मुस्लिमांच्या आरक्षणाची लढाई लढतच राहणार - मनोज जरांगे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
मनोज जरांगे
मनोज जरांगे

 

मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा कळीचा मुद्दा ठरला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे निवडणूक लढवण्यावर कालपर्यंत ठाम होते. मात्र आज अचानक त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. वारंवार माघारीवरून विरोधकांनी जरांगेंवर आरोप सुरू केले आहेत. याबाबत जरांगे यांनी स्पष्ट केलेली भूमिका.

जरांगे राजकीय मैदानात उतरणार अशी चर्चा सुरू होती. तुम्ही अचानक निवडणूक न लढविण्याचा निर्णय का घेतला ?
- मी माघार घेतली नाही. एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे लक्षात आले. कठोर मेहनत घेऊन दलित, मुस्लिम संघटनांना सोबत घेण्याचे समीकरण जुळले होते. आमची पहाटेपर्यंत चर्चा झाली. मतदारसंघ निश्चित झाले. त्या संघटनांकडून नावांची वाट पाहत होतो. पहाटेपर्यंत त्यांची यादी आली नाही. आमच्या बांधवांची यादी तयार होती.

आनंदराज आंबेडकर-मुस्लिम संघटना तुमच्यासोबत होत्या. त्यांची नावे का नाहीत ?
- त्यांच्याकडून नावे आली होती. तेही सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत. त्यांना कुठे अनुभव आहे? आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करूनही जुळले नाही. मराठे-मुस्लिम धनगरांना आरक्षम मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही.

तुम्ही मुस्लिमांनाही आरक्षणाची मागणी केली आहे. ते कितपत शक्य वाटते ?
- राज्यातील जनतेला आपले मानले, कायदा आणि संविधान मानल्यास मुस्लिमांनाच नव्हे, तर सर्वांनाच आरक्षण मिळू शकते. याचे उदाहरण म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने सोळा जाती आरक्षणात ढकलल्या, ज्या कधीच आरक्षणात जाऊ शकत नव्हत्या. आम्हाला पंधरा महिने झाले तरी आरक्षण मिळत नाही. एखाद्या समाजाविषयी द्वेष, वाईट भावना नसावी.


तुम्ही मुंबईपर्यत मोर्चा आणून माघार घेतली. निवडणूक लढविण्याची घोषणा केलीत आणि माघार घेतली, सातत्याने उपोषणाला बसता आणि माघार घेता. तुम्ही सातत्याने माघार घेतात असा विरोधकांकडून आरोप होत आहे.
-विरोधकांना आरोप करण्याशिवाय काम काय आहे? ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण हवे आहे. कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार नाही. उपोषण केल्यानंतर सरकारने अधिसूचना काढली. त्यानंतरही तिथे बसून दंगली करायला हव्या होत्या का? समाजासाठी इमानदारीने लढतोय आणि यापुढेही लढत राहील. राजकारण आमचा खानदानी व्यवसाय नाही, मराठा-दलित-मुस्लिम एकत्र यायला तयार झाले होते, म्हणून निवडणूक लढवण्याचा विचार होता. गोरगरिबांचे पाच-दहा निवडून गेले असते तर ते काय आरक्षण घेऊन आले असते ? अन्याय मांडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते.

तुम्ही निवडणूक लढविणार नाही, मात्र उमेदवार पाडण्याची भूमिका कायम आहे का ? 
- याविषयीची भूमिका लवकरच जाहीर करू सर्वांनी उमेदवारी अर्ज काढून घ्यावेत. आपल्याला संपवायला निघाले होते, त्यांना संपवून टाकायचे, आम्ही महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष किंवा इतर कोणालाही पाठिंबा देणार नाही. पाडायचे की निवडून आणायचे हे तुम्हीच ठरवा.

फडणवीसांना अनेकदा शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविषयी काय भूमिका ? 
- ते बोलल्यास सोडायचेच नाही. आम्ही पंथरा महिने आंदोलन करतो आहोत. फडणवीसांनीच आमच्या छाताडावर बसून सोळा नाती आरक्षणात घेतल्या; परंतु आम्हाला दिले नाही. फडणवीसांइतकी हीन वागणूक आणि अपमान मराठ्यांचा कोणी केला नाही. महिलांवर हल्ला करणारा आणि लाखो लोकांवर केलेस करणारा हा पहिला माणूस आहे. पुन्हा मराठ्यांविषयी काही बोलल्यास सुपडा साफ करायला सुरुवात करेल.

मंत्रिमंडळाने आणि मुख्यमंत्र्यांनी सोळा- सतरा जातींना आरक्षण दिले. आरक्षण देणे फक्त फडणवीसांच्या हातात होते का ?
- त्यांच्याच हातात आहे सगळे. खिसेकापू, चोर जमा करून सरकार बनवले. मराठ्यांचा द्वेष करणारा हा माणूस असल्याचे मराठा समाजाच्या लक्षात आले आहे.

तुम्ही भाजपविरोधी आहात, असा अर्थ यातून निघतो आहे.
- मी भाजपविरोधी नाही. भाजपमधले काही लोक चांगले आहेत. भाजपमधलेच लोक त्याच्यावर नाराज आहेत. त्याचे ऐकले नाही, तर तुरुंगात टाकतो. सत्तेत आल्यावर तुरुंगात टाकायचे काम करतो. त्यांनी भाजपलाही संपवून टाकले. 

तुमचे विरोधक लक्ष्मण हाके आरोप करतायत की, बारामतीमधून तुम्हाला निवडणूक लढवू नका म्हणून निरोप आला. 
- त्याला मी विरोधकही मानत नाही. त्याला उत्तरही देणार नाही.

काही उमेदवारांच्या विरोधात तुम्ही थेट समाजाला 'यांना पाड़ा,' असे सांगणार का?
- मराठ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देतील आणि व्हिडिओग्राफी करून आश्वासन देतील त्यांना पाठिंबा दिला जाईल. त्यांचे व्हिडिओ आम्ही सार्वजनिक करणार नाही, कारण त्यामुळे त्यांना इतर समाजाची मते मिळणे अवघड जाईल. मराठ्यांशिवाय राज्यात कोणी निवडून येऊ शकत नाही. लिहून घेतल्याशिवाय कोणालाही सहकार्य करायचे नाही.