रायना बरनावी बनणार सौदी अरेबियाची 'पहिली महिला अंतराळवीर'

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
रायना बरनावी
रायना बरनावी

 

२०१७ पासून सौदी अरेबियामध्ये अनेक पुरोगामी पावले उचलली गेली. त्यातलेच एक म्हणजे, सौदी अरेबिया आता एका महिलेला अंतराळमोहिमेवर पाठवणार आहे. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असून, २०२३ च्या डिसेंबरमध्ये रायना बरनावी ही महिला-अंतराळवीर अवकाशात झेपावेल. 'पुराणमतवादी' अशी अशी असलेली सौदीची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न युवराज महंमद बिन सलमान करत आहेत. त्यासाठी त्यांनी सामाजिक सुधारणांचा कार्यक्रमच आखला आहे. त्यातले हे एक महत्त्वपूर्ण 'अंतराळपाऊल' ठरणार आहे. एकेकाळी ज्या देशात महिला पुरुषाशिवाय घराबाहेर पडू शकत नव्हत्या, त्यांना गाडी चालवण्याचाही अधिकार नव्हता, तिथे आता एक महिला अंतराळवीर होणार आहे...या सगळ्या प्रवासाचा हा आढावा.   

- छाया काविरे 
- - - - - - - - - - -

अरेबिया द्वीपकल्पात कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या देशांचा समावेश होतो. या सर्व देशांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा देश आहे तो सौदी अरेबिया. शिवाय इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्का आणि मदिना ही तीर्थस्थळेही याच देशात आहे. त्यामुळे जगभरातील कोट्यावधी मुस्लिम दरवर्षी हजसाठी या देशाला भेट देतात. इस्लामचे प्रवर्तक महंमद पैगंबर यांचा जन्मही याच प्रदेशात झाला. त्यामुळे या देशाला मुस्लिम समाजात फार महत्त्वाचे स्थान आहे. 

सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून तेथे शरिया कायदा (मुस्लिम धर्मग्रंथ कुराण आणि त्यांच्या धर्मगुरूंनी वेळोवेळी काढलेले फतवे यांचा मिळून तयार झालेला कायदा) चालतो. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी. 

राजा, मंत्रिपरिषद आणि हुकूमशाही शासनावर देखरेख करणाऱ्या देशातील पारंपरिक अभिजात वर्ग यांच्यात सल्लामसलत करून सौदी अरेबिया येथे राजकीय निर्णय घेतले जातात. हा देश 'जी२०' त सहभागी असलेला एकमेव अरब देश आहे. सौदी अरेबियाला 'मुस्लिम जगाचा नेता' असेही मानले जाते. येथील अर्थव्यवस्था जगातील अठराव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 

३  मार्च १९३८ रोजी या देशात पेट्रोलियमचा शोध लागला आणि पूर्व प्रांतात इतर अनेक शोध लागले. त्यामुळे सौदी अरेबिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल-उत्पादक आणि जगातील सर्वात मोठा तेल-निर्यातदार देश आहे. मात्र, तेलाच्या जोरावर महत्त्वपूर्ण ठरलेल्या या देशात तेलाचा शोध लागला तरी कसा? 

...आणि एके दिवशी विहिरीला तेलाचा पाझर फुटला 
अब्दुल अजीज़ बिन सौदच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रदेशांवर ता. २० मे १९२७ रोजी ब्रिटनने राजवट मान्य केली. पुढे ता. २३ सप्टेंबर १९३२ रोजी शाह अब्दुल अजीज़ बिन सौद यांनी हिजाज आणि नज्द या प्रदेशांचे नाव बदलून 'अल्-मुमलीकत-अल्-अरेबिया-अल्-सौदिया' (आताचे सौदी अरेबिया) ठेवले. नव्याने स्थापन केलेले राज्य शाह अब्दुल अजीज़ बिन अब्दुल रहमान अल् सौद यांनी इस्लामिक स्वरूपात पुढे आणायचा प्रयत्न केला. यादरम्यान सौदीमध्ये तेलाचे साठे असल्याचे निष्पन्न झाले. हे तेल काढण्यासाठी १९३३ मध्ये 'कॅलिफोर्निया पेट्रोलियम कंपनी'शी करार झाला. मात्र, तेलाचे साठे शोधण्यात १९३८ पर्यंत कंपनीला यश आले नाही. अखेर निराश होऊन कंपनीने परत निघायचे ठरवले. आणि इतक्यात, सौदीच्या एका विहिरीला पाझर फुटला आणि त्यातून तेल बाहेर येऊ लागले. या तेलाचा लोंढा इतका मोठा होता की तज्ज्ञमंडळी ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झाली. ही घटना संपूर्ण अरब द्वीपकल्पाच्या दृष्टीने एखाद्या चमत्कारासारखी होती. आणि, येथूनच नवे ऐतिहासिक पर्व सुरू झाले. तेलाचा शोध लागल्यानंतर सौदी अरेबियाला आर्थिक स्थैर्य मिळाले.

सौदी अरेबिया हा उच्च मानवी विकास निर्देशांक असलेला देश आहे. इथे विद्यापीठाचे शिक्षण मोफत व सार्वजनिक आरोग्यसेवा विनामूल्य प्रदान केली जाते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत तेथे महिलांविषयीचे अनेक प्रतिगामी कायदे प्रचलित होते. महिलांवर अनेक बंधने असल्यामुळे जगभरातून सौदी अरेबियावर कायम टीका होत होती. मात्र, २०१७ पासून हे चित्र पालटू लागले. बत्तीसवर्षीय महंमद बिन सलमान हे सौदी अरेबियाच्या युवराजपदी आले आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी सुधारणावादी पावले उचलायला सुरुवात केली.  पर्यटन आणि मनोरंजन-उद्योगालाही प्राधान्य देण्यात आले. याअंतर्गत सुमारे दोन हजार 'सिनेमा-हॉल' सुरू करण्यात आले. 

महिला सशक्तीकरणासाठी नवीन पावले 
महिलांना सक्षम करण्यासाठी आणि सार्वजनिक जीवनात सामावून घेण्यासाठी इथे प्रयत्न केले जात आहेत. सौदी अरेबियाचे मनुष्यबळविकास मंत्री अहमद अल् राजी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 'मागील वर्षी राज्याच्या एकूण श्रमक्षेत्रात महिलांचा वाटा ३७ टक्के राहिला आहे, तर २०१८ मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली.'

सौदी अरेबियात महिलांच्या सशक्तीकरणाची मोहीम आखण्यात आली असून पुरुष सहकाऱ्याशिवाय प्रवासाची आणि पासपोर्टसाठी अर्ज करण्याची परवानगी तेथील महिलांना दिली गेली आहे. राजे सलमान यांच्या उपस्थितीत दोन महिला राजदूत शपथ घेणार आहेत, तर याआधीच तीन महिला राजदूत सरकारदरबारी सेवेत आहेत. सन २०१९ मध्ये युवराज्ञी रिमा बिंत बंदर या सौदी अरेबियाच्या इतिहासातील पहिल्या महिला राजदूत ठरल्या. आता सौदी अरेबियाच्या अमेरिकेतल्या राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. 

३२ महिला चालवणार रेल्वे
सौदी अरेबियात रेल्वेचालकांची तुकडी २०२३ मधील हज यात्रेत सहभागी होणार असून मक्का ते मदिना या पवित्र स्थळांदरम्यान प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंसाठी असलेल्या हायस्पीड रेल्वेचे सर्व चालक महिलाच असून त्यांची संख्या ३२ असेल. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियन रेल्वेने या चालक महिलांची निवड केली होती. 

पहिल्यांदाच अंतराळमोहिमेवर जाणार महिला 
इतिहासात पहिल्यांदाच सौदी अरेबिया आपली पहिली महिला-अंतराळवीर या वर्षाच्या अखेरीस अंतराळमोहिमेवर पाठवणार आहे. रायना बरनावी असे तिचे नाव आहे. रायना SpaceX च्या Falcon 9 रॉकेटमधून अंतराळात उड्डाण करेल. तिच्यासोबत सौदी अरेबियातील फायटर जेट पायलट अली अल्-कर्नी हे असतील. अंतराळात उड्डाण करणारे ते सौदी अरेबियाचे दुसरे नागरिक ठरतील. दोघेही ‘एएक्स-२’ मोहिमेत सहभागी होणार असून त्याअंतर्गत ते दहा दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घालवतील.

कोण आहे रायना बरनावी?
तेहतीस वर्षांची रायना बर्नावी ही बायोमेडिकल संशोधक आहे. रायनाने न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठातून बायोमेडिकल सायन्सेसमध्ये (ReGD) पदवीचे, तर रियाधच्या 'अल्फैसल विद्यापीठा'तून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. रायनाला कर्करोगाच्या स्टेम सेल संशोधनाचा नऊ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.  रायना जेव्हा अंतराळात उड्डाण करेल तेव्हा ती 'पहिली महिला मुस्लिम अंतराळवीर' ठरून इतिहास घडवेल. तथापि, ती अंतराळात जाणारी पहिली मुस्लिम महिला ठरणार नाही. कारण, इराणी-अमेरिकी वंशाची अनुशेह अन्सारी ही अंतराळात गेलेली पहिली मुस्लिम महिला होती. सन २००६ मध्ये  अनुशेहने अंतराळ-पर्यटक म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरून उड्डाण केले होते. अंतराळमोहिमेबाबत सौदी अरेबिया आता शेजारच्या संयुक्त अरब अमिरातीच्या पंक्तीत जाऊन बसेल. सन २०१९ मध्ये संयुक्त अरब अमिरातीने आपल्या नागरिकांना अंतराळात पाठवले होते. ही कामगिरी करणारा तो पहिला अरब देश ठरला होता.

'सौदी अरेबिया स्पेस प्रोग्रॅम' कसा आहे?
सौदीची ही अंतराळमोहीम 'सौदी ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅम' आणि अमेरिकेतील खासगी स्पेसफ्लाइट कंपनी Axiom यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. युवराज महंद बिन सलमान अल् सौद यांच्या 'व्हिजन २०३०' चा एक भाग म्हणून सौदी स्पेस कमिशन (SSC) अंतर्गत सौदी ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅमची स्थापना करण्यात आली आहे.