जनार्दन स्वामींचे गुरु अवलिया संत चाँद बोधले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 18 d ago
देवगिरी किल्ल्यासमोरील शाही हमामच्या मागे असलेली चाँद बोधले यांची दर्गा (समाधी)
देवगिरी किल्ल्यासमोरील शाही हमामच्या मागे असलेली चाँद बोधले यांची दर्गा (समाधी)

 

केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर भारत देशाचाच इतिहास सलोख्याचा आहे. संतांनी ही सलोख्याची वीण घट्ट करण्यासाठी प्रयत्न केले. वेगवेगळ्या धर्म, पंथांची शिकवण ही मानव कल्याणाचीच आहे, हे ते पटवून देत राहिले. त्यासाठी स्वतःच्याच आयुष्याचा आदर्श घालून दिला. असाच एकोप्याचा आदर्श म्हणजे देवगिरी अर्थात दौलताबाद किल्ल्यावरील सूफी संत चाँद बोधले ! त्यांचा समाधीवजा दर्गा आणि त्याने वर्षानुवर्षे टिकवलेल्या समन्वयाचा हा डोळ्यांत अंजन घालणारा इतिहास...

भरदुपारी दौलताबाद विम्याच्या दिशेनं निघालो. दुरूनच किल्ल्यातला प्रसिद्ध चाँदमिनार आपण किती अंतरावर आहोत हे सांगत होता. जवळ पोहोचत असतानाच रस्त्यालगतचा परिसर एका ऐतिहासिक भूमीत प्रवेश करीत असल्याचं सूचित करत होता. देवगिरी म्हणजे दौलताबाद इथं पोचताच आकाशात चोहोबाजूंनी ढगांची गर्दी झाली. 

पाऊस बरसणारच असं वाटू लागलं. तरीही पुढं जाऊन सूफी संत चाँद बोधले यांच्या समाधीवजा दर्ग्याकडे वळलो. खुलताबादकडं जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला किल्ल्याच्या समोरच शाही हमामच्या पाठीमागं या थोर संताचा दर्गा आहे. चाँद बोधले हे अवलिया संत म्हणजे संत जनार्दन स्वामींचे गुरू. जनार्दन स्वामी म्हणजे पैठणचे संत एकनाथ यांचे गुरू. त्यांचं नाव चंद्रबोध किंवा चंद्रभट असंही असल्याचं बोललं जातं.
 

 
 
संत जनार्दन स्वामी यांनी आपल्या या गुरूंची समाधी देवगिरी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या समोरच्या बाजूस शाही हमामच्या उत्तरेला बांधली आहे. कच्च्या रस्त्यानं हमामखान्याच्या बाजूनं या समाधीचा रस्ता जातो. एके काळी शाही स्नानाचा थाट चालणाऱ्या या हमामखान्याची इमारत राज्य संरक्षित स्मारक असली, तरी संवर्धनाअभावी काहीशा पडक्या स्थितीत आहे. पण आतून भक्कम आणि उत्तम नक्षीकाम केलेल्या कमानी लक्ष वेधून घेतात.

समाधी आणि दर्गा यांचा वेगळाच मिलाफ असलेल्या या ठिकाणी रमजानच्या तेराव्या रोजाला भजनासोबतच कव्वालीही सुरू असते. चाँद बोधले यांनी कादरी परंपरेतला सूफी संप्रदाय स्वीकारला होता. त्यामुळं त्यांची समाधी म्हणजे दर्गाही समजला जातो. भारतातीलच नव्हे, तर जगातील हा एकमेव हिंदू संताचा दर्गा आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात या दर्याचा उरूस भरतो. या निमित्ताने जो संदल निघतो (मिरवणूक) त्या वेळी वारकरी संप्रदायातील लोक भजनं म्हणतात आणि सूफी कव्वाल्या गायल्या जातात. एकीकडं देशभर भजन आणि कव्वालीवाले एकमेकांपासून दूर जात असल्याचं वास्तव, तर दुसरीकडं म्हणजे इथं चाँद बोधले यांच्या दर्यात आजही त्यांच्या पायथ्याशी भजन, तर उशाला कव्वाली चालते. सामाजिक एकोप्याचा इथला उजेड कथित धर्मरक्षकांसाठी एक चपराकच ठरावी.

पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून पर्यटक आला, तर तो देवगिरीला भेट देतोच. असं या ऐतिहासिक तसंच प्रचंड व्यापक असा सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या सूफी संतांच्या मठ, दर्गा अशा स्थळांचं महत्त्व आहे. आजूबाजूला ओसाड रान; पण दर्गा इथं शांतपणे बसायलाच भाग पाडतो. हे भारलेलं वातावरण माणसाला आत्मचिंतन करायला लावतं.
 
 

 
रमजान महिन्यातील रोजाच्या तेराव्या दिवशी चाँद बोधले यांच्या दर्यात चालणाऱ्या सामाजिक एकोप्याच्या कार्यक्रमाबद्दल विश्वंभर सुरेंद्र महाराज आनंदे यांनी सांगितलं, "गेल्या १३ वर्षांपासून मी इथं भजनाला असतो. हिंदू-मुस्लिम एकोपा दाखविणाऱ्या या उत्सवात सहभागी होताना खूप प्रसन्न वाटतं. आपण केवळ इथंच नव्हे, तर औरंगाबादेतील शहानूरमियाँ दर्गा इथंही भजनासाठी जात असतो. ही परंपरा पुढं सुरू ठेवण्याची जबाबदारी आपलीच तर आहे ना?" असा प्रश्नही त्यांनी केला. तसंच आपण संत तुकडोजी महाराज यांचीही भजनं म्हणतो, असंही ते म्हणाले. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात प्रबोधनाची परंपरागत माध्यमं अजूनही कालबाह्य झालेली नाहीत, हेच यावरून स्पष्ट जाणवत होतं.

चाँद बोधले यांनी ज्ञानेश्वरीची एक प्रत शेख महंमद यांना दिली आणि त्या प्रभावातून त्यांनी आपली ग्रंथरचना केली. दुसरे शिष्य जनार्दन स्वामी यांनाही चाँद बोधले यांनी अनुग्रह दिला. रा. चिं. ढेरे यांनी आपल्या 'मुसलमान मराठी संतकवी' या पुस्तकात शेख महंमदांवर लिहिताना चाँद बोधले यांचीही माहिती दिली आहे. डॉ. यु. म. पठाण यांच्या 'मुसलमान (सूफी) संतांचे मराठी साहित्य' या पुस्तकातही चाँद बोधले यांच्याबाबत माहिती दिली आहे. 

जनार्दन स्वामींना साक्षात गुरू श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह मिळाल्याचे म्हटले जाते. पण 'चाँद बोधले हेच दत्तात्रेयांचे रूप आहे. दत्तात्रेयांनी मलंग वेशात जनार्दन स्वामींना दर्शन दिलं याचाच अन्वयार्थ मलंग वेशातील चाँद बोधले यांनी दर्शन दिलं,' असा अभ्यासक लावतात. शेख महंमद यांचा 'योगसंग्राम' हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. या ग्रंथात त्यांनी स्पष्टपणं म्हटलं आहे.

ॐ नमो जी श्री सद्‌गुरू चाँद बोधले।
त्यांनी जानोपंता अंगीकारले।
जनोबाने एका उपदेशिले ।
दास्यत्वगुणे।। (योगसंग्राम १५.१)

या मौल्यवान ऐतिहासिक समाधी स्थळाची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे. समाधीस्थळी जाण्यास चांगला रस्ता नाही. समाधीचे तीन कमानींचे, नक्षीदार भव्य कोरीव खांबांचे भक्कम बांधकाम आता ढासळत चालले आहे. पावसाळ्यात इथं जाणं ते चिखल तुडवतच. या कमानींचे खांब कर्नाटकातील बेलूर हळेबिडू हिंदू मंदिरांतील खांबांसारखे आहेत. बाजूच्या जिन्यावर पानाफुलांची सुंदर नक्षी कोरलेली आहे. ते दगडदेखील आता ढासळत आहेत. 

समाधी मंदिर हिंदू परंपरेप्रमाणे पूर्वेला तोंड करून आहे. या समाधीवर अखंड दिवा तेवत असतो. दक्षिणेकडे पायथा, तर उत्तरेकडे माथा अशी याची रचना आहे. चाँद बोधले यांचे शिष्य जनार्दन स्वामी निजामशाहीत किल्लेदार होते. तेव्हा त्यांनीच हे बांधकाम केलं असावं, असं म्हटलं जातं. चाँद बोधले यांनी शेख महंमद या शिष्यास जो अध्यात्माचा धडा दिला त्यातून एक समन्वयवादी मांडणी त्यांनी केली. आपल्या या शिकवणुकीचा उल्लेख शेख महंमदांनी करून ठेवलेला आहे.

अविंध यातीस निपजलो।
कुराण पुरोण बोलो लागलो।
वल्ली साधुसिद्धांस मानलो।
स्वतिपरहिता गुणे। (योगसंग्राम १६.६६)

अशा या सिद्धपुरुषाची समाधी हा एक मोठा आध्यात्मिक, सामाजिक, ऐतिहासिक वारसा आहे; पण तो जतन करण्याकडं आपलं लक्ष का जात नाही, हे अनाकलनीय आहे. या समाधीस्थळाची स्थानिक भक्तांनी आपल्या परीने देखभाल सुरू ठेवली आहे.
 
 

 
या वास्तूची रचनादेखील वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय आहे. याचे वैशिष्ट्यपूर्ण खांब दुसऱ्या दर्यांमध्ये आढळत नाहीत. यांची रचना ज्या काळात झाली, तो काळ शोधून त्याप्रमाणे कर्नाटकातील बेलूर-हळेबीडू येथील काळाशी तो कसा जुळतो याबत संशोधन व्हायला हवे. तसेच इथल्या पानाफुलांच्या नक्षीकामाचेही संदर्भ शोधायला हवेत. दक्षिण भारतात ज्या मुसलमानी राजवटी होत्या त्यांच्या ठायी हिंदूंबद्दल द्वेष नव्हता. उलट हिंदूंच्या कितीतरी चालीरीती या भागातील सूफी संतांनी कळत-नकळतपणे अंगिकारल्या होत्या, याचे कित्येक पुरावे जागाजागी आढळून येतात.
 


 
श्री. उमरीकर सांगतात, की पिराला नवस बोलण्याची परंपरा ही पूर्णत: हिंदू परंपरा आहे. याच चाँद बोधलेंच्या समाधीजवळ खुलताबादहून वेरूळला जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला दरीच्या पलीकडील डोंगरावर एक दर्गा आहे. या दर्यात डोके टेकवून तेथील साखर चाटली तर मूल बोलायला लागते, अशी श्रद्धा आहे. 'शक्कर चटाने की दर्गा' असेच नाव या दर्याला आहे. आता या श्रद्धा पसरल्या कशा? हे सूफी संत निजामुद्दीन औलिया यांच्या काळातील चिश्ती परंपरेतील संत होते, असं मानलं जातं. 

देवगिरी-खुलताबाद परिसरात अशा भरपूर ऐतिहासिक वास्तू आहेत. विखुरलेली काही जुनी बांधकामे आहेत. याच दर्याच्या मागच्या बाजूस निजामाच्या शहजादीच्या, सुनेच्या नावाने एक सुंदर, पॅगोडा पद्धतीनं बांधलेली कबर आहे. पण तिचं अफगाणिस्तानात निधन झालं. तिला परत इकडं आणलंच गेलं नाही. आता ही कबर नसलेली जागा पडीक आहे. अतिशय सुंदर अशा कमानी, वरच्या घुमटाला जाळीची नक्षी जी कुठेच आढळत नाही, उंचच उंच कमानी दरवाजा असं बांधकाम आहे. 

मोठ्या भव्य चौथऱ्यावर ही इमारत आजही शाबूत आहे. या कबरीच्या आतील अष्टकोनी रचना वास्तुशास्त्राच्या दृष्टीने मोठी देखणी आहे. अष्टकोनी रचना या हिंदू वास्तुशास्त्राच्या प्रभावातून आल्याचे मानले जाते. हे सगळं त्या विषयातील तज्ज्ञांनी अभ्यासून मांडले पाहिजे. यावर लिहिलं गेलं पाहिजे. मात्र, हे काम होत नाही. यासाठी शासनानंच पुढाकार घ्यायला हवा; अन्यथा हा ऐतिहासिक संदर्भ पुसला जाईल, याची भीती वाटते.

येथील मोठी संरक्षक भिंत, भिंतीमध्ये सुंदर बलदंड बुरूज, देखणे दरवाजे असा हा सगळा परिसर म्हणजेच ऐतिहासिक ठेवा आहे.
चाँद बोधले यांचे शिष्य जनार्दन स्वामी यांचा एक किलोमीटर अंतरावर गावातच आनंदेवाडा नावाने मठ आहे. या मठात गेलो. तिथं या मठाचं काम पाहणाऱ्या पाचव्या पिढीतील उद्धव महाराज आनंदे यांना भेटलो. 

आपल्याकडील हे संत म्हणजे ऐतिहासिक खजिनाच आहे; पण आपण त्यांचे नीटपणे जतन करू शकलो नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जनार्दन स्वामींचे स्वतंत्र असे चरित्रच उपलब्ध नाही. एकनाथ महाराजांच्या चरित्रातच त्यांच्याबद्दलचे संदर्भ समोर येतात. जनार्दन स्वामींचा जन्म शके १४४५च्या दरम्यानचा. ते या देवगिरी किल्ल्यातच गुप्त झाले. ते दुर्गा तोफेच्या खालील ठिकाणी ध्यानधारणा करीत असत. आता त्याच ठिकाणास समाधीस्थळ असे संबोधले जाते. येथून १८३२ पासून पंढरपूरसाठी पालखी निघते. यासाठी जनार्दन स्वामी यांचे शिष्य एकनाथ महाराज यांचे वंशज येतात. 

मार्गशीर्ष वद्य एकादशीला इथं यात्रा भरते. यानिमित्ताने सात दिवस कीर्तन, भजन, प्रवचन असे अनेक कार्यक्रम होतात. परिसरातील अनेक गावांमधील मंडळी या सर्व कार्यक्रमांस हजेरी लावत भक्तिभावाची ही परंपरा जोपासत आहेत. चाँद बोधले यांच्या समाधीस्थळी १९७२ पासून भजन म्हणणारे दौलताबाद येथील गोरोबाकाका भजनी मंडळाचे शंकर जाधव आणि त्यांचे सहकारी रमजानच्या पवित्र महिन्यात १३ व्या रोजाला या ठिकाणी जाऊन भजन म्हणण्याची परंपरा जोपासत आहेत.

अब कुछ नई कहानी बोल।
बार बार यह सुना रहे हो।
खट्टे गन्हाणे छोड अब कोई नई कहानी बोल।
बहु जप किन्हो बहु तप किन्हो।
मनकी मन डोल अब कुछ नई कहानी बोल।
भेट पिया की कब हिना मिले। 
अना रस में रस घोल। 
कहे चांद बोधला देवगिरी है अनमोल। 
अब कुछ नई कहानी बोल।

असे सुंदर दोहे रचणारे कविवर्य संत चाँद बोधले, हे सूफी संतांमधील वरच्या स्थानी असलेले संत मानले जातात. ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याचे सुभेदार संत श्री जनार्दन स्वामी यांच्या कार्यकाळात संत कवी मानपुरी स्वामी, संत चाँद बोधले यांनी काव्यरचना करत समाजाला दिशा देण्याचे काम केले.

जब ईश्क है अल्लाह से तो कुफ्र क्या और इस्लाम क्यां। 
कुछ भेद उनमे है नहीं तो दुःख दर्द क्या और अरफ क्या।
देवल तथा मस्जिद किसके लिये पैदा करे।
आपस में लढते रहे तो दिल मे द्रोहता धरे।
 
अशा असंख्य काव्यरचना भजन स्वरूपात आजही इथं ऐकायला मिळतात. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या समाधीस्थळी मोठ्या संख्येने भाविक या अनोख्या प्रार्थनेचा अनुभव गाठीशी बांधण्यासाठी येत असतात. संत एकनाथ महाराजांचे गुरू आणि दौलताबादच्या जनार्दन स्वामी यांचे गुरू चाँद बोधले यांचे विचार, सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन देऊन जातात.

 

- राजेभाऊ मोगल

(पूर्वप्रसिद्धी - सकाळ विठाई विशेषांक २०१९)


 
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -