठाण 
(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)