भारतात फाइव्ह जी स्मार्टफोन्समध्ये 'नाविक' सक्तीचे

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 7 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताची स्वतःची ‘नॅव्हिगेशन’ प्रणाली ‘नाविक’ २०१८ मध्ये कार्यान्वित झाली. अमेरिकेच्या ‘जीपीएस’ला म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमला पर्याय म्हणून नाविककडे पाहिले जाते. सध्या जगभरात नॅव्हिगेशन वापरासाठी ‘जीपीएस’ सर्वाधिक लोकप्रिय आहे.

मात्र, १ जानेवारी २०२५ पासून भारतात सर्व मोबाइल कंपन्यांना आपल्या डिव्हाइसमध्ये नाविकचा सपोर्ट देणे अनिवार्य असेल. तत्पूर्वी, ॲपलने नुकतेच लॉंच केलेल्या आयफोन १५ प्रो मॉडेलमध्ये नाविकचा सपोर्ट दिला आहे.

नाविक अर्थात ‘नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’ ही ‘इस्रो’ने तयार केलेली प्रणाली आहे. सध्या भारतात ऑटोमोबाइलमध्ये ‘नाविक’चा वापर होत आहे. त्याही पुढे जात आता ॲपलने आयफोनमध्ये नाविक सपोर्ट दिला आहे.

त्यामुळे भारतीय आयफोन वापरकर्त्यांना आपल्या मोबाइलमध्ये स्वदेशी नॅव्हिगेशन वापरणे शक्य होईल. आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स हे नाविकचा वापर होणारे ॲपलचे पहिलेच फोन आहेत.

नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती प्रसारण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘नाविक’ अनिवार्य करण्याबाबत भाष्य केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फाइव्ह जी स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना १ जानेवारी २०२५ पासून फोनमध्ये नाविक सपोर्ट देणे आवश्‍यक असेल.

तर, भारतात एल १ बँडवर चालणाऱ्या स्मार्टफोनला (जीपीएसचा वापर चालणारे) डिसेंबर २०२५ पर्यंत नाविक सपोर्ट देणे गरजेचे असेल. सध्या एमआय ११x, एमआय ११टी प्रो, वनप्लस २ टी आणि रिअलमी ९ प्रोमध्ये नाविक सपोर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना मेड इन इंडिया ‘नाविक’चा वापर करता येईल.

...तर डिव्हाइस महागणार!
काही रिपोर्टनुसार, नाविकसाठी आयफोनच्या हार्डवेअरमध्ये बदल करण्यात आल्याने भारतात आयफोनच्या किंमती वाढल्या आहेत. काही डिव्हाइस निर्मात्यांनीही नाविकचा सपोर्ट दिल्यानंतर डिव्हाइस महाग होतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

काय आहे नाविक?
नाविकला यापूर्वी इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम (आयआरएनएसएस) म्हणून ओळखले जात असे. नाविक या नॅव्हिगेशन प्रणालीसाठी अंतराळात सोडण्यात आलेल्या सात सॅटेलाईटचा आणि २४ तास सुरू असणाऱ्या ग्राउंड स्टेशनचा वापर होतो.

नाविक एसपीएस हे नागरी वापरासाठी असून आरएस हे धोरणात्मक वापरासाठी असेल. नाविकच्या कक्षेत भारत आणि भारतीय सीमेपासून १,५०० किलोमीटरपर्यंतचा प्रदेश येतो. श्रीलंका, पाकिस्तान, थायलँड, जपान हे देशही नाविकचा वापर करू शकतात.

कोणाकडे कोणती नॅव्हिगेशन प्रणाली?
अमेरिकेकडे ज्याप्रमाणे जीपीएस आहे. त्याप्रमाणे रशियाकडे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम (ग्लोनास), जपानकडे क्यूझेडएसएस, चीनकडे बायड्यू आणि युरोपकडे गॅलिलिओ ही नॅव्हिगेशन प्रणाली आहे.