चिनी वैज्ञानिकांनी शोधले आठ नवे विषाणू

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 6 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

कोरोना महामारीनंतर जग आता कुठे सावरत आहे. त्यातच चीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चीनमधील वैज्ञानिकांनी आठ नव्या विषाणूंचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे हे अगदी नव्या प्रकारचे विषाणू आहेत. तसंच, या विषाणूंचा माणसांना देखील संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चीनच्या दक्षिण समुद्र किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या हैनान नावाच्या एका बेटावर हे संशोधन पार पडले. या आठपैकी एक विषाणू कोविड 19 महामारीसाठी जबाबदार ठरलेल्या SARS-CoV-2 या विषाणूशी मिळता-जुळता आहे. बाकी विषाणूंच्या फॅमिली अगदी नवीन असल्याचं सांगण्यात येत आहे.

भविष्यात येणाऱ्या महामारींना तोंड देण्यासाठी म्हणून हे संशोधन करण्यात आले. यासाठी हैनान बेटावरील उंदरांचे सुमारे 700 नमुने गोळा करण्यात आले. यातून हे आठ नवे विषाणू समोर आले आहेत. व्हायरोलॉजिका सिनिका या नियतकालिकामध्ये या रिसर्चबद्दल रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या नियतकालिकाच्या संपादक डॉ. शी झेंगली आहेत. त्या चीनमधील अग्रगण्य व्हायरोलॉजिस्ट आहेत. कोरोना विषाणूवरील त्यांच्या संशोधनासाठी त्यांना 'बॅटवुमन' या नावाने देखील ओळखलं जातं. या विषाणूंचा मानवांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो, आणि त्यांचा संसर्ग कसा रोखता येईल याबाबत आता अधिक संशोधन करण्यात येणार आहे.