शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनची पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी मदत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान

 

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान यांच्या मीर फाऊंडेशनने पंजाबमधील पूरग्रस्त कुटुंबांना मदत केली आहे. गुरुवारी फाऊंडेशनने सांगितले की, त्यांनी पुनर्वसनासाठी जीवनावश्यक किट वितरित केले आहेत.

पंजाबमधील सतलज, बियास आणि रावी नद्यांना तसेच हंगामी ओढ्यांना हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने उद्भवलेल्या पूरामुळे गेल्या काही दशकांतील सर्वात भयंकर आपत्तीला सामोरे जावे लागत आहे.

स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम अमृतसर, पटियाला, फाझिल्का आणि फिरोजपूर जिल्ह्यांतील १,५०० कुटुंबांना कव्हर करेल, असे फाऊंडेशनने निवेदनात सांगितले.मदत किटमध्ये औषधे, स्वच्छता साहित्य, खाद्यपदार्थ, मच्छरदाणी, ताडपत्री, फोल्डिंग बेड आणि कापसाच्या गाद्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

या मोहिमेचा उद्देश पूरग्रस्त कुटुंबांच्या तात्काळ आरोग्य, सुरक्षा आणि निवारा गरजा पूर्ण करणे आहे आणि त्यांना सन्मानाने जीवन पुन्हा उभारण्यास मदत करणे आहे, असे फाऊंडेशनने नमूद केले. मागील आठवड्यात शाहरुखने सोशल मीडियावर पोस्ट करून पंजाबच्या लोकांना पाठिंबा दिला होता.

शाहरुखने पोस्टमध्ये लिहिले होते की, “पंजाबमधील या विनाशकारी पूरामुळे नागरिकांचे नुकसान झाल्याने मन हेलावून टाकत आहे. प्रार्थना आणि सामर्थ्य पाठवत आहे... पंजाबला या सर्वातून सावरण्याची शक्ती मिळो... सर्वांना देव आशीर्वाद देईल.” 

शाहरुखने स्थापन केलेल्या मीर फाऊंडेशनने यापूर्वी देशाच्या विविध भागांत आपत्ती निवारण प्रयत्न आणि सामाजिक मोहिमांना पाठिंबा दिला आहे. शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनने व्हॉइस ऑफ अमृतसर (व्हीओए) सोबत हातमिळवणी करून पंजाबमधील पूरग्रस्त कुटुंबांना मदत केली आहे. 

एकत्रितपणे ते रावी नदीकाठच्या सुमारे ५०० कुटुंबांना बेड, गाद्या, गॅस स्टोव्ह, पंखे, पाणी शुद्धीकरण यंत्र, कपडे आणि इतर वस्तूंसह मदत दिली आहे. यामुळे त्यांना सन्मानाने जीवन पुन्हा उभारण्यास मदत होईल.

यापूर्वी व्हीओएने एम्सच्या डॉक्टरांसह वैद्यकीय शिबिरे आयोजित करून मोफत उपचार दिले. कपिल शर्मा आणि जसबीर जस्सी यासारख्या तारकांनीही मनोबल वाढवण्यासाठी पाठिंबा दिला. हे सहकार्य सेवा, एकता आणि मानवतेचा खरा आत्मा दाखवते.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter