संरक्षण मंत्रालयाने विकसित केले स्वदेशी संगणक प्रणाली; काय आहे माया ओएस?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

देशाच्या सुरक्षा विभागातील कम्प्युटर्सना सायबर हल्ल्यापासून वाचवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा मंत्रालयाच्या सर्व कम्प्युटर्समध्ये आता विंडोज ऐवजी माया ओएस ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात येणार आहे. जगभरातील कोट्यवधी कम्प्युटर्समध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मात्र, यातील लाखो पीसींवर दरवर्षी सायबर हल्ल्यांची नोंद होते. यामुळेच सुरक्षा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. माया ओएसमध्ये 'चक्रव्यूह' नावाचं एक खास सुरक्षा फीचर देण्यात आलं आहे.

काय आहे माया ओएस?
माया ही ऑपरेटिंग सिस्टीम उबंटू प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. सुरक्षा मंत्रालयाने इतर सरकारी संस्थांसोबत मिळून ही ओएस विकसित केली आहे. डीआरडीओ, नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कम्प्युटिंग अशा विभागांचा यात समावेश आहे. या ऑपरेटिंग सिस्टीमचं यूआय अगदी विंडोजप्रमाणे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यावर काम करताना कोणतीही अडचण येणार नाही.

चक्रव्यूह फीचर
माया ऑपरेटिंग सिस्टीममध्ये चक्रव्यूह नावाचं एक खास सुरक्षा फीचर देण्यात आलं आहे. हे एक एंड पॉइंट अँटीमालवेअर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. यूजर वापरत असलेला कम्प्युटर आणि इंटरनेट या दोन्हीच्या मध्ये हे एक व्हर्चुअल लेअर बनवतं. यामुळे हॅकर्स गोपनीय माहिती चोरू शकत नाहीत.

भारतीय नौसेनेने या ऑपरेटिंग सिस्टीमला ग्रीन सिग्नल दिला आहे. तर वायुसेना आणि लष्कर यावर अद्याप काम करत आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अद्याप या सॉफ्टवेअरची चाचणी सुरू आहे. लवकरच ही ओएस सुरक्षा विभागाच्या सर्व कम्प्युटर्सवर इन्स्टॉल करण्यात येईल.

१५ ऑगस्टपूर्वी साउथ ब्लॉकमध्ये असणाऱ्या सर्व कम्प्युटरवर ही ओएस इन्स्टॉल करण्याचं मंत्रालयाचं लक्ष्य आहे. त्यानंतर उरलेल्या कम्प्युटर्सवर वर्षाच्या अखेरपर्यंत माया ओएस देण्यात येईल.