बोल्टच्या खात्यातून १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर चोरीला.

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
उसेन बोल्ट प्रातिनिधिक फोटो
उसेन बोल्ट प्रातिनिधिक फोटो

 

 बोल्ट बरोबरच अनेक जणांच्या खात्यातून सुद्धा असे पैसे गेल्याची घटना घडली आहे

जगातील सर्वात वेगवान पुरुष धावपटू उसेन बोल्टच्या खात्यातून १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना बोल्टचे वकील लिंटन पी. गॉर्डन यांनी एक निवेदन जाहीर केले असून त्यात त्यांनी ‘‘ उसेन बोल्टच्या खात्यात १२.८ दशलक्ष डॉलर होते. मात्र माझा पक्षकार असलेल्या बोल्टच्या खात्यात आता १२ हजार डॉलर असल्याचे दिसत आहे. याबाबत कारवाई करण्यासाठी आम्ही ‘स्टॉक्स आणि सिक्युरिटीज लिमिटेड ’ या खाजगी गुंतवणूक कंपनीला पत्र लिहले असून ; पुढील दहा दिवसांत बोल्टचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आम्हाला तुमच्या विरुद्ध दिवाणी आणि फौजदारी कारवाई करावी लागेल ’’ असे स्पष्ट केले आहे.

 
‘बोल्ट सारख्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या खात्यातून जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे चोरीला जात असतील, तर देशातील सामान्य लोकांना सुद्धा आपल्या पैश्याची चिंता वाटणे साहजिक आहे ’ अशी काळजी सुद्धा गॉर्डन यांनी पुढे व्यक्त केली आहे. स्टॉक्स आणि सिक्युरिटीज लिमिटेड या खाजगी गुंतवणूक कंपनीने ‘ आमचे गुंतवणूकदार बोल्ट बाबतीत घडलेल्या घटनेने काळजीत आहेत याची जाणीव आम्हाला आहे. बोल्ट बरोबरच अनेक जणांच्या खात्यातून सुद्धा असे पैसे गेल्याची घटना घडली आहे का याचा तपास आम्ही करत आहोत ’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
जमैकाचे अर्थमंत्री निगेल क्लर्क यांनी हे पैसे गायब होण्याचे प्रकरण नक्कीच चिंताजनक असल्याचे म्हणत, ‘‘ आपल्या देशाच्या वित्तीय संस्थांवर संशय घेणे ही सामान्य लोकांकडून घडणारी साहजिक गोष्ट आहे. परंतु एका चुकीमुळे सर्वच आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपन्यांना एकाच माळेतील मणी आहेत असे म्हणणे योग्य नाही ’’ असे म्हणून आश्वस्त केले आहे.
 
उसेन बोल्टला सर्वकाळातील उत्कृष्ट खेळाडू समजले जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत बोल्ट हा सलग तीन ऑलिम्पिक मध्ये १०० मीटर आणि २०० मीटर स्पर्धा जिंकणारा एकमेव खेळाडू होता. धावपट्टू म्हणून उत्तम कामगिरी केल्यामुळॆ बोल्टला लायटनिंग बोल्ट असे नाव देण्यात आले होते. टाईम मासिकाच्या २०१६ मधील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये बोल्टचा समावेश करण्यात आला होता.