आता शत्रूशी आयर्नमॅन प्रमाणे लढणार भारताचे जवान!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाठीवर जेटपॅक लावून हवेत उडणारे सुपरहीरो तुम्ही आतापर्यंत चित्रपटात पाहिले असतील. मात्र, आता भारताचे सैनिकही अशा प्रकारेच आपल्या शत्रूशी लढू शकणार आहेत. यासाठी आग्र्यामधील आर्मी एअरबोर्न ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रात्यक्षिक आणि चाचणी पार पडली.

इंडियन एअरोस्पेस डिफेन्स न्यूज (IADN) या एक्स (ट्विटर) हँडलवरुन या चाचणीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "आग्र्यामधील AATS येथे पॅरा एसएफ कमांडो हे नवीन जेटपॅक सूटची चाचणी घेत आहेत." अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. लष्कराने असे ४८ जेटपॅक्स मागवले आहेत.

सुपरहीरो कमांडो
या व्हिडिओमध्ये दिसतंय, की सैन्यातील जवान हे एक जेटपॅक सूट घालून हवेत उडत आहेत. हवेत उडणाऱ्या जवानाच्या पाठीवर आणि दोन्ही हातांमध्ये जेट इंजिन आहेत. हातातील इंजिन्समुळे त्याला हवेमध्ये वळण घेणं शक्य होत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल
लष्कराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्स (ट्विटर) वर या व्हिडिओला एक लाखांहून अधिक यूजर्सनी पाहिलं आहे. कित्येक यूजर्सनी ही एक गर्वाची बाब असल्याचं म्हटलं आहे. तर, अनेकांनी भारतीय सैन्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.