कफ सिरप : केंद्र सरकार राज्यांना दिले कडक निर्देश!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे दूषित कफ सिरपमुळे काही मुलांचा मृत्यू झाल्याच्या संशयानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालय ॲक्शन मोडमध्ये आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत औषध कंपन्यांना गुणवत्ता नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि विशेषतः मुलांसाठी कफ सिरपचा अनावश्यक वापर टाळण्याचे कडक निर्देश देण्यात आले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. जे.पी. नड्डा यांनी राज्यांसोबत चर्चा करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

काय आहे छिंदवाडा प्रकरण?

छिंदवाडा जिल्ह्यातील एका ब्लॉकमध्ये काही मुलांचा गूढ आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर केंद्र सरकारने तज्ज्ञांची एक टीम तपासासाठी पाठवली. तपासात असे दिसून आले की, मुलांनी सेवन केलेल्या १९ औषधांपैकी 'कोलड्रिफ' (Coldrif) नावाच्या कफ सिरपमध्ये 'डायथिलीन ग्लायकोल' (DEG) या विषारी रसायनाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त होते.

यानंतर, तामिळनाडूतील कांचीपुरम येथे असलेल्या या औषध कंपनीवर नियामक कारवाई सुरू करण्यात आली आहे. कंपनीचा उत्पादन परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात आली असून, फौजदारी कारवाईलाही सुरुवात झाली आहे.

बैठकीत दिलेले महत्त्वाचे निर्देश:

  1. औषध कंपन्यांसाठी: सर्व औषध उत्पादकांनी सुधारित 'शेड्युल एम' (Revised Schedule M) चे काटेकोरपणे पालन करावे. जे युनिट्स नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्य सचिवांनी ठणकावून सांगितले.

  2. मुलांसाठी कफ सिरपचा वापर टाळा: आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल आणि आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुनिता शर्मा यांनी स्पष्ट केले की, मुलांमध्ये बहुतेक खोकला हा आपोआप बरा होतो आणि त्यासाठी औषधांची गरज नसते. कफ सिरपचे फायदे कमी आणि धोके जास्त आहेत. त्यामुळे मुलांसाठी कफ सिरप किंवा कोणत्याही औषधांचे मिश्रण लिहून देऊ नये, असे आवाहन डॉक्टरांना करण्यात आले आहे. लवकरच पालक, फार्मासिस्ट आणि डॉक्टरांसाठी यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत.

  3. राज्यांसाठी सूचना: सर्व राज्यांना आरोग्यविषयक देखरेख वाढवण्याचे, सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमधून वेळेवर माहिती देण्याचे आणि आंतरराज्य समन्वय मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल.

या बैठकीत राजस्थान आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या राज्यात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.