अफगाणिस्तानवर पाकिस्तानचे हवाई हल्ले; भारताने व्यक्त केला तीव्र निषेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताने रविवारी अफगाणिस्तानच्या भूभागावर पाकिस्तानने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीने या हल्ल्यांचे वर्णन पाकिस्तानचा अंतर्गत अपयश बाहेर ढकलण्याचा आणखी एक प्रयत्न असे केले असून अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी आपला पाठिंबा पुन्हा व्यक्त केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, "पवित्र रमजान महिन्यात अफगाण भूभागावर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह अनेक नागरिकांचा बळी गेला आहे."

या विषयावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, "आपल्या अंतर्गत अपयशांचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा पाकिस्तानचा आणखी एक प्रयत्न आहे. भारत अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्याला दिलेल्या समर्थनाचा पुनरुच्चार करतो."

देशातील अलीकडील बंडखोर हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी अफगाणिस्तानमधील किमान ७ दहशतवादी तळांना लक्ष्य करून हे हवाई हल्ले केल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. या लष्करी हल्ल्यांमध्ये किमान ७० दहशतवादी मारले गेल्याचा दावा इस्लामाबादने केला आहे.

पाकिस्तानचे गृहराज्यमंत्री तलाल चौधरी यांनी जिओ न्यूजशी बोलताना सांगितले की, "अफगाणिस्तान दीर्घकाळापासून दहशतवादाची निर्यात करत आहे. आपल्या नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान सर्व आवश्यक पावले उचलत आहे."