देशात समान नागरी कायदा लागू करणारच - गृहमंत्री शहा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 11 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

गुणा

‘‘काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम वैयक्तिक कायदा पुन्हा आणण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र भाजपचे आश्‍वासन आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे की देशात समान नागरी कायदा आणण्यात येईल,’’ असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गुणा येथील उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

‘‘देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे तर देशाच्या साधनसंपत्तीवर गरीब, दलित इतर मागासवर्गीय आणि आदिवासींचा पहिला अधिकार असल्याचे भाजपचे मत आहे,’’ असे शहा म्हणाले. काँग्रेसला तिहेरी तलाक पुन्हा आणायचा असल्याचा आरोपही शहा यांनी यावेळी केला. ‘‘काँग्रेसला देश शरिया कायद्यानुसार चालवायचा आहे का? असा सवालही शहा यांनी यावेळी उपस्थित केला. ‘‘ राहुल यांनी लांगूलचालनाचा कितीही प्रयत्न केला तरीही जोवर भाजप आहे तोपर्यंत अशा पद्धतीने कोणतेही वैयक्तिक धार्मिक कायदे देशात लागू करू देणार नाही, हा देश समान नागरी कायदा आणि राज्यघटनेनुसारच चालेल,’’ असे प्रतिपादन शहा यांनी केले.

‘‘३७० रद्द केल्यास रक्तपात होईल अशी भीती घालण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला होता, मात्र रक्तपात सोडाच पण मागील पाच वर्षांत काश्‍मीरमध्ये साधा एक दगडही फेकण्यात आलेला नाही’’ असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.