'या' दरगाहच्या आवारात ५० वर्षांपासून साजरा होतोय गणेशोत्सव

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
खातगुणमधील दर्ग्यात गणपतीची स्थापना
खातगुणमधील दर्ग्यात गणपतीची स्थापना

 

प्रज्ञा शिंदे
 
गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रभरात गणेशोत्सवाची मोठी लगबग सुरू आहे. गणेशोत्सवानिमित्त आपल्याला महाराष्ट्रात सर्वत्र धार्मिक सौहार्दाच्या आणि हिंदू मुस्लिम एकतेच्या अनेक कहाण्या पाहायला मिळतात. त्यापैकीच एक साताऱ्यातील खटाव तालुक्यातील खातगुण येथील.

 
खातगुण येथे पीर साहेब राजेबागसार या सुफी संताची दर्गा आहे. ही दर्गा महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. महाराष्ट्रभरातले हिंदू मुस्लिम भाविक या दर्ग्यात येतात.या दर्ग्याच्या परिसरात ‘गणेश सेवा मंडळ दर्गा’ हे मंडळ आहे. या मंडळाच्या माध्यमातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हे मंडळ आता ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. 
 
 
या दर्ग्याची एक आख्यायिका सांगितली जाते. त्याविषयी सामाजिक कार्यकर्ते सांगतात, " या गावातील मानाबाई नावाची एक सासुरवाशीण रोज रात्री आठदहा मैलावर असलेल्या वडगाव या आपल्या माहेरी असलेल्या मुस्लिम साधुपुरुषाला भेटायला जायची. तिची श्रध्दा आणि निसिम भक्ती पाहून ते साधुपुरुष म्हणजे पीरसाहेब राजेबागस्वार, खातगुण मधील लिंबाच्या झाडात प्रकटले. त्या झाडाचे खोड आजही काचेच्या पेटीत श्रद्धेनं बंदिस्त करून ठेवले आहे. त्याच्या शेजारी पीरसाहेब राजेबागस्वार यांचा दर्गा आहे. दर्ग्यासमोर मानाबाई व तिची सून ताराबाई यांच्या समाधी आहेत. दर्ग्यावर चादर चढविणारे बहुतांशी भाविक हे हिंदू म्हणवणाऱ्या समाजातील आहेत."
 

 
राजेबागसार दरगाह परिसरात गणेश मंडळाची स्थापना करण्यात शामराव उत्तम लावंड, लालासो शंकर लावंड, दत्तात्रय पांडुरंग गाडगे आदींनी पुढाकार घेतला. दरगाह व्यवस्थापन आणि मुस्लीम समाजाने त्याला तात्काळ हिरवा कंदील दिला आणि १९७५ मध्ये दरगाहच्या आवारातच ‘गणेश सेवा मंडळ दर्गा’ मंडळ दरगाहची स्थापना झाली. या दर्ग्याची देखभाल आणि व्यवस्थापण (मुजावर) लावंड हे हिंदू कुटुंबीय पाहतात. ही घटना भारतामधील विविधतेतील एकतेच्या तत्त्वाची प्रत्यक्ष प्रचिती देणारी आहे.
 

 
गावात सुमारे ७०-८० हिंदू कुटुंबे तर ५ ते ६ मुस्लीम कुटुंबे आहेत. मात्र तरीही येथे पीरसाहेब राजेबागसार दर्ग्याचा उरूस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मंडळाचे कार्यकर्ते प्रवीण लावंड सांगतात, “यावेळी राज्यभरातून शेकडो भाविक उरुसानिमित्त इथे येतात. सर्वधर्मीय नागरिक इथं येऊन राजेबागसार यांच्या दरबारात मन्नत म्हणजे नवसही मागतात.”
 
 
पुढे उरुसाबद्दल सांगताना ते म्हणतात, “राजेबागसार दर्ग्याचा उरूस तब्बल पाच दिवस चालतो. राज्यभरातील हजारो भाविक या काळात दरगाहला भेट देतात. या पाच दिवसात प्रत्येक दिवशी विशिष्ट कार्यक्रम असतो. पहिल्या दिवशी दरगाहला चुना मारला जातो. तर दुसऱ्या दिवशी संदल म्हणजे चंदनाच्या उटी समाधीवर लावली जाते. तिसऱ्या दिवशी झेंडा पालखी गावभर फिरते आणि शेवटच्या दिवशी पाकळणी केली जाते.”
 
 
विविध सांस्कृतिक कार्यक्रम
१९७५ पासून सुरू असलेल्या या गणेशोत्सवामध्ये हिंदूंसह मुस्लिमांनीही महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सध्या वयोवृद्ध मंडळींनी धार्मिक सौहार्दाची ही धुरा नव्या पिढीकडे सोपवली आहे. नव्या पिढीतील ओंकार लावंड, अक्षय लावंड, प्रणव लावंड, शिवम जाधव, रशीद आतार, परवेझ आतार ही  सगळी मंडळी दहाही दिवस राबत असतात.

गणेशोत्सवावेळी दोन्ही समाजाचे बांधव दर्ग्याच्या आवारात मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांतर्गत धार्मिक उपासनेबरोबरच संगीत, नृत्य, नाटक, एकांकिका अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर उरुसात कव्वालीचाही जंगी कार्यक्रम असतो. त्यामुळे गावातील सामाजिक बंध आणखी घट्ट होतात. हा उत्सव केवळ गणपती पूजेपुरता सीमित नसून, तो गावातील एकता, सलोखा, आणि परस्पर आदराचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.

 
या उत्सवाच्या माध्यमातून निर्माण होणारी बंधुता आणि धार्मिक संस्कृती वर्षानुवर्षे गावकऱ्यांना जोडून ठेवत आहे. ही परंपरा नवीन पिढीला या एकतेच्या वारशाचा अनुभव देत असून, त्यांना एकोप्याचे महत्त्व शिकवत आहे. 

ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा
गणेश सेवा मंडळ दर्ग्याचे पदाधिकारी सुनील लावंड सांगतात, “हिंदू मुस्लीम सौहार्दातून या देवस्थानाची स्थापना झाली आहे. हिंदू-मुस्लीम समाजाचे अनेक सण या ठिकाणी एकत्र साजरे केले जातात. कोणताही दुजाभाव केला जात नाही.” 

पुढे ते म्हणतात, “ याठिकाणी उरूस ही मोठ्या उत्साहात साजरा होतो. पीरसाहेब राजेबागस्वार दर्गाचा उरूस मार्चचा शेवटचा आठवडयात किंवा एप्रिलचा पहिला आठवडयात असतो. यावेळी शेकडो भाविक उरुसाला एकत्र येतात.” 

दरवर्षी दरगाहला न चुकता भेट देणारे माजी आरोग्य पर्यवेक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते हाजी मुबारक शेख खातगुणच्या या धार्मिक परंपरेबद्दल भरभरून बोलतात. ते म्हणतात, "दरवर्षी हिंदू आणि मुस्लीम भाविक दरगाहला भेट देतात. नवससायास करतात. आपल्या आवारातच गणपती मंडळाला जागा देऊन दरगाह समितीने पन्नास वर्षांपूर्वी समाजापुढे मोठा आदर्श ठेवला होता. आज ही सौहार्दाची परंपरा सुरू आहे हे बघून मनाला निश्चितच बरं वाटतं."

 
या गावातील लोक केवळ सणाच्या वेळीच एकत्र येतात अस नाही, तर एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमातही मोठ्या आपुलकीने ते सहभागी होत असतात. हे सर्व गावकरी एक कुटुंब बनून गावात राहतात. इतर गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी खातगुण ग्रामस्थांचा आदर्श घेऊन आपापल्या गावात जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी एकत्र येवून प्रयत्नशील राहण ही सध्या काळाची गरज आहे.
 
हिंदू-मुस्लिम समाजाने एका छत्राखाली येऊन, श्रद्धा आणि विश्वासाच्या आधारावर सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक एकता टिकवून ठेवली आहे. खातगुण गावाने दिलेला हा सलोख्याचा सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक एकतेचा संदेश फक्त खटाव तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आदर्श उदाहरण आहे. धार्मिक वातावरण गढूळ झालेल्या काळात ही सामाजिक समरसता खऱ्या अर्थाने सुखावणारी आहे.
 
-प्रज्ञा शिंदे

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter