मोहल्ला आणि मस्जिदींमध्ये ग्रंथालय सुरु करणारी मरियम मिर्झा

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 6 Months ago
बालवाचनालयाची माहिती देताना मरियम मिर्झा.
बालवाचनालयाची माहिती देताना मरियम मिर्झा.

 

नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. व्रत-वैकल्ये केली जातात. महिलांच्या शौर्याची आणि धैर्याची अनेक उदाहरणे आपल्याला भारतीय संस्कृतीत मिळतात. वर्तमानकाळातही वेगवेगळ्या क्षेत्रांत शौर्य गाजवणाऱ्या असंख्य कर्तुत्वत्वान महिलांनी क्षितीज व्यापलेले आहे. या नवरात्रामध्ये 'आवाज मराठी'वरून अशाच काही कर्तुत्ववान मुस्लीम महिलांची ओळख करून दिली जाणार आहे. आपल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या अशाच एका मुलीच्या कार्याची ओळख करून देणारा हा विशेष लेख. 

 
कोरोना काळात गल्ली-मोहल्ल्यातील मुलांसाठी स्वतः च्या पुस्तकांपासून छत्रपती संभाजीनगरच्या बायजीपुरा गल्ली येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या नावाने एका मुलीने बालवाचनालय सुरू केले. एकीकडे दिवसेंदिवस मुलं वाचनापासून लांब जात असताना मुलांना पुन्हा पुस्तकांच्या जगात नेण्यासाठी ‘पैसा वाचवा, पुस्तक वाचा’ असे म्हणत ग्रंथालयाचे साकडे घालणारी ही १४ वर्षीय मुलगी आहे मरियम मिर्झा.

मरियम सध्या छत्रपती संभाजीनगरच्या इकरा उर्दू गर्ल्स हायस्कूल येथे शिकत आहे. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी तीने मोहल्ला बालवाचनालय अभियानाची सुरवात केली. तीच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची दखल घेण्यात आली. नुकतेच ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लिम्स ऑफ इंडियन ओरिजिन (एएफएमआय) यूएसए आणि कॅनडा’ यांच्या वतीने ‘विशेष सामाजिक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. दिल्ली नगर निगम सिवेक सेंटरच्या दीनानाथ सभागृहामध्ये आयोजित ३३ व्या आंतरराष्ट्रीय वार्षिक समारोहात दिल्लीचे माजी राज्यपाल लेफ्टनंट जनरल नजीब जंग यांच्या हस्ते तीला पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर, नुकतेच 'असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स' या संस्थेच्या वतीने तिला दिल्ली येथेच 'चेंजमेकर ऑफ दी इयर' हा पुरस्कारही मिळाला. 

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल? यासाठी तिचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी काही वेळा विद्यार्थ्यांना मोफत गल्ले वाटप केले जातात, ज्यामध्ये मुले पैसे गोळा करतात आणि या पैशातून त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करतात. तर, कधी ‘घर घर किताब, हर घर में किताब’ या मोहिमेअंतर्गत परिसरात अभ्यासासाठी पुस्तके देखील वाटली जातात. शहरातील विविध गल्ली मोहल्ला व झोपडपट्टीतील गरीब व कामगारांच्या मुलांसाठी ‘रीड ॲण्ड लीड फाउंडेशन’च्या सहकार्याने व ‘फेडरेशन ऑफ ऑल मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशन’च्या मार्गदर्शनाने तीने दोन वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३६, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे ५, तर परभणी येथे १५ असे एकूण ५६ बालवाचनालये सुरू केली आहेत. मरियमने मशिदीतही बालवाचनालये सुरु केली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या ३६व्या बालवाचनालयाचे उद्घाटन पडेगाव येथील अतहर मस्जिद येथे करण्यात आले होते. 

मरियमचे वडील मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांचे पुस्तकांचे दुकान आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ती पुस्तकांच्या सहवासात आहे. मरियम इ. ५ वीच्या वर्गात असताना तिने एका ग्रंथालयाला भेट दिली. त्यावेळेस मित्र शेरखान पठाण याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ग्रंथालय सुरु करण्याची कल्पना तिच्या बालमनात आली आणि तिने तिच्या वडिलांकडे हट्ट सुरू केला. तिचे वडील लगेच तयार झाले. त्यावेळेस तिच्याकडे फक्त १५० पुस्तके होती. तिच्या वडिलांनी तिला अजून १५० पुस्तके दिली आणि अशा ३०० पुस्तकापासून सुरू झाले ‘बालग्रंथालय’. 

ग्रंथालय सुरू करताना तिला अनेक अडचणी आल्या. नवीन पुस्तके खरेदी करायला पैसे नव्हते. ग्रंथालय सुरू करायला जागाही नव्हती. शिवाय, जागा भाड्याने घ्यायची कुवतही नव्हती. मात्र, या सर्व प्रश्नांवर मरियमने मात करत जागा व पुस्तकही मिळवली. तिच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी तिला जागा आणि पुस्तकही दिली. घरातील रिकाम्या खोल्या, ओटा, इतकंच काय तिच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे तिला ग्रंथालयासाठी मशिदीतदेखील जागा मिळाली. आता तिच्या तीस ग्रंथालयात दोन हजार पेक्षाही जास्त पुस्तके आहेत. तिची शाळा सुटली की ती ग्रंथालयाला भेट देते व दिवसभराचा आढावा घेते. बालग्रंथालय चालवायला तिचे वडील तिला मदत करतात. 

आताची पिढी वाचत नाही हे मरियमच्या वडीलांना मान्य नाही. ते म्हणतात, ‘‘बरेच पालक बाजारात जाऊन मुलांसाठी पुस्तके खरेदी करत नाहीत. पालक म्हणून आपण त्यांच्या हातात कधी पुस्तक देणार नसाल तर मुलं वाचत नाही हा त्यांच्यावर आरोपही लावायला नको. शहरांमध्ये अनेक ग्रंथालये आहेत पण ते फक्त तरुण आणि प्रौढांसाठी. आपल्याकडे बालग्रंथालय ही संकल्पना या आधी साकारण्यात आली नाही. बऱ्याच ग्रंथालयात तर मुलांना प्रवेशही नसतो.’’ तिच्या मैत्रिणींनासुद्धा तिचे कौतुक वाटते. त्यांना शाळेतल्या ग्रंथालयांऐवजी मरियमच्या ग्रंथालयातील पुस्तके जास्त आवडतात. तिच्या शालेय मैत्रिणी म्हणतात, ‘‘इथे आम्हाला नावनोंदणी करणे किंवा ओळखपत्र दाखवणे बंधनकारक नाही. पूर्ण शाळेला तिच्यावर गर्व आहे.’’ शहरातील या ग्रंथालय चळवळीची माहिती आता अनेकांना होत आहे. अनेक दात्यांनी तिला स्वतः हून मदतही केली आहे. ही चळवळ फक्त छत्रपती संभाजीनगर किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्याचा विस्तार देशभर व्हावा, असे मरियमला वाटते.

मरियमचे कौतुक करत खासदार इम्तियाज जलील म्हणतात, "मरियमचा छोटासा प्रयत्न तिचे मोठे विचार दर्शवितात. गरजेचे नाही की समाजासाठी काहीतरी करायला खूप पैसे हवे. काहीतरी करायची जिद्द असेल तर आपोआप रस्ते खुले होत जातात." मरियमने बाल वयात घेतलेली झेप बघून काही दिवसांपूर्वी थेट जर्मनीहून इलाना आणि डेफनी या दोन रिसर्च स्कॉलर्स तिला भेटायला छत्रपती संभाजीनगरला आल्या होत्या. तिची बालवाचनालयाची संकल्पना बघून त्यांनाही आश्चर्य वाटले. इतक्या लहान वयाच्या मुलीच्या मनात अशी कल्पना येणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या.    
 
 
 
ग्रंथालयाचे वैशिष्ट्य
ग्रंथालयाला कधीही कुलूप लावले जात नाही. मुलं येतात, पुस्तकं घेतात आणि वाचून झाली की प्रामाणिकपणे जागेवर परत आणून ठेवतात. पुस्तकं चोरीला गेली तरी तिला वाईट वाटत नाही कारण ज्ञानाची भूक असणारेच पुस्तकांची चोरी करतात, असं ती म्हणते. हजारो मुलांना या बालग्रंथालयाचा फायदा होत आहे. मुलं म्हणतात, ‘‘इथे आम्हाला शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त महापुरुषांच्या जीवनकथा, विज्ञानाच्या गोष्टी, थोरांच्या गोष्टी, कॉमिक्स वाचायला मिळतात. त्यामुळे वाचायची आवड निर्माण होते व सवयही लागते. आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त मुलांना या ग्रंथालयाचा फायदा झाला आहे.

- छाया काविरे ([email protected])  

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या कर्तुत्ववान मुस्लीम महिलांच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻


'डोंगरी के सब भाय शबानाताईसे डरते...!'

 

देशातील पहिली अंध रेडिओ-जॉकी डॉ. वृषाली शेख!


पालघरच्या शेख कुटुंबातील तिन्ही मुली समाजासाठी ठरताहेत प्रेरणास्रोत 


उपजिल्हाधिकारी वसिमा शेखचा संघर्षमय प्रवास! 


सावित्रीबाईंचे साहित्य उर्दूत आणणारी आजची सावित्री!

 


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube