नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची अजरामर भूमिका!
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 13 h ago
ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी 'भारत एक खोज' मालिकेत साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका
'न भूतो न भविष्यती', असा राजा झाला नाही आणि होणे नाही, ही वाक्ये केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच वापरली जातात. शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलची उत्सुकता आजही प्रत्येक व्यक्तीच्या मनात कायम आहे. त्यामुळेच शिवरायांची भूमिका साकारणे कोणत्याही कलाकारासाठी मोठे आव्हानात्मक असते. आपण या 'जाणता राजा'च्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकू का, याबद्दल कलाकाराच्या मनात नेहमीच थोडी साशंकता असते.
आजवर अनेक कलाकारांनी शिवरायांची भूमिका पडद्यावर साकारण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. मात्र त्यात ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेली भूमिका सर्वाधिक लक्षवेधी ठरली. आज संपूर्ण देश छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी होत आहे. याच धर्तीवर नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेल्या त्या ऐतिहासिक भूमिकेचा घेतलेला हा विशेष आढावा.
दूरदर्शनवर १९८९ साली 'भारत एक खोज' नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. अखंड भारताचा इतिहास, संस्कृती, सामाजिक आणि भौगोलिक वारसा या मालिकेत अतिशय प्रभावीपणे मांडला होता. ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. भारत एक खोज ही मालिका पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 'द डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकावर आधारित होती. या ५३ भागांच्या मालिकेचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन श्याम बेनेगल यांनी केले होते. भारताचा पाच हजार वर्षांचा इतिहास उलगडणाऱ्या या मालिकेच्या ३७ आणि ३८ व्या भागात शिवाजी महाराजांच्या जीवनाचा गौरवशाली आढावा घेण्यात आला. याच भागात नसिरुद्दीन शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.
नसिरुद्दीन शाह हे एक उत्तम अभिनेते असून त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्यांची कारकीर्द चार दशकांहून अधिक काळ असून नाट्य आणि दूरदर्शनमधील कामगिरीही वाखाणण्याजोगी आहे. शिवराय साकारताना कलाकाराच्या अभिनयाचा कस लागतो. नसिरुद्दीन शाह यांनी ही भूमिका एवढी उत्तम रित्या साकारली की ती कायमची अजरामर ठरली. महाराजांचा रुबाब, नजाकत आणि दरारा या गोष्टी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. आजही त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतुक होते. भूमिकेतील करारीपणा, बोलण्याची आणि चालण्याची लकब, अचूक संवादफेक आणि भेदक नजर यांमुळे त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी एका मुस्लीम अभिनेत्याची निवड करण्यामागे नेमका काय विचार होता, असा प्रश्न श्याम बेनेगल यांना एका मुलाखतीत विचारला गेला होता. त्यावर बेनेगल यांनी अतिशय स्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले की, "आम्ही अजिबात धर्माचा विचार केला नाही. त्या भूमिकेसाठी नसिरुद्दीनच हवेत, हाच एकमेव विचार होता. भारतात राहताना असा संकुचित विचार करूच शकत नाही. धर्म हा घरात आणि हृदयात असायला हवा."
हिंदू-मुस्लीम असा कोणताही विचार मनात न आणता केवळ कला आणि प्रतिभेला महत्त्व देत ही निवड झाली होती. भारत एक खोज या मालिकेत औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष दाखवला आहे. तसेच अफजलखान वधाचा प्रसंगही अत्यंत प्रभावीपणे चित्रित केला आहे. विशेष म्हणजे यात औरंगजेबाची भूमिका दिग्गज अभिनेते ओम पुरी यांनी साकारली होती. याशिवाय अनंग देसाई आणि अच्युत पोतदार यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. आजही शिवजयंतीच्या निमित्ताने नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेले ते रुबाबदार शिवराय रसिकांच्या डोळ्यांसमोर उभे राहतात.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -