इस्रोने बनवलंय 'आयफोन-१५' मधील हे महत्त्वाचं फीचर

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 7 Months ago
आयफोन-१५
आयफोन-१५

 

अ‍ॅपलने आपला बहुप्रतिक्षित आयफोन-१५ हा फोन लाँच केला आहे. अ‍ॅपलने आयफोनचे चार मॉडेल्स लाँच केले आहेत. यामध्ये आयफोन प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स या हाय-एंड मॉडेल्सचाही समावेश आहे. अगदी दमदार असणाऱ्या या फोनमध्ये भरभरून फीचर्स देण्यात आले आहेत.

इस्रोचा मोलाचा वाटा
आयफोन-१५ सीरीजच्या फोनमधील स्पेसिफिकेशन्स पाहिले असता, त्यामध्ये प्रिसिजन ड्युअल फ्रीक्वेन्सी GPS असल्याचं दिसत आहे. यामध्ये GPS, GLONASS, QZSS, BeiDou, गॅलिलियो आणि NavIC याचा समावेश आहे. सोबतच डिजिटल कंपास वायफाय सेल्युलर आणि iBeacon मायक्रो लोकेशन यांचाही समावेश आहे. यातील NavIC ची निर्मिती इस्रोने केली आहे.

काय आहे नॅव्हिक?
NavIC ही पूर्णपणे स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीम आहे. सात उपग्रहांच्या मदतीने ही सिस्टीम संपूर्ण भारताचा भूभाग ट्रॅक करते. GPS ज्याप्रमाणे संपूर्ण जगाला ट्रॅक करतं, तसंच नॅव्हिक हे भारताला ट्रॅक करतं. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने हे मोठं पाऊल आहे.

परदेशी सॅटेलाईट सिस्टीमवर अवलंबून राहण्यापेक्षा, अधिक विश्वासार्ह अशी ही स्वदेशी सिस्टीम आहे. याचा वापर सार्वजनिक वाहन ट्रॅकिंगमध्ये, नैसर्गिक आपत्तीच्या माहितीसाठी तसंच समुद्रातील खलाशांच्या मदतीसाठी केला जातो आहे. भारत सरकारने मोबाईल कंपन्यांना ही प्रणाली अनिवार्य करण्याची सूचना दिली होती.

कसा आहे आयफोन-१५?
आयफोन-१५ सीरीजमधील चारही फोनमध्ये कंपनीने ४८ मेगापिक्सल कॅमेरा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यातील प्रो मॉडेल्समध्ये कॅमेऱ्याला ५X झूम दिलं आहे. या सीरीजमधील चारही मॉडेल्सना यूएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आलेला आहे. यामुळे टाईप-सी अँड्रॉईड चार्जरनेही आता आयफोन चार्ज करता येणार आहेत.