भारतात येण्यासाठी टेस्लाचं मोठं पाऊल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इलेक्ट्रिक कार बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी टेस्ला आता भारतात येण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी कंपनीने सर्वात आधी पुण्याची निवड केली आहे. शहरातील पंचशील बिझनेस पार्कमध्ये टेस्लाने पाच वर्षांसाठी ऑफिस स्पेस भाडेतत्त्वावर घेतला आहे. हे टेस्लाचं भारतातील पहिलं ऑफिस असणार आहे.


डेटा अ‍ॅनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्सने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. एक ऑक्टोबरपासून हे ऑफिस सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भारतात आपल्या गाड्यांची विक्री करण्याबाबत वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांसोबत चर्चा केली होती. या चर्चेनंतर आता टेस्लाने आपल्या ऑफिसची जागाच बुक करुन ठेवली आहे.


कुठे असणार ऑफिस?

विमाननगरमध्ये असणाऱ्या पंचशील बिझनेस पार्कमधील बी विंग इमारतीत हे ऑफिस असणार आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 5,580 स्क्वेअर फुट जागेत टेस्लाचं कार्यालय असणार आहे. यासाठी टेस्लाचा टेबलस्पेस टेक्नॉलॉजीस कंपनीशी करार झाला आहे.


किती असणार भाडं?

या ऑफिससाठी दरमहा 11.65 लाख रुपये मासिक भाडं असणार आहे. तर, लॉक-इन कालावधी 36 महिन्यांचा असणार आहे. टेस्ला या कंपनीकडे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 34.95 लाख रुपये जमा करेल. ऑफिसच्या रेंटमध्ये दरवर्षी 5 टक्के वाढ करण्याबाबत दोन्ही कंपन्यांनी सहमती दर्शवली आहे.


भारतात निर्मितीही करणार

टेस्ला गाड्यांची भारतात निर्मिती करण्याबाबत देखील टेस्लाचा विचार सुरू आहे. यापूर्वी टेस्लाने यासाठी तयारी दर्शवली नव्हती. मात्र, अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इलॉन मस्क यांच्या भेटीनंतर कंपनीने आपला विचार बदलला असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे सरकारची परवानगी मिळाल्यास टेस्ला भविष्यात भारतातच आपल्या गाड्यांची निर्मिती करेल. यामुळे टेस्ला कार्स भारतीयांसाठी स्वस्तात उपलब्ध होऊ शकतील.