ईश्वरभक्ती आणि जनसेवेत लीन झालेल्या कीर्तनकार जैतुनबी सय्यद

Story by  Chhaya Kavire | Published by  admin2 • 21 d ago
जैतुनबी सय्यद उर्फ जयदास महाराज
जैतुनबी सय्यद उर्फ जयदास महाराज

 

समाज कायमच जात-धर्म-वर्ण-लिंग यांच्या भिंतींमध्ये अडकलेला असतो. मात्र एखादी संतप्रवृत्तीची व्यक्ती या प्रश्नांच्या विरोधात बंड करत आव्हानांना सामोरा जाते. जन्माने मुस्लिम; पण हिंदू संत परंपरेचा अभ्यास असणाऱ्या, समाजात सर्वधर्मसमभाव, समानता ही मूल्ये समाजात रुजावीत, अंधश्रद्धानिर्मूलन व्हावे, स्त्रीशिक्षण वाढीस लागावे यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या लावणाऱ्या एका मुस्लिम महिला-कीर्तनकाराची ही कथा आहे. वारकरी-संप्रदायातील या कीर्तनकार महिला म्हणजे जैतुनबी सय्यद ऊर्फ जयदास महाराज.

बारामतीतील माळेगाव येथे १९३० मध्ये जैतुनबी सय्यद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मकबूलभाई सय्यद हे व्यवसायाने गवंडी होते. एकदा मकबूलभाई यांची भेट वारकरी-संप्रदायातील गोविंदभाऊ यांच्याशी झाली. गोविंदभाऊ हे पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे गवंडीकाम करत असत. व्यवसाय मिळते-जुळते असल्याने दोघेही चांगले मित्र झाले आणि एकत्रच गवंडीकाम  करू लागले. दोघा मित्रांची कुटुंबे एकमेकांना सुख-दु:खांत साथ देत असत. कीर्तनकार गोविंदभाऊ यांना सर्व लोक 'गुण्याबुवा' म्हणत असत. ते काम करताना सदैव ‘जय जय रामकृष्णहरी’ हा जयघोष करत असत. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांनाही त्यांनी ‘रामकृष्णहरी’चा छंद लावला होता. अशा वातावरणात लहानग्या जैतुनबीवर वारकरी-संस्कार झाले. त्यांना कीर्तनाची गोडी लागली आणि त्या गुण्याबुवांसमवेत भजन-कीर्तनात रंगू लागल्या.

दहा वर्षांच्या जैतुनबी भजन-कीर्तनात भाग घेऊ लागल्या. दरम्यान, त्यांची भेट संत हनुमानदास यांच्याशी झाली. त्यांना गुरू मानून जैतुनबी यांनी वारकरी-विचारांची पताका खांद्यावर घेतली. बारामतीच्या घाणेकर बुवांकडून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. जैतुनबी यांना मुल्ला-मौलवींकडून व घरच्यांकडून तीव्र विरोध होऊ लागला. त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली गेली, पण त्यांनी वारकरी-पंथ सोडला नाही. ‘भक्तांना जात नसते, तर अंत:करणातील भक्ती-प्रेमाचा सच्चेपणा हीच त्यांची खरी कसोटी असते,’ असा सल्ला तिला हनुमानदास यांनी जैतुनबी यांना दिला. तो गुरुपदेश मानून त्यांनी  काम सुरू ठेवले. त्यांच्या भक्तीतील सच्चेपण ओळखून हनुमानदास यांनी त्यांना 'जयदास महाराज' असे नाव दिले. जैतुनबी यांचा विशेष म्हणजे नमाज, रोजे आदी इस्लामी धार्मिक विधीही त्या नित्यनेमाने करायच्या. 


आजही समाजात स्वतःचे निर्णय घेण्याचा महिलांचा अधिकार नावापुरताच असताना त्या काळी जैतुनबी यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर ठाम राहिल्या. लग्न न केल्याने त्यांना समाजाकडून रोषही पत्करावा लागला. पण कशालाच न जुमानता त्यांची भक्तिसाधना सुरूच राहिली. त्यांनी आयुष्यभर वारकरी-संप्रदायाचा प्रसार केला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून त्यांनी आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास सुरुवात केली. जैतुनबी सायकलवरून गावोगावी जात व कीर्तने करत असत. त्यांची रसाळ वाणी आणि सुस्पष्ट विचारांमुळे त्यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात स्वतःची दिंडी घेऊन त्या सहभागी होत असत. आता ही दिंडी त्यांच्याच नावाने ओळखली जाते. या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होतात. 

१९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनात जैतुनबी यांनी भाग घेतला होता. प्रभातफेऱ्यांमध्ये देशभक्तिपर गीते म्हणण्यात बालकुमार स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्या पुढे असत. स्वातंत्र्यलढ्यातील एका प्रसंगी माधवराव बागल यांच्या सभेत जैतुनबी यांनी पोवाडा गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर बागल यांनी लहानग्या जैतुनबीला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापुढे उभे केले. जैतुनबी यांची धिटाई पाहून नाना पाटील यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यामुळे अधिकच उत्साही होऊन जैतुनबी गावोगावी फिरू लागल्या व राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग नागरिकांमध्ये चेतवू लागल्या. या लढ्यादरम्यान त्यांनी रचलेले अनेक पोवाडे लोकप्रिय झाले.

तरुण जैतुनबी लढ्यासाठी स्फूर्तिगीते गात गावोगाव फिरू लागल्या. पुण्याजवळच्या उरुळीकांचन येथील निसर्गोपचारकेंद्रात महात्मा गांधी यांचा मुक्काम असताना त्यांच्यासमोर जैतुनबी यांनी पोवाडा सादर केला होता. अध्यात्माची आणि वारकरी-संप्रदायाची ताकद त्यांच्या लक्षात आली होती. सामाजिक प्रश्नांवरच्या अभ्यासपूर्ण व रसाळ-श्रवणीय कीर्तनांमुळे जैतुनबी अवघ्या २४ वर्षांच्या असतानाच हनुमानदास यांनी दिंडीचा सर्व कारभार त्यांच्याकडे सोपवला. विशेष म्हणजे, पालखीत महात्मा गांधी यांचा फोटो ठेवून जैतुनबी वारीत सहभागी होत असत. 

आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही वारी त्या करत असत. पंढरपूरच्या वारीसाठी त्यांची दिंडी सासवडपासून प्रस्थान ठेवत असे. संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीमागे एक मैल अंतर राखून ही दिंडी चालत असे. जैतुनबी यांच्या कीर्तनाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांडात न अडकणे. कर्मकांडाचा बडेजावपणा त्या कटाक्षाने टाळत असत. त्यांच्या खणखणीत आवाजामुळे व रसाळ कथनशैलीमुळे त्यांची कीर्तने भक्तांना खिळवून ठेवत असत. त्यांच्या कीर्तनांमध्ये सामाजिक आशय असायचा. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांवर त्या भाष्य करत असत. त्यांच्या कीर्तनांमध्ये स्त्रीशिक्षणावर भर असे. स्त्रियांची कोंडी फोडण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असायचा. अंधश्रद्धानिर्मूलन, स्त्रीशिक्षण यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी आयुष्यभर जनजागृती केली.

विठ्ठलभक्ती आणि राष्ट्राची आजची गरज यांचा सुरेख मिलाफ जैतुनबी यांच्या कीर्तनांत असायचा. खेड्यातील स्त्रियांच्या अडाणीपणाविषयीचा, त्या स्त्रिया साक्षर नसल्याविषयीचा कळवळा त्यांच्या प्रबोधनातून दिसायचा. संत मीराबाईपासून ते संत कान्होपात्रा यांच्यापर्यंत सर्वांच्या भक्तीचा महिमा सांगून जैतुनबी श्रोत्यांना दंग करत असत. 

कोणाच्याही विरोधाला न जुमानता जैतुनबी मानवतेच्या ऐक्याचे कार्य करीत राहिल्या. देशावर, संस्कृतीवर  प्रेम करत मानवताधर्माचा विचार त्यांनी लाखोंच्या श्रोतृसमुदायासमोर जाहीरपणे मांडला. ‘‘प्रत्येक धर्म मानवतेचे आणि शांततेचे शिक्षण देत असतो. धर्माचा लढा अधर्माशी असतो. समाजात मानवता हाच एक धर्म आहे. हिंदू-मुस्लिम असा भेद करू नका. अहंकार, अंधश्रद्धा, स्वार्थ यांना तिलांजली द्या. चांगली संगत केलीत तर जीवन सुखी होईल,’’ असा साधा-सोपा संदेश त्या देत असत. ‘आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नही, लेकीन खुदा के नूर से आदम जुदा नही’ याची जाणीवही त्या सतत करून देत असत.

जैतुनबी यांच्या कीर्तनांत मानवताधर्माचा प्रसार केला जात असे. सत्य, प्रामाणिकपणा, सौहार्द, सामाजिक एकता, सामाजिक सलोखा या विषयांवर त्या संतवचनांच्या आधारे खूप सोप्या शब्दांत उपदेश करत असत. कीर्तने करून जे मानधन त्यांना मिळत असे, त्यातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामांना मदत केली. आळंदी-पंढरपुरात मठ बांधले. कल्याणजवळच्या 'हाजी मलंग' दर्गाहच्या पायऱ्या बांधण्यासाठी १९६० मध्ये त्यांनी दीड लाख रुपयांची मदत केली होती, तर पंढरपुरातील त्यांच्या मठात अन्नदानाचे कार्य आजही सुरू आहे. 

गुरू हनुमानदास यांच्याबरोबर वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू केलेला वारीचा नियम जैतुनबी यांनी हयात असेपर्यंत कसोशीने सांभाळला. ७  जुलै २०१० रोजी वारीदरम्यान - पालख्या पुण्यात असताना - त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. संत ज्ञानेश्वरमहाराज-संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांबरोबर त्यांनी एकसष्ट वर्षे वारी केली. वारीमध्ये भजन-कीर्तन करत संत विचार सर्वसामान्य भक्तांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या अविरतपणे करत राहिल्या. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये जैतुनबी यांच्याविषयी मोठा आदर आहे.
 
- छाया काविरे 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

 

Awaz Marathi Twitter