"मेक इन इंडिया' अंतर्गत क्रीडा साहित्य स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणार," रक्षा खडसे यांची मोठी घोषणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

 

"खेळाडूंवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि या क्षेत्राला 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत आणण्यासाठी, सरकार देशातील क्रीडा उपकरणे तयार करणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन देईल," असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शनिवारी सांगितले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) मुंबई विभागीय केंद्राने आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिन परिषदेत एका पत्रकार परिषदेत रक्षा खडसे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याने केवळ खेळाडूंचा खर्चच कमी होणार नाही, तर क्रीडा परिसंस्थेत एक मोठे आर्थिक बदलही घडेल.

"तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की क्रीडा उपकरणे खूप महाग असतात. आपण जी काही दर्जेदार उपकरणे वापरतो, ती आयात केलेली असतात. जर आपण भारतात त्याच दर्जाची उपकरणे बनवण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटते की क्रीडा परिसंस्थेत मोठा बदल होईल," असे त्या म्हणाल्या.

रक्षा खडसे यांनी पुढे सांगितले की, आयात केलेल्या उपकरणांवरील शुल्क आणि करांमुळे खर्च वाढतो आणि जागतिक दर्जाच्या उपकरणांचे स्वदेशी उत्पादन झाल्यास किमती लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.

रक्षा खडसे म्हणाल्या की, देशातील स्टार्टअप्सना दोन प्रकारे काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल - केंद्र सरकारसोबत पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) मॉडेलवर किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार करून. "आम्ही हे क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले ठेवले आहे. त्यांनी त्यांचे संशोधन आणि विकास करावे, जेणेकरून ते आपल्या कौशल्याने सरकारसोबत पीपीपी मॉडेलवर किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबतही काम करू शकतील," असे त्या म्हणाल्या.

"पण आम्हाला ही उत्पादने 'मेड इन इंडिया' हवी आहेत, ज्यामुळे खेळाडूंना मदत होईल आणि दर कमी होतील. याचा फायदा खेळाडूंना होईल. दुसरे कारण म्हणजे, आपल्याकडे 'मेक इन इंडिया' उत्पादन असेल आणि जर आपण जागतिक दर्जाचे उत्पादन बनवले, तर ते आपण दुसऱ्या देशांनाही विकू शकतो," असे त्या पुढे म्हणाल्या.

नवी दिल्लीत भारताच्या पहिल्या-वहिल्या 'मोंडो ट्रॅक'च्या उद्घाटनावर बोलताना, रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय शिबिर राजधानीत हलवण्याचा कोणताही विचार नाही. "नाही, तसे काही नाही. आम्ही सध्याच्या क्रीडा पायाभूत सुविधांची देखभाल करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा आपण राष्ट्रकुल खेळ आणि ऑलिम्पिकबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला तो दर्जा टिकवून ठेवण्याची गरज आहे," असे त्या म्हणाल्या.

रक्षा खडसे म्हणाल्या की, क्रीडा मंत्रालय 'अस्मिता लीग'ला तळागाळापर्यंत नेण्याचेही उद्दिष्ट ठेवत आहे. "काही वर्षांपूर्वी, आम्ही 'अस्मिता लीग' सुरू केली आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. 'अस्मिता लीग'च्या माध्यमातून महिलांना आपली कामगिरी दाखवण्यासाठी एक व्यासपीठ मिळत आहे. त्या आपल्या क्षमतांबद्दलही शिकत आहेत," असे त्या म्हणाल्या. "आम्ही 'अस्मिता लीग'ला तळागाळापर्यंत नेत आहोत. आम्ही राज्यस्तरावर सामने आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहोत. ब्लॉक स्तरापासून, जिल्हा स्तरापर्यंत, राज्य स्तरापर्यंत, नंतर विभागीय आणि मग राष्ट्रीय स्तरापर्यंत."