निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात झाले इतके टक्के मतदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

देशभरामध्ये आज तिसऱ्या टप्प्यात अकरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९३ मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२.७० टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमधील किरकोळ हिंसाचाराच्या घटना वगळल्या तर सर्वत्र शांततेमध्ये मतदान पार पडले. आसाममध्ये ७५.६७ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७३.९३ टक्के तर महाराष्ट्रात ४८ पैकी ११ मतदारसंघात ५८.२५ टक्के मतदानाची नोंद झाली. बिहारमध्ये मतदानाच्या टक्क्यांत वाढ झाली असून हा आकडा ५७.२३ टक्क्यांवर गेला आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील निशाण उच्च माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदान केले तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याच शहरातील नारनपुरा भागात कुटुंबीयांसह मतदानाचा हक्का बजावला. अमित शहा हे गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. येथे मतदानासाठी आलेल्या पंतप्रधान मोदी यांचे स्थानिक लोकांनी जोरदार स्वागत केले. एका वृद्ध महिलेने त्यांना राखी बांधली. मोदींची स्वाक्षरी घेण्यासाठी लहान मुलांचीही झुंबड उडाली होती. देशाची निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक व्यवस्थापन यातून अन्य देश खूप काही शिकू शकतात अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत क्रमश: ६६.१ टक्के आणि ६६.७ टक्के इतके मतदान झाले होते.

शहांकडून पूजा अर्चा
अमित शहा यांनी मतदान करण्यापूर्वी पत्नी सोनल यांच्यासोबत कामेश्वर महादेव मंदिरात पूजाअर्चा केली. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यांनी मैनपुरीमध्ये मतदान केले. डिंपल या मैनपुरीमधून निवडणूक लढवीत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे मतदान केले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हावेरीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. बोम्मई हे हावेरीतील भाजपचे उमेदवार आहेत.

शिवराज यांनी केले मतदान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विदिशातून मतदान केले. येथूनच ते निवडणूक लढवीत आहेत. पोरबंदरमधील भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी सकाळीच मतदान केले. तिसऱ्या टप्प्यात आसाममधील चार तर पश्चिम बंगालमधील आठही मतदारसंघात भरभरून मतदान झाले. जांगीपूरमधील भाजपचे उमेदवार धनंजय घोष आणि तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांची झटापट झाली.