घरातील आर्थिक परिस्थिती हालाकीची. एका संस्थेच्या कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून हॉटेलमध्ये वेटरचे काम करत त्याने सुवर्णपदक मिळवत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढे एका शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पीएचडी पदवी पूर्ण करण्यासाठी त्याने तैवान गाठले. पीएचडीनंतर त्याला जपान येथे नोकरीही मिळाली. परंतु, आपल्या देशातील आपल्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करता यावी यासाठी त्याने पुन्हा महाराष्ट्रात येऊन काही समविचारी व्यक्तींसोबत मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी काम सुरु केले. ही कथा आहे नव्याने घडणाऱ्या विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणाऱ्या प्रा. डॉ. आजम शेख यांची.
- छाया काविरे
आजम हे मूळ दौंड तालुक्यातील मलठण येथील असून वडीलांच्या नोकरीनिमित्त ते मुळशी तालुक्यातील भरे या गावी स्थायिक झाले. सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एम. आय. टी. कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक म्हणून काम करतात. त्यांचे शिक्षण बीएससी (केमिस्ट्री), एमएससी (ऑरगॅनिक केमिस्ट्री), पीएचडी (ऑरगॅनिक केमिस्ट्री, तैवान), पोस्ट-डॉक (ऑरगॅनिक केमिस्ट्री, जपान) झालेले आहे. लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यामुळे अनेक समाजोपयोगी कामांमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. सामाजिक क्षेत्रामध्ये निःस्पृहपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सहवास त्यांना लाभला व यातूनच सामाजिक कामाची आवड निर्माण झाली.
‘शिक्षण व संस्कार’ या विषयात १९९५ पासून आजम काम करीत आहेत. त्यांच्या या कामामुळे अनेक युवक युवती शिक्षित झाले असून ते आज स्वत:च्या पायांवर उभे आहेत. तर, त्यातील काही विद्यार्थ्यांनी परदेशातून शिक्षण पूर्ण केले असून स्वत:ला समाजकार्यात झोकून दिले आहे. तरुणांना घडवणे या त्यांच्या कामाच्या मूळ उद्देशाला अनुरूप असे उपक्रम ते राबवत असतात. शिवचरित्र कथामाला हा त्या पैकीच एक उपक्रम. २००८-०९ सालापासून हा उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जातो.
अनुभव सांगताना आजम म्हणतात, ‘‘मी प्रथम स्व कष्टाच्या निधीतून मदत दिली आणि त्यानंतर इतरांना आवाहन केले. हे पाहून आवाहनाला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि देणग्यांचा ओघच सुरु झाला. देश विदेशातल्या अनेक परिचित व अपरिचित व्यक्तींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे उत्स्फुर्त प्रतिसाद दिला तो अनपेक्षित होता. सर्वसाधारणपणे देणगीदाराला स्वतःचे नाव छापून यावे असे वाटते तर, काही देणगीदारांना स्वतःचा नामोल्लेख सुध्द्ध नको, अशी उद्दात सूचना देतात. प्रत्येकजण जमेल तशी मदत करतात. कधी कामाच्या स्वरूपात, कधी वेळेच्या स्वरूपात, कधी वस्तूच्या स्वरूपात तर, कधी आर्थिक स्वरूपात. त्याचबरोबर, शाळेत लागणारे शैक्षणिक साहित्य, ग्रंथालयात लागणारी पुस्तके, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कपडे, आठवड्यातून किंवा महिन्यातून थोडा वेळ काढून संस्थेच्या सेवा प्रकल्पांना भेट देऊन प्रत्यक्ष मदत, अशा स्वरूपात कित्येकजण या कामाशी जोडलेले आहेत. देणग्यांचा अनपेक्षित ओघ आणि प्रसिद्धी परान्मुखता या दोन्ही गोष्टींमुळे माझा उत्साह वाढला तर, दुसरीकडे लोकांनी टाकलेल्या विश्वासामुळे दडपण देखील येते.''
ते पुढे म्हणतात, ‘‘विकास म्हणजे केवळ पैसे खर्च करून गावात रस्ते, हॉस्पिटल, शाळा वगैरे केवळ दान दिल्यासारखे बांधून देणे नव्हे. विकास म्हणजे व्यक्ती किंवा समूहाला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवणे. एखाद्या छोट्या रोपट्यावर सावली येत असेल तर ती सावली दूर करून त्याला स्वच्छ ऊन मिळू देणे आणि त्याला वाढू देणे म्हणजे त्याचा विकास होय. सावली बाजूला न करता केवळ खर्चिक रासायनिक खते देत राहणे म्हणजे विकास नव्हे. अशाप्रकारे संस्कार आणि विकासाचे व्यापक अर्थ या कामामुळे मला उमजले.’’
भटके विमुक्त व पारधी समाजासाठी काम करणारे गिरीश प्रभुणे, राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेचे अनिल व्यास हे सामाजिक क्षेत्रात आजम यांचे आदर्श आहेत. शासनाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करताना आजम सांगतात, ‘‘सामाजिक काम करत असताना शक्यतो आम्ही शासनाची मदत मिळेल किंवा ती मिळाली तरच आपल्याला काम करता येईल हा दृष्टिकोन न ठेवता, लोकसहभाग कसा जास्तीत जास्त वाढेल याकडे लक्ष देत असतो. आपल्या कामाचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ मिळावा हेच लक्ष्य ठेवले तर काम चिरंतन राहते, यावरच आम्ही विश्वास ठेवतो. ‘राष्ट्रीय सर्वांगिण ग्रामविकास संस्था’ व ‘श्री प्रतिष्ठान’ या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील सुतारवाडी येथे आयटीआयचा अभ्यासक्रम शिकवला जातो. शासनाला मदत करायची असेल तर, या आयटीआयमध्ये अजून काही तंत्रकौशल्याचे कोर्सेस सुरू करण्यासाठी मदत करावी.’’ ‘राष्ट्रीय सर्वांगिण ग्रामविकास संस्था’ व ‘श्री प्रतिष्ठान' यांच्या माध्यमातून आजम विविध उपक्रम राबवीत असतात. त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
नेमकी काय आहे 'एक मूठ धान्य' योजना ?
वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून `एक मूठ धान्य' योजना चालवली जाते. पुण्यातील कोथरूड भागातील ६०-७० कुटुंबे या योजनेसाठी मदत करतात. घरातील स्वयंपाकासाठी जे अन्न काढले जाते त्यातून हे कुटुंबीय रोज एका पिशवीमध्ये एक मूठ धान्य वेगळे काढतात. महिन्याच्या शेवटी ते धान्य एकत्र करून वसतिगृहात पाठविण्याची व्यवस्था केली जाते. गेल्या १५ वर्षांपासून ही मदत अखंड सुरु आहे.
महिलांच्या स्वावलंबनासाठी विना तारण बचतगट
ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी व्हाव्यात, या उद्देशाने महिलांचे गट गावागावात संघटित केले आहेत. सुमारे ६५ बचतगटांची बांधणी करून अंदाजे ७०० महिलांचे संघटन उभे केले आहे. महिन्यातून एकदा या गटांची बैठक होते. त्यामध्ये बचतीची रक्कम गोळा केली जाते आणि गरजू महिलांना कर्जाचे वाटप करण्यात येते. याशिवाय महिलांना शिवणकाम करणे, पापड, लोणचे बनवणे इ. कामांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे व्यवसाय करायला संधी उपलब्ध होते. त्याद्वारे काही महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकल्या आहेत. गरीब महिलांना कोणतेही तारण न ठेवता कर्ज दिले जाते. त्याचबरोबर, महिला बचत गटांमार्फत अहिल्याबाई होळकर जयंती आणि महिला दिन असे कार्यक्रम दरवर्षी साजरे होतात.
हिंमत शाळा
ग्रामीण भागात अनेक कारणांनी शिक्षण अर्धवट सोडले जाते आणि दुर्दैवाने तरुण मुले गुन्हेगारीकडे किंवा व्यसनांकडे वळतात. पालकही त्या बाबतीत अतिशय हतबल असतात. यासाठी खास नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात आली. हिंमत सोडलेल्या मुलांना नवी उमेद देणारी शाळा म्हणून या शाळेचे नाव 'हिंमत शाळा' असे आहे. सुरुवातीच्या काळात कार्यकर्ते गावागावात जाऊन अशी नापास झालेली किंवा शाळा सोडलेली मुले व मुली शोधून त्यांच्या घरी पालकांशी संवाद साधून त्यांना शाळेत आणले जात असे. दूरच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सुद्धा सोय केली जाते. आता अशी गरजू मुले आपणहून शाळेत प्रवेश घेतात. शाळेत त्यांचा अभ्यास करून घेऊन त्यांची दहावीच्या परीक्षेची तयारी करून घेतली जाते. सुमारे २५ मुले दरवर्षी या शाळेत शिक्षण घेतात. त्यापैकी ७० ते ८० टक्के विद्यार्थी यशस्वी होतात. त्यांच्या आयुष्याला त्यामुळे एक नवी दिशा मिळते. मुले खऱ्या अर्थाने मार्गी लागतात. नुसताच शालेय अभ्यासक्रम न शिकवता मुलांना काही व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा दिले जाते. उदा. मोबाईल रीपेयरिंग, नर्सरी इ.
इतर समाजोपयोगी उपक्रम
उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी फिरती शाळा चालविणे, नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून औषधांचे वाटप करणे, त्याचबरोबर मोबाईल रिपेअरिंग, तबला वादन, नृत्य, ब्युटी पार्लर, रोपवाटिका असे प्रशिक्षण वर्गसुद्धा गरजेनुसार चालवले जातात. आजपर्यंत मोबाईल रिपेयरिंग कोर्स केलेल्या तिघांनी स्वतः चे व्यवसाय सुरु केले आहे. तर, एक तरुण रोपवाटिका चालवून आर्थिकदृष्ट्या स्वतः च्या पायावर उभा आहे. सुट्टीमध्ये शालेय विद्यार्थ्यासाठी तीन दिवसांची शिबिरे घेऊन व्यक्तिमत्व विकासासाठी काही उपक्रम राबवले जातात.