न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ (NYIFF) ची सांगता अत्यंत दिमाखदार सोहळ्यात झाली असून या महोत्सवात भारतीय प्रादेशिक चित्रपटांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या चार दिवसीय चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपटप्रेमींना भारतीय सिनेमाची वैविध्यपूर्ण रुपे पाहायला मिळाली.
यंदाच्या महोत्सवात बाफ्टा (BAFTA) पुरस्कार विजेता आणि अत्यंत चर्चिलेल्या 'बुंग' (Boong) या मणिपुरी चित्रपटाने तब्बल तीन पुरस्कारांवर आपले नाव कोरत घवघवीत यश संपादन केले आहे. २८ मे ते ३१ मे या कालावधीत पार पडलेल्या या महोत्सवात १५ भाषांमधील उत्तमोत्तम चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते, जे समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रादेशिक कथांचे वाढते वर्चस्व अधोरेखित करतात.
इंडो-अमेरिकन आर्ट्स कौन्सिल (IAAC) द्वारे आयोजित हा चित्रपट महोत्सव उत्तर अमेरिकेतील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित स्वतंत्र भारतीय चित्रपट महोत्सव मानला जातो. यंदाच्या आवृत्तीत १९ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, ४ माहितीपट आणि २७ लघुपटांचा समावेश होता. यामध्ये अनेक चित्रपटांचे वर्ल्ड प्रिमियर देखील झाले. या महोत्सवात 'बाक्सो बंदी' (शैडोबॉक्स) या चित्रपटाने महोत्सवातील सर्वोच्च बहुमान म्हणजेच 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' (Best Film) चा पुरस्कार पटकावला.
'बुंग' चित्रपटाची त्रिशतकी कामगिरी
चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात प्रतिष्ठेच्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात 'बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म' श्रेणीत पुरस्कार जिंकून इतिहास रचणाऱ्या 'बुंग' या मणिपुरी चित्रपटाने न्यूयॉर्कमध्येही आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली. महोत्सवाच्या उद्घाटनालाच २९ मे रोजी या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले होते. 'बुंग'ने या महोत्सवात तीन महत्त्वाचे पुरस्कार जिंकले; ज्यात 'फिल्म क्रिटिक्स सर्कल ऑफ इंडिया'तर्फे दिला जाणारा 'सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट' (Best Debut Film), चित्रपट दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांच्यासाठी 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' (Best Director) आणि बालकलाकार गुगुन किपगेन याच्यासाठी 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' (Best Child Actor) या पुरस्कारांचा समावेश आहे.
महोत्सवात इतर श्रेणींमध्येही कलाकारांचा गौरव करण्यात आला. 'विमुक्त' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी निखिल यादव याला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' तर 'व्हिक्टोरिया' चित्रपटासाठी मीनाक्षी जयन हिला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' म्हणून गौरवण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, 'तिघी' या चित्रपटासाठी निखिल महाजन आणि प्रजक्त देशमुख यांना 'सर्वोत्कृष्ट पटकथा' (Best Screenplay) चा पुरस्कार मिळाला.
जागतिक मंचावर भारतीय संस्कृतीचे दर्शन
बिगर-काल्पनिक (Non-fiction) श्रेणींमध्ये 'डेजा वू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट (Feature) आणि 'वाई' (Waai) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघू माहितीपट पुरस्कार मिळाला. तसेच 'जोस् टर्न' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट नॅरेटिव्ह शॉर्टचा पुरस्कार जिंकला. यंदाच्या महोत्सवाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर क्लासिक चित्रपट 'शोले'च्या ४के (4K) रिस्टोर्ड व्हर्जनचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आयएएसी (IAAC) चे अध्यक्ष डॉ. निर्मल मट्टू यांनी महोत्सवाच्या सुरुवातीला सांगितले होते की, एनवायआयएफएफ (NYIFF) हा एक मजबूत सांस्कृतिक पूल म्हणून काम करतो. २०२६ ची ही नामांकने आंतरराष्ट्रीय मंचावर भारतीय सिनेमाची समृद्धी आणि विविधता दाखवण्यास यशस्वी ठरली आहेत. फेस्टिव्हल डायरेक्टर असीम छाबडा यांनीही यंदाच्या चित्रपटांमधून सहस्राब्दी (Millennials) आणि जन-झेड (Gen Z) पिढीची मानसिकता आणि मानवी भावनांचे प्रभावी चित्रण झाल्याचे नमूद केले.