भारतीय महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
भारतीय खेळाडू विजयाचा आनंद व्यक्त करताना
भारतीय खेळाडू विजयाचा आनंद व्यक्त करताना

 

 मुंबईकर खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सच्या नाबाद ५३ धावा आणि यष्टिरक्षक रिचा घोष हिच्या नाबाद ३१ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. केपटाऊन येथे झालेल्या लढतीत भरताने ७ विकेट ६ चेंडू राखून हा विजय मिळवला आणि टी-२० विश्‍वकरंडकात दमदार सलामी दिली. जेमिमा रॉड्रिग्सची प्लेयर ऑफ दी मॅच म्हणून निवड करण्यात आली.

 
पाकिस्तानकडून भारतासमोर १५० धावांचे आव्हान उभे ठाकले होते. शेफाली वर्मा व यास्तिका भाटिया या सलामीच्या जोडीने ३८ धावांची भागीदारी करताना आश्‍वासक सुरुवात करून दिली. सादिया इक्बालने यास्तिकाला १७ धावांवर फातिमा सनाकरवी झेलबाद करत पहिला धक्का दिला. यानंतर शेफाली व जेमिमा रॉड्रिग्स ही जोडी स्थिरावणार, असे वाटत असतानाच नशरा संधू हिने शेफालीला ३३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही खेळपट्टीवर उभे राहून भारतासाठी मोलाच्या धावा करता आल्या नाहीत. संधूनेच तिला १६ धावांवर बाद केले.
 
५८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी
जेमिमा रॉड्रिग्स व रिचा घोष या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जेमिमाने ३८ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह नाबाद ५३ धावांची खेळी साकारली. रिचाने २० चेंडूंमध्ये ५ चौकारांसह नाबाद ३१ धावांची खेळी केली. दोघींच्या दमदार फलंदाजीने भारताने शानदार विजय संपादन केला. पाकिस्तानकडून नशरा संधू हिने १५ धावा देत २ फलंदाज बाद केले. या सामन्यात पाकिस्तान संघाची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते.

बिसमाह-नसीममुळे १४९ पर्यंत मजल
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. पाकिस्तानचा संघ १२.१ षटकांत ४ बाद ६८ धावांवर अडकला; पण यानंतर बिसमाह मारुफ व अयेशा नसीम या जोडीने नाबाद ८१ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानला १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली. बिसमाह हिने ५५ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ६८ धावांची, तर नसीमने २५ चेंडूंमध्ये २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४३ धावांची खेळी साकारली. पाकिस्तानने ४ बाद १४९ धावा केल्या. भारताकडून राधा यादव हिने २१ धावा देत २ फलंदाजांना बाद केले. दीप्ती शर्मा व पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
 
संक्षिप्त धावफलक ः पाकिस्तान - २० षटकांत ४ बाद १४९ धावा (बिसमाह मारुफ नाबाद ६८ - ५५ चेंडू, ७ चौकार, अयेशा नसीम नाबाद ४२ - २५ चेंडू, २ चौकार, २ षटकार, राधा यादव २/२१) पराभूत वि. भारत १९ षटकांत ३ बाद १५१ धावा (शेफाली वर्मा ३३, जेमिमा रॉड्रिग्स नाबाद ५३ - ३८ चेंडू, ८ चौकार, रिचा घोष नाबाद ३१ - २० चेंडू, ५ चौकार).