NEET पेपर फुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नीट (NEET-UG 2026) परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मंगळवारी संध्याकाळी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे, या प्रकरणाचे धागेदोरे मध्य महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले असून, एका खासगी कोचिंग क्लासच्या 'मॉक टेस्ट'मधील तब्बल ४२ प्रश्न मुख्य परीक्षेत आल्याची तक्रार एका विद्यार्थ्याच्या पालकाने केली आहे.

नाशिकमधून एकाला सीबीआयची कोठडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने मंगळवारी शुभम खैरनार (३०, रा. नांदगाव) याला ताब्यात घेतले होते. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले की, त्याला शहरातील इंदिरानगर परिसरातून पकडण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी पुढील तपासासाठी सीबीआयने त्याला आपल्या ताब्यात घेतले. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपर फुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली असून, सरकारने या अनियमिततेच्या सखोल चौकशीचे आदेश सीबीआयला दिले आहेत.

लातूरमध्ये खासगी क्लासवर संशय

या पेपर फुटीच्या जाळ्याचे लागेबांधे लातूरशीही जोडले गेल्याचा संशय आहे. लातूरमधील एका विद्यार्थ्याच्या पालकाने मंगळवारी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, नीट परीक्षेपूर्वी लातूरमधील एका खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांसाठी 'मॉक टेस्ट' (सराव परीक्षा) घेतली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या मॉक टेस्टमध्ये विचारण्यात आलेले तब्बल ४२ प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेत जसेच्या तसे आले होते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे या पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये संबंधित कोचिंग क्लासचा सहभाग असल्याचा संशय बळावला आहे.

पोलिसांकडून चौकशीचे आदेश

या गंभीर दाव्यांची दखल घेत लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) समीरसिंह साळवे यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, नीट पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती किंवा पुरावे असल्यास नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सांगावे, असे आवाहन लातूर पोलीस प्रशासनाने केले आहे.