हैदराबादी लग्नसोहळा म्हणजे चविष्ट बिर्याणी, पारंपरिक पोषाख आणि मरफा वाद्यांचा दणदणाट. याच मरफाच्या तालावर एक गाणे हमखास वाजते, ते म्हणजे 'दिला तीर बिजा'. या गाण्याची लोकप्रियता इतकी आहे की, ते वाजल्याशिवाय कोणताही सोहळा पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. अनेकजण याला हैदराबादी पारंपरिक गीत मानतात, पण या गाण्याचा खरा उगम पाकिस्तानच्या राजकारणातून झाला, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल.
या गाण्याचा जन्म १९८७ मध्ये पाकिस्तानात झाला. संगीतकार जहूर खान झेबी यांनी हे गाणे बेनझीर भुट्टो यांच्या 'पाकिस्तान पीपल्स पार्टी'साठी एक प्रचारगीत म्हणून तयार केले होते. 'दिला तीर बिजा' याचा अर्थ 'हृदयावर बाण लागला' असा होतो. त्यावेळी निवडणूक आयोगाने भुट्टो यांच्या पक्षाचे 'तलवार' हे चिन्ह नाकारले होते. त्यानंतर 'बाण' हे त्यांचे नवे निवडणूक चिन्ह बनले. हे गाणे त्यांच्या राजकीय संघर्षाचे प्रतीक बनून १९८८ च्या निवडणुकीत घराघरात पोहोचले.
मग पाकिस्तानचे हे राजकीय गीत हैदराबादच्या लग्नसमारंभात कसे पोहोचले? याचे उत्तर त्याच्या अनोख्या संगीतात दडले आहे. हैदराबादमधील मरफा बँडच्या 'तीन मार' शैलीसाठी ज्या प्रकारच्या जलद आणि उत्साही तालाची गरज असते, तो या गाण्यात पुरेपूर होता. त्यामुळे स्थानिक मरफा बँड्सनी हे गाणे वाजवायला सुरुवात केली. लोकांनीही या तालाला उचलून धरले आणि पाहता पाहता, या राजकीय गीताने आपली मूळ ओळख मागे टाकून हैदराबादी लग्नसमारंभातील एक लोकप्रिय गीत म्हणून नवी ओळख निर्माण केली.
आज हे गाणे हैदराबादी संस्कृतीत इतके खोलवर रुजले आहे की, अनेक स्थानिक लोकांना त्याची पाकिस्तानी आणि राजकीय पार्श्वभूमी माहीतही नाही. अलीकडच्या काळात सोशल मीडियाने या गाण्याला पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आणले. जून २०२३ मध्ये, हैदराबादच्या एका डीजेने क्लबमध्ये हे गाणे वाजवले आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यानंतर तरुणांमध्ये या गाण्याची क्रेझ पुन्हा वाढली. आज इंस्टाग्राम रिल्सपासून ते लग्नाच्या व्हिडिओंपर्यंत, सर्वत्र हे गाणे मोठ्या उत्साहात वाजवले जाते. तर ही आहे पाकिस्तानच्या राजकीय मैदानातून निघून थेट हैदराबादच्या लग्नमंडपात पोहोचलेल्या या अनोख्या गाण्याची कहाणी.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -