व्हॉट्सअॅप हे जगभरातील सर्वात लोकप्रिय असं मेसेंजिंग अॅप आहे. कोट्यवधी लोक याचा वापर टेक्स्ट आणि ऑडिओ मेसेज पाठवण्यासाठी करतात. मात्र, आता आपल्या यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपने नवीन फीचर लाँच केलं आहे. आता व्हॉट्सअॅपवरून व्हिडिओ मेसेजही पाठवता येणार आहेत.
व्हॉट्सअॅपने गुरुवारी याबाबत घोषणा केली. या फीचरची चाचणी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. अखेर हे फीचर आता सर्व यूजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे.
कसं काम करेल फीचर?
या फीचरच्या माध्यमातून यूजर्स आता एकमेकांना व्हॉट्सअॅपवरुन ६० सेकंदांचे व्हिडिओ मेसेज पाठवू शकणार आहेत. ज्याप्रमाणे ऑडिओ मेसेज रेकॉर्ड करून पाठवता येतो त्याप्रमाणेच हा व्हिडिओ मेसेज पाठवता येईल. यासाठी व्हिडिओ मेसेजचा वेगळा आयकॉन उपलब्ध करेल.
असा करा वापर
हे फीचर वापरण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला व्हॉट्सअॅप अपडेट करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर चॅट उघडून खाली येणाऱ्या ऑडिओ मेसेज आयकॉनवर एकदा टॅप करा. यावर लाँग प्रेस केल्यानंतर ऑडिओ मेसेज रेकॉर्ड होतो, मात्र आता एकदाच टॅप केल्यानंतर व्हिडिओ मेसेजचा आयकॉन समोर येईल.
यानंतर तुम्हाला ऑडिओ मेसेज प्रमाणेच, आयकॉनवर लाँग प्रेस करून तुम्ही व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करू शकाल. आयकॉन सोडल्यानंतर तुम्ही रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सेंड होईल. जर तुम्हाला लाँग प्रेस न करता व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल, तर तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगचा आयकॉन वरच्या दिशेने स्वाईप करूनही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.
ज्याला तुम्ही व्हिडिओ पाठवला आहे, त्या व्यक्तीने मेसेज प्ले केल्यानंतर म्यूटवर हा व्हिडिओ प्ले होईल. व्हिडिओ सुरू असताना स्क्रीनवर टॅप केल्यास साउंड ऑन होईल. व्हॉट्सअॅपच्या इतर मेसेजप्रमाणेच यालाही एंड-टू-एंड इन्क्रिप्शनची सुविधा मिळणार आहे.