‘ग्रॅमी’मधील लक्षवेधक ‘मोमेंट’

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
शक्ती या फ्यूजन बँडचे कलाकार
शक्ती या फ्यूजन बँडचे कलाकार

 

अक्षय शेलार 
 
‘ग्रॅमी’ संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक मानला जातो. जगभरातील सांगीतिक संस्कृती, रचना आणि कलाकारांचा त्यात सन्मान केला जातो. नुकताच भारतातील पाच कलाकारांना २०२४ चा ‘ग्रॅमी’ पुरस्कार जाहीर झाला. हे पुरस्कार मिळण्यात ‘शक्ती’ या बँडच्या ‘धिस मोमेंट’ अल्बमचा मोठा वाटा आहे. हा पुरस्कार आणि त्या बँडविषयी...

जॉन मॅक्लॉफ्लिन हा ब्रिटिश गिटारिस्ट व संगीतकार आहे. जॉन १९७० च्या दशकात ‘महाविष्णू ऑर्केस्ट्रा’ या आपल्या बँडसोबत संगीतनिर्मिती करत होता. जॉनला भारतीय शास्त्रीय संगीतात रस होता आणि तो बराच काळ वीणावादनाचे शिक्षणही घेत होता.

त्यातूनच ‘महाविष्णू ऑर्केस्ट्रा’ विलग झाल्यानंतर ‘शक्ती’ हा बँड अस्तित्वात आला. १९७७ मध्ये ‘शक्ती’चा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेला पहिला अल्बम ‘नॅचरल एलिमेंट्स’ प्रसिद्ध झाला. २०२३ मध्ये या बँडच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली आणि याच वर्षी तब्बल ४५ वर्षांनंतर ‘शक्ती’चा दुसरा अल्बम, ‘धिस मोमेंट’ आला.

‘शक्ती’ची स्थापना झाली त्या वेळी मॅक्लॉफ्लिनसोबत झाकीर हुसेन, व्हायोलिनवादक एच. शंकर आणि ‘घाटम’ (मातीच्या भांड्याच्या रूपाचे एक वाद्य) वादक टी. एच. विनायकराम यांनी त्याची सुरुवात केली होती.

मधल्या काळात बरेच जण बदलल्यानंतर, तसेच यू. श्रीनिवास यांच्या मृत्यूनंतर आता मॅक्लॉफ्लिन, हुसेन, शंकर महादेवन, व्ही. सेल्वागणेशन (विनायकराम यांचा मुलगा) आणि व्हायोलिनवादक गणेश राजगोपालन यांच्या सहयोगातून ‘धिस मोमेंट’ आकारास आला आहे. ग्रॅमीमुळे ‘शक्ती’च्या पुनरागमनाची ही ‘मोमेंट’ सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी, सगळ्यांच्या लक्षात राहणारी ठरली आहे...

‘शक्ती’ नक्की काय आहे?
‘शक्ती’ हा एक फ्यूजन बँड आहे. मॅक्लॉफ्लिनला ज्यात रस आहे असे भारतीय शास्त्रीय संगीत, त्यात पुन्हा कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत याला लागून वेस्टर्न संगीत (वाद्य व एकूणच संगीताच्या वैशिष्ट्यांसह) येते.

‘धिस मोमेंट’मध्ये तरी आठपैकी सात गाण्यांमध्ये शंकर महादेवन यांचे वोकल्स आहेत; पण बँडच्या याआधीच्या बऱ्याच गाण्यांत केवळ वाद्यांवरच भिस्त आहे. त्यामुळे भारतीय संगीतातील वेगवेगळे राग आणि त्याची फ्यूजन्स यावर या बँडचा असलेला भर तुमच्या लक्षात येईल.

‘शक्ती’ आणि या बँडची सांगीतिक ओळख आणखी वेगळ्या शब्दांत करून देता येईल. ज्यात मॅक्लॉफ्लिन कधी तरी म्हणाला होता त्यानुसार भारतीय संगीत सादर करणे, हा त्याचा मूळ हेतू नाही.

त्याला अभिप्रेत असलेला त्याच्या कलेचा अर्थ म्हणजे ‘शक्ती’ला वेस्टर्न ध्वनींची जोड देणे, हा होय. त्यामुळे ‘मॅक्लॉफ्लिन अधिक इतर चार भारतीय संगीतकार’ असे या बँडचे किंवा त्यातील गाण्यांचे स्वरूप नाही, तसे ते कधीच नव्हते. त्यामुळे ‘धिस मोमेंट’मध्ये (राजगोपालन यांचा अपवाद वगळता) जवळपास प्रत्येक सदस्याच्या वाट्याला ‘सोलो कम्पोजिशन’ येते.

बऱ्याचदा ‘फ्यूजन’ म्हटले, की मुख्यत्वे पाश्चिमात्य वाद्ये आणि त्याला लागून अधे-मधे येणारी विदेशी (अर्थातच पौर्वात्य) वाद्ये असे समीकरण दिसते. पंडित रविशंकर आणि इतर काही भारतीय कलाकारांनी हे समीकरण चुकीचे ठरवत भारतीय संगीताला जगाच्या सांगीतिक पटलावर महत्त्व मिळवून दिले.

‘शक्ती’चे कामदेखील या पूर्वग्रहाला छेद देणारे आहे, जे मॅक्लॉफ्लिनच्या वाक्याला अनुसरून आहे. ज्यात खरोखर दोन सांगीतिक संस्कृतींचे मिश्रण ऐकायला मिळते. त्यात पुन्हा कर्नाटक आणि हिंदुस्थानी या दोन सर्वस्वी भिन्न सांगीतिक संस्कृतींचा संकर पाहायला मिळतो. ज्यात दोन्हींतील अंतर आणि त्याच वेळी अस्तित्वात असणारी जवळीक, असे एकाच वेळी दिसते. त्यामुळेच एरवी फ्यूजन म्हटले, की नाके मुरडणाऱ्या अनेकांना हा बँड आवडतो, महत्त्वाचा वाटतो...

‘धिस मोमेंट’ ज्या पद्धतीने रेकॉर्ड केला आहे, तेही फारच रोचक आहे. मॅक्लॉफ्लिन म्हणतो, की ‘शक्ती’ बँडची मजा लाईव्ह परफॉर्मन्समध्ये अधिक आहे. त्यामुळे इतकी वर्षे ‘शक्ती’चा स्टुडिओ अल्बम आला नसला, तरी जगभरात वेळोवेळी बऱ्याच टूर झाल्या आहेत.

अशात जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या या लोकांना एकत्र आणणे खचितच सोपे नसते. त्यामुळेच प्रत्येकाने आपापल्या सोयीने आपापल्या देशातील /खंडातील वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर या अल्बममधील सांगीतिक रचना आकारास आल्या आहेत. ज्यातील पहिल्या रचनेचे नाव आहे ‘श्रीनी’ज ड्रीम’, जी बँडचा पूर्वाश्रमीचा सदस्य यू. श्रीनिवास यांना (ज्यांचा २०१३ मध्ये मृत्यू झाला) दिलेली मानवंदना आहे.

महत्त्वाचा भाग म्हणजे, ‘धिस मोमेंट’मध्ये ‘शक्ती’मधील कलाकारांनी केलेले काम ‘मोअर ऑफ द सेम’ प्रकारातील नाही. संगीत अभ्यासक व समीक्षकांच्या मते त्यांचे हे नवे काम फ्यूजन प्रकाराला आणखी पुढे घेऊन जाणारे आहे.

त्यामुळेच ४५ वर्षांनंतर दुसरा अल्बम समोर आणत ‘शक्ती’मधल्या दिग्गजांनी इतरांना धोबीपछाड दिलेली आहे. २०२४ च्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात पूर्व आणि पश्चिमेकडील संगीताचा मिलाफ असणाऱ्या ‘शक्ती’च्याच ‘धिस मोमेंट’चा गौरव झाला आहे. ज्यात या अल्बमला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम’ या विभागात पुरस्कार मिळाला.

हा सन्मान पूर्ण बँडसोबत प्रत्येक सदस्याचाही आहे. ज्यात मॅक्लॉफ्लिन, हुसेन, महादेवन, सेल्वागणेशन आणि राजगोपालन यांना एकेक ग्रॅमी पुरस्कार मिळाला. महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ ‘शक्ती’मधील कलाकारांनाच हा पुरस्कार मिळाला नाही, तर झाकीर हुसेन आणि राकेश चौरसिया यांना त्यांच्या आणखी एका कामासाठी प्रत्येकी दोन पुरस्कार मिळाले.

‘ॲज वी स्पीक’ या अल्बमला ‘बेस्ट कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटल अल्बम’ या विभागात पुरस्कार मिळाला. या अल्बममध्ये बेला फ्लेक, झाकीर हुसेन, एडगर मायर आणि राकेश चौरसिया हे संगीतकार एकत्र आलेले आहेत.

शिवाय, त्यांच्या याच अल्बममधील ‘पाश्तो’ या रचनेला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’चा पुरस्कार मिळाला. त्यामुळे एकाच सोहळ्यात हुसेन यांना तीन, तर चौरसिया यांना दोन पुरस्कार मिळाल्याने त्यांनी एक विक्रमच बनवला आहे. एवढ्या पुरस्कारांमधून वेगवेगळ्या प्रांतांतील संगीतकारांनी एकत्र येणे, त्यातून फ्यूजन निर्माण करणे, सांगीतिक संस्कृतींचा मिलाफ घडवून आणणे या साऱ्याचं यश आणि महत्त्व दिसून येतं.

- अक्षय शेलार 
[email protected] (लेखक चित्रपट समीक्षक व अनुवादक आहेत.)