व्हॉट्सअॅप हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. व्हॉट्सअॅपवरून केवळ टेक्स्ट मेसेज नाही, तर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलही करता येतात. मात्र, या फीचर्सचा गैरफायदा देखील घेतला जातो. सध्या व्हॉट्सअॅपवर अशाच प्रकारे स्कॅम सुरू आहे.
कित्येक भारतीयांनी व्हॉट्सअॅपवर विदेशी क्रमांकांवरून कॉल येत असल्याची तक्रार केली होती. यूजर्सनी ट्विटरच्या (एक्स) माध्यमातून याबाबत तक्रार केली होती. +९२, +८४, +६२ अशा कोडने सुरू होणाऱ्या क्रमांकांवरुन यूजर्सना कॉल येत आहेत.
व्हॉट्सअॅपचा इशारा
यूजर्सच्या तक्रारीनंतर व्हॉट्सअॅपने अधिकृत स्टेटमेंट जारी करत, अशा प्रकारच्या कॉलना रिप्लाय न करण्याचं, आणि त्यांना इग्नोर करण्याचं आवाहन केलं होतं. तुम्हालाही अशा प्रकारचे कॉल येत असतील, तर केवळ दुर्लक्ष करण्याऐवजी, त्याबाबत वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे.
बहुतांश व्हॉट्सअॅप यूजर्सना पाकिस्तान, मलेशिया, केनिया, व्हिएतनाम आणि इथिओपिया अशा देशांमधून कॉल येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातही, ज्यांनी काही दिवसांपूर्वी नवीन सिमकार्ड घेतलं आहे, त्यांना असे कॉल्स अधिक प्रमाणात येत असल्याचं समोर आलं आहे.
त्वरीत करा रिपोर्ट
व्हॉट्सअॅपने असं आवाहन केलं आहे, की यूजर्सना जर अशा प्रकारच्या नंबरवरून कॉल येत असतील, तर ते नंबर त्वरीत ब्लॉक करावेत. यासोबतच अशा नंबरना रिपोर्टही करावं, जेणेकरून व्हॉट्सअॅप या नंबर्सची तपासणी करून त्यांचं अकाउंट बंद करू शकेल.
एआयची मदत
अशा स्पॅम नंबरची तपासणी करण्यासाठी व्हॉट्सअॅप एआयची मदत घेत आहे. मे महिन्यामध्ये व्हॉट्सअॅपने अशा तब्बल ६५ लाख नंबरवर कारवाई करुन, त्यांना प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकलं होतं.
अशी घ्या खबरदारी
अशा अनोळखी नंबरना ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला त्या नंबरच्या चॅटमध्ये जावं लागेल. यानंतर वरती कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा. यात येणाऱ्या पर्यायांमध्ये ब्लॉक किंवा रिपोर्ट हे पर्याय दिसत नसतील, तर 'मोर' हा पर्याय निवडा. पुढे पर्यायांची आणखी एक यादी दिसेल, जिथून तुम्ही हे नंबर ब्लॉक आणि रिपोर्ट करू शकता.