३ D प्रिंटिंग तंत्रज्ञानावर आधारित पहिल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन; जाणून घ्या काय आहे तंत्रज्ञान

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 8 Months ago
३ D प्रिंटिंग तंत्रज्ञानावर आधारित पोस्ट ऑफिस
३ D प्रिंटिंग तंत्रज्ञानावर आधारित पोस्ट ऑफिस

 

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी बेंगळुरुमध्ये ३डी प्रिंटिंग तंत्रज्ञान पद्धतीने बनवलेल्या भारतातील पहिल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन केले. पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील केम्ब्रिज लेआउटमध्ये १,०२१ वर्ग फूट क्षेत्रामघ्ये या पोस्ट ऑफिसचे निर्माण करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर पोस्ट ऑफिसमधील काम सुरु करण्यात आलंय.

३डी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरुन बनवलेले हे पोस्ट ऑफिस लार्सन अँड टूब्रो लिमिटेडने बनवलेलं आहे. आयआयटी मद्रासने यात तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन केले आहे. पोस्ट ऑफिस ४५ दिवसांमध्ये बनवून पूर्ण झालेले आहे. पारंपरिक पद्धतीने बनवले असते तर याला सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागला असता. त्यामुळे ३डी प्रिंटिंग तंत्रज्ञान पद्धत व्यवहार्य असल्याचं म्हटलं जातं.

 

उद्घाटनावेळी वैष्णव म्हणाले की, 'पूर्वीच्या काळात ज्याला अशक्य समजलं जायचं, असं काही आपण करुन दाखवलं आहे. तंत्रज्ञानात आपण विकास करत आहोत. हीच आपली विशेषता आहे.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याविषयी एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी पोस्ट ऑफिसचा फोटो पोस्ट करत म्हटलंय की, भारताची नाविन्यता आणि प्रगती याचे हे निदर्शक आहे.

 

 

३डी प्रिंटिंग तंत्रज्ञान काय आहे?

३डी प्रिंटिंगला additive manufacturing प्रक्रियाही म्हटलं जातं. या पद्धतीत डिजिटल फाईलमधून थ्री डायमेन्शनल सॉलिड ऑबजेक्ट बनवला जातो. या पद्धतीत एकावर एक असा थर रचून ऑबजेक्ट बनवला जातो. यात छत, भींत रोबोटिक्स मशिनच्या साहाय्याने तयार केले जातात. यात कमीत कमी माणसाचा सहभाग असतो.

कॉम्प्युटरच्या सहाय्याने सर्व ऑपरेशन नियंत्रित केलं जातं. यात वेगामध्ये सर्व काही काम होतं. त्यामुळे २००० चौरस फूटाचं घर दहा दिवसांमध्ये तयार होऊ शकते. त्यामुळे ही एक नवीन पद्धत असून हळू हळू याचा वापर वाढणार आहे.