सातारा : जिल्ह्याचे सुपुत्र आणि देशाला वैयक्तिक प्रकारात पहिले ऑलिंपिक पदक (Olympic Medal) देणारे खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचा १५ जानेवारी हा जन्मदिन आता 'राज्य क्रीडा दिन' (State Sports Day) म्हणून साजरा होणार आहे. या राज्य क्रीडा दिनाच्या कार्यक्रमांसाठी प्रत्येक जिल्ह्याला ७५ हजार रुपये, तर राष्ट्रीय क्रीडा दिनासाठी आता ५० हजार आणि क्रीडा सप्ताहासाठी १० हजारांऐवजी एक लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे.
याबाबत कवठे (ता. वाई) येथील सुपुत्र, मंत्रालयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे कार्यासन अधिकारी रणसिंग डेरे यांच्या स्वाक्षरीने काल (शुक्रवार) सायंकाळी हा अध्यादेश काढण्यात आला आहे. पुणे येथील शिवछत्रपती पुरस्कार वितरण समारंभात २८ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
त्यावर हा अध्यादेश काढण्यात आला. हा क्रीडा दिन क्रीडा व युवक, संचनालय, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुले, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी विद्यापीठे, क्रीडा संस्था, मंडळे अकादमी, क्रीडा योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे. खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान, क्रीडा रॅली, मॅरेथॉन, मार्गदर्शन शिबिर, खेळाडूंशी संवाद, क्रीडा पुरस्काराचे वितरण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचे आयोजन यामध्ये करण्यात येणार आहे.