भारतीय लष्कराने वाचवले ५०० जणांचे प्राण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 6 Months ago
पर्यटकांना मदत करताना सैनिक
पर्यटकांना मदत करताना सैनिक

 

भारतीय लष्कर प्रत्येक वेळी आपली ताकद सिद्ध करताना दिसतात. देशाला शत्रूंपासून वाचवायचे असो किंवा देशवासीयांना संकटातून सोडवायचे असो, सेना नेहमीच आघाडीवर असते. असाच आणखी एक पराक्रम या शूर जवानांनी केला आणि त्यांनी आपला जीव धोक्यात घालून बर्फात अडकलेल्या ५०० लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे.

प्रकरण आहे सिक्कीममधील भारत-चीन सीमेवरील नाथुला येथील. मुसळधार बर्फवृष्टीमुळे येथे अडकलेल्या ५००हून अधिक पर्यटकांची बुधवारी सुटका करण्यात आली. लष्कराने अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. निवेदनानुसार, पूर्व सिक्कीममध्ये अचानक झालेल्या बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या ५०० हून अधिक पर्यटकांची लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांनी सुटका केली.

निवेदान म्हटले आहे की, त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांना तेथे बचावासाठी पाठवण्यात आले आणि अडकलेल्या पर्यटकांना मदत केली. पर्यटकांना गरम अन्न आणि त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली आणि त्यांना सुरक्षित वाहतूक प्रदान करण्यात आली. त्रिशक्ती कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर संबंधित काही छायाचित्रे देखील शेअर केली आहेत.

या पोस्टमध्ये लिहिले, 'अचानक सुरू झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे नाथुलामध्ये ५०० हून अधिक पर्यटकांना घेऊन जाणारी सुमारे १७५ वाहने अडकली. 'त्रिशक्ती कॉर्प्सचे जवान शून्य तापमानात घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली. तत्काळ औषध, गरम अन्न आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली. हिमालयातील सीमेचे रक्षण करणारी त्रिशक्ती कॉर्प्स पर्यटकांना आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.