काश्मीरी तरुणांनी केवळ भारताचेच नव्हे तर जगाचे नेतृत्व करावे : गृहमंत्री शहा

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
sarhad amit shaha
sarhad amit shaha

 

 
पुणे: केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसीय दौऱ्यासाठी महाराष्ट्रात आले होते. साहजिकच इतक्या कमी काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे हा दौरा धकाधकीचा ठरणार होता. त्यामुळे त्यांना थकवा येणं स्वाभाविकही होतं. मात्र शेवटच्या दिवशी पुण्यात संध्याकाळी झालेला कार्यक्रम विशेष ठरला. दिवसाच्या शेवटी त्यांनी  साठहून अधिक काश्‍मिरी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी मनमोकळेपणा संवाद साधला आणि ते क्षणार्धात ताजेतवाने झाले. हसतमुख, उत्साही काश्मिरी विद्यार्थ्यांना पाहून शहा यांच्या तोंडून शब्द निघाले, ‘‘आपको देखके मेरी थकान दूर हो गयी!’’
 
सरहद या संस्थेच्या वतीने पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या जम्मू व काश्मीर येथील विद्यार्थ्यांसमवेत गृहमंत्री अमित शहा यांनी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार, शैलेश वाडेकर, सुषमा नहार आदी या वेळी उपस्थित होते.
 
गृहमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादातून बऱ्याच गोष्टींची उकल झाली. या मुलामुलींनी काश्मीरप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. काश्मीरला परतण्याची ओढ त्यांच्या या वाक्यातून दिसून येते - “आम्हाला तुम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या, आम्ही परत जातो”.  यावर गृहमंत्री त्यांना आश्वस्त करत म्हणाले की, ‘आम्ही कश्मीरी युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देत आहोत. काश्मीरमध्ये लवकरच चांगले बदल जाणवतील.’ काश्मिरींचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी कौतुकाने म्हटले.
 
काश्मीरच्या विकासासाठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद केली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या सोबतच लष्कर आणि पोलीस घेत असलेल्या मेहनतीचे फळ लवकरच दिसून येईल आणि काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीने सरकार आश्वासक पाऊले उचलत असल्याचे सांगत त्यांनी एक विशेष गोष्ट अधोरेखित केली. ‘काश्मीरचा विकास अशा पद्धतीने झाला पाहिजे की, तेथील मुलामुलींना शिक्षणासाठी राज्याबाहेर जावे लागू नये. याउलट बाहेरच्या राज्यातील मुलानांही काश्मीरमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे.’ असं ते म्हणाले.
 
‘काश्मिरी नागरिक शांतताप्रेमी आहेत. दुःख,यातना सहन करूनही या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपण भारावलो आहोत’,असे प्रशंसा उद्गारही त्यांनी यावेळी काढले. आम्ही काश्मिरी नागरिकांसोबत असल्याचे ही त्यांनी नमूद केले.
 
गृहमंत्र्यांशी संवाद साधताना जोगिंदर सिंग नावाच्या विद्यार्थ्याने एक दुःखद गोष्ट सांगितली. त्यांच्या कुटुंबातील १५ सदस्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. ‘मला सैन्यात भरती होऊन कुटुंबियांच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे’, असे तो म्हणाला. त्याला मध्येच थांबवत गृहमंत्री म्हणाले की, ‘काश्मिरी मुलांनी कोणाही प्रति असा द्वेषभाव बाळगू नये. त्यांनी उत्तम शिक्षण घ्यावे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिखर गाठावे व काश्मीरचेच नव्हे तर देशासोबत जगाचेही नेतृत्व करावे.’ गृहमंत्र्यांचे हे शब्द विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. या मुलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदामागे सरहदसारख्या संस्थेचे प्रयत्न आहेत, अशा शब्दांत त्यांनी ‘सरहद’चे कौतुक केले.  
 
सरहदच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या शमिमा अख्तर या काश्मिरी युवतीने यावेळी पसायदान सादर केले. तर रुकया मकबूल हिने नवकार मंत्राचे पठन केले. याचे कौतुक करताना गृहमंत्री म्हणाले की,‘काश्मिरी तरुण-तरुणी पुण्यात येऊन भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहेत,आणि त्याद्वारे सर्व जगाला शांततेचा आणि बंधुत्वाचा संदेश देत आहेत.आज देशाला आणि जगाला याचीच सर्वाधिक गरज आहे.’
 
यावेळी सरहदचे संस्थापक संजय नहार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी संस्थेच्या भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी काश्मिरी विद्यार्थ्यांनी पुण्याचे आणि महाराष्ट्राचे भरभरून कौतुक केले. ‘आम्ही शिक्षणासाठी पुण्यात आलो आणि इथल्या मातीने आम्हाला खूप प्रेम दिले’, अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्राविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.
 
काय करते ‘सरहद’ संस्था?
जम्मू- काश्मीर येथील विद्यार्थ्यांसाठी संजय नहार यांनी १९९५ मध्ये पुण्यात सरहद संस्थेची स्थापना केली. जम्मू काश्मीरमध्ये समाजसेवेद्वारे शांततेचा संदेश पोहचवण्याच्या उद्देशाने सरहदची स्थापना करण्यात आली. काश्मीर मधील दहशतीच्या वातावरणात होरपळलेली मुले-मुली या संस्थेत आणली जातात. येथे त्यांच्या राहण्या-खाण्या पासून मोफत शिक्षणाची सोय केली जाते. पुण्यातील कात्रज परिसरातून या संस्थेचे काम चालते.