राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात सलमान खानचा उल्लेख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असा केल्यावर सलमानने स्मितहास्य करत दाद दिली. प्रेक्षकांमध्ये बसलेला सलमान भागवत यांचे बोलणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकत असतानाचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. '१०० वर्षांचा संघ प्रवास: नवी क्षितिजे' या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे आता सोशल मीडियावर समोर आली आहेत.
या कार्यक्रमातील एका क्लिपमध्ये मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, सलमान खानच्या निवडींचा तरुणांवर, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कसा प्रभाव पडतो. भागवत म्हणाले, "सलमान खान जी काय परिधान करतात, महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच कपडे घालतात. ते असं का करत आहेत? 'त्यांनी घातलं आहे म्हणून.' त्यांनी असं का परिधान केलं आहे? 'माहीत नाही'." ते पुढे म्हणाले, "सगळ्याच बाबतीत असं होतं, चांगली गोष्ट असो वा वाईट, सगळं काही फॅशनने चालतं. समाजात फॅशन निर्माण करणारे लोक विश्वासार्ह, श्रेष्ठ आणि कीर्तिमान मानले जातात."
हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारित होताच अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मोहन भागवत यांच्या विधानाला दुजोरा दिला. सलमान खानचा लोकप्रिय संस्कृतीवर दीर्घकाळापासून असलेला प्रभाव अनेकांनी अधोरेखित केला. ९० च्या दशकापासून तो एक ट्रेंडसेटर असून त्याच्या शरीरसौष्ठवाने तरुणांच्या संपूर्ण पिढीला प्रेरणा दिल्याचे अनेकांनी नमूद केले. काही चाहत्यांनी सलमानच्या आजवरच्या प्रसिद्ध शैलींच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये त्याचा टॉवेल डान्स, फाटलेली डेनिम जीन्स किंवा कमरेला शर्ट बांधण्याची पद्धत या गोष्टींचा समावेश होता. महाविद्यालयीन तरुणांनी त्या काळात या शैलींचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण केले होते. त्याच्या हातातील निळ्या खड्याचे ब्रेसलेट देखील चाहत्यांमध्ये एक फॅशन स्टेटमेंट बनल्याचा उल्लेख अनेक वापरकर्त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त '१०० वर्षांचा संघ प्रवास: नवी क्षितिजे' ही दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली होती. मुंबईतील नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता रविवारी झाली. या सोहळ्याला सलमान खान व्यतिरिक्त अक्षय कुमार, प्रीतम, रवीना टंडन, अनन्या पांडे, करण जोहर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. सलमानने शनिवारी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान, विकी कौशल, अनन्या पांडे, शिल्पा शेट्टी, करण जोहर, गायक अदनान सामी आणि रमेश तौरानी हे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित होते.
कामाच्या आघाडीवर सलमान खान आता अपूर्व लाखिया यांच्या 'बॅटल ऑफ गॅलवान'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०२० मध्ये भारत आणि चीन दरम्यान गॅलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या संघर्षात २० भारतीय जवानांनी बलिदान दिले होते. या चित्रपटात चित्रांगदा सिंह सलमानच्या विरुद्ध भूमिकेत आहे. हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, ताज्या अहवालानुसार प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा युद्धपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा सुपरस्टार शेवटचा ए.आर. मुरुगादॉस लिखित आणि दिग्दर्शित 'सिकंदर' या ॲक्शन ड्रामामध्ये दिसला होता. त्या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, शरमन जोशी आणि सत्यराज यांच्याही भूमिका होत्या.