आरोग्यासाठी फायदेशीर सब्जा

Story by  पुणे | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
सब्जा
सब्जा

 

उन्हाच्या चटक्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे विविध पेये किंवा सरबतांचं प्राशन केलं जातं. यामध्ये लिंबू सरबत, कोकम, गुलाब सरबतामध्ये सब्जा टाकून त्याचं प्राशन केलं जातं. खरं तर सब्जा या शरीरासाठी थंड असल्याने या उन्हाळ्यामध्ये विविध सरबत टाकून या बियांचं प्राशन केलं जातं. शरीर थंड ठेवण्यासोबतच सब्जाचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळेच केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर तुम्ही इतर वेळीही या वियांचं सेवन करू शकता. सब्जाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, मॅग्नेशिअम, आयर्न तसेच फॉलिक अॅसिड्स असतात. तसेच या बियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अॅण्टिऑक्सिडंट्स आणि गूड कार्ब्स असतात. अनेक पोषक तत्त्वे असल्यामुळे सब्जाच्या बियांच्या सेवनामुळे आरोग्याच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते.

वजन कमी होण्यास मदत
■ वाढत्या वजनामुळे तुम्ही त्रस्त आहात आणि डाएट करणंदेखील तुम्हाला कठीण जात असेल किंवा सतत भूक लागत असल्याने वजन नियंत्रणात ठेवणं कठीण होत असेल, तर तुम्ही सव्जाचं सेवन केल्यास वजन कमी करण्यासाठी मदत होते.

■ यासाठी रात्री दोन चमचे सब्जा पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू, मध आणि भिजलेले सब्जा टाकून सकाळी हे पाणी प्या. आठवड्यातून केवळ २-३ वेळा या सब्जाचं पाणी पिल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
■  सब्जाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन तसेच जीवनसत्त्व आणि खनिज असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या बियांच्या सेवनामुळे सर्दी-पडसे अशा संसर्गापासून दूर राहण्यास मदत होते.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त
■ सब्जामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, आयर्नसारखी पोषक तत्त्वे आढळतात. त्यामुळे त्वचा आणि केसांचं आरोग्य चांगलं राहण्यात मदत होते. यासाठी तुम्ही सब्जाच्या सेवनासोबतच सब्जाच्या बिया भिजवून त्याची पेस्ट तयार करून फेसपॅक किंवा हेअरपॅक म्हणूनही वापर करू शकता. यामुळे त्वचा आणि केस चमकदार होण्यास मदत होईल.

शरीराला मिळेल कॅल्शिअ
■  सब्जाच्या सेवनामुळे शरीराला पुरेसं कॅल्शिअम मिळतं. शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी दिवसभरात १ चमचा सब्जाचं सेवन करणं उपयुक्त ठरतं. यामुळे हाडं आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते. सब्जाच्या वियांचं सेवन तुम्ही सरबत, स्मूदी, दूध किंवा सूप आणि स्वीट डीशमध्ये टाकून करू शकता. अशा प्रकारे केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर कधीही सब्जाचं सेवन करणं आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतं.