गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधीची लस सध्या बाजारात दाखल झाली आहे. पुरेसे उत्पादन झाल्यास पुढील सहा महिन्यांत तिचा सार्वत्रिक लसीकरणास समावेश होईल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांनी दिली. कर्करोगाच्या लशीची उत्पादन क्षमता वाढवून एक कोटी पर्यंत नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित एका परिषदेनंतर त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. कर्करोगाच्या लशीच्या उत्पादनासंदर्भात त्यांनी माहिती दिली. डॉ. पूनावाला म्हणाले, ‘‘कर्करोगाच्या लसीचे उत्पादन वाढविण्यावर आमचा भर आहे. सरकारला अपेक्षित असलेल्या मात्रांपर्यंत उत्पादन झाल्यास तातडीने सार्वत्रिक लसीकरणात ही लस उपलब्ध होईल.
सध्या ५० लाख मात्रांपर्यंत असलेले उत्पादन पुढील सहा महिन्यात एक कोटी पर्यंत जाईल.’ सध्या खाजगीमध्ये उपलब्ध असलेली कर्करोगाची लस तुलनेने महाग असून, उत्पादन वाढल्यानंतर तिची किंमत कमी होईल, अशी माहिती डॉ. पूनावाला यांनी दिली.
कर्करोगाची लस...
- ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) प्रकारातील कार्वाव्हॅक नावाची लस
- महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधात्मक लस
- आंतरराष्ट्रीय स्तरावर नऊ ते २६ वर्षाच्या वयोगटातील महिलांना ही लस दिली जाते
- भारतात नऊ ते १४ वर्षाच्या मुलींना लस देण्यासाठी परवानगी
- महिलांबरोबरच पुरुषांसाठीही कर्करोगाची लस उपयोगी
गर्भाशयाचा कर्करोग...
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्तन, फुफ्फुस आणि कोलोरेक्टल कर्करोगानंतर स्त्रियांमध्ये चौथा सर्वात जास्त आढळणारा कर्करोग आहे. जगातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू भारतात होतात. दरवर्षी जगभरात अंदाजे एक लाख २५ हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान होते. भारतात आजवर ७५ हजार पेक्षा जास्त महिलांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
भारतातील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग -
२०१५ - ६५,९७८
२०१७ - ७५,२०९
२०२५ (अंदाजे) - ८५,२४१
(स्त्रोत - जागतिक आरोग्य संघटनेचा २०२२ चा अहवाल)
कोरोनाची लस कोणी घेतच नाही -
दरवर्षी करोनाचे नवनवीन व्हेरिएंट दाखल होत आहे. त्यांच्यावर प्रभावी ठरेल असी लस सिरमने विकसित केली आहे. मात्र, आजाराची तीव्रता कमी झाल्याने कोणी लसच घेत नाही, अशी माहिती डॉ. सायरस पूनावाला यांनी दिली. सिरमकडे मोठ्या प्रमाणावर कोरोना लशीच्या मात्र पडून असल्याचेही त्यांनी सांगितले.