ऑपरेशन सिंदूर' दुसऱ्या दिवशीही सुरु असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवसभर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि सर्व महत्त्वाच्या केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांशी दीर्घ चर्चा करुन राष्ट्रीय सुरक्षा तसेच युद्धकाळात विविध आघाड्यांवर करावयाच्या सज्जतेचा आढावा घेतला. राष्ट्रीय सुरक्षा, सज्जता आणि नागरिकांच्या सुरक्षेविषयी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.
'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर आज संसद भवनात सर्वपक्षीय चर्चेत सहभागी न होता पंतप्रधान मोदी आणि अजित दोवाल यांची तासभर चर्चा केली. त्यापाठोपाठ केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्याशी त्यांची चर्चा दीड तासाहून अधिक काळ चालली. पाकिस्तानने भारताच्या १५ लष्करी तळांवर केलेले हल्ले आज निष्प्रभकरण्यात आले. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी सायंकाळी पंतप्रधानांशी चर्चा केली.
युद्धजन्य स्थितीच्या संवेदनशील काळात विविध केंद्रीय मंत्रालयांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने करायचे नियोजन, परस्पर समन्वय आणि सज्जतेचा पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. या बैठकीत कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांच्या कार्यालयातील ज्येष्ठ अधिकारी तसेच संरक्षण, गृह, परराष्ट्र, माहिती व नभोवाणी, ऊर्जा, आरोग्य आणि दूरसंचार मंत्रालयांचे सचिव उपस्थित होते.
नागरी सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यावर, अपप्रचार आणि फेक न्यूजला सामोरे जाण्यावर तसेच अतिशय संवेदनशील अशा पायाभूत सुविधांची सुरक्षा निश्चित करण्यावर या बैठकीत पंतप्रधानांनी भर दिला. देश संवेदनशील कालखंडातून जात असताना राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी आणि जमिनीवर कार्यरत असलेल्या संस्थांशी समन्वय प्रस्थापित करुन सर्व केंद्रीय मंत्रालयांनी परस्पर समन्वय आणि स्पष्ट संदेशातून सावध राहून काम करावे, यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.