भारतीय व्यक्तीमुळे पाकिस्तानी तरुणीला मिळाले 'हृदय'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 10 d ago
डॉक्टर समवेत आयशा रशन
डॉक्टर समवेत आयशा रशन

 

पाकिस्तानातील १९ वर्षीय आयशा रशन नावाची मुलगी पाच वर्षांपासून हृदयविकाराने त्रस्त होती. तिचे हृदय ट्रांसप्लांट करण्यासाठी डॉक्टर हृदयदाता शोधत होते. हा शोध ३१ जानेवारीला पूर्ण झाला. तिचे हृदय ट्रांसप्लांट करण्यात आले आणि आता ती निरोगी आहे. या हृदय ट्रांसप्लांटची खास गोष्ट म्हणजे हे भारतात झाले आहे.

एवढेच नाही तर आयशाला समर्पित केलेले हृदयही भारतीयाचे आहे. आयशाला पाकिस्तानातून चेन्नई, तामिळनाडू येथे आणण्यात आले. येथे एमजीएम हेल्थकेअरच्या डॉक्टरांनी दिल्लीतील रुग्णालयातून आणलेल्या ६९ वर्षीय ब्रेन-डेड रुग्णाचे हृदय ट्रांसप्लांट केले. एवढेच नाही तर पाकिस्तानी तरूणीची ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

२०१९ मध्ये हृदयविकाराचे निदान झाले
आयशा हृदयविकाराने त्रस्त असल्यामुळे २०१९ मध्ये पहिल्यांदा भारतात आली होती. त्यावेळी अड्यार येथील मलार रुग्णालयातील वरिष्ठ हृदय शल्यचिकित्सक डॉ.के.आर. बालकृष्णन यांनी हृदय ट्रांसप्लांट करण्याचा सल्ला दिला होता. तिला राज्य अवयव नोंदणीमध्ये प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले होते.

गेल्या वर्षी तब्येत बिघडली
२०२३ मध्ये आयशाच्या हृदयाची उजवी बाजू खराब होऊ लागली. तिच्या हृदयाने काम करणे बंद केल्यानंतर तिला संसर्गही झाला. आयशाची आई सनोबर राशन म्हणाली, 'तिच्या मुलीला असा त्रास होताना पाहून खूप वाईट वाटत आहे. आम्ही सर्जनशी संपर्क साधला. आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला शस्त्रक्रिया परवडत नाही, परंतु त्यांनी आम्हाला भारतात येण्यास सांगितले.

३१ जानेवारीला डोनर मिळाला
सप्टेंबर २०२३ मध्ये, डॉ. बालकृष्णन यांच्या टीमने त्यांना सांगितले की हृदय ट्रांसप्लांट हा एकमेव पर्याय आहे. अनेकवेळा हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर सनौबरला ३१ जानेवारीला हॉस्पिटलमधून फोन आला. हृदय आणि फुफ्फुस ट्रांसप्लांट आणि मेकॅनिकल सर्कुलेटरी सपोर्ट संस्थेचे सह-संचालक डॉ. केजी सुरेश राव म्हणाले की, संपूर्ण देशात कोणतेही संभाव्य प्राप्तकर्ते नसतानाच परदेशी लोकांना हृदयाचे वाटप केले जाते. या रुग्णाचे हृदय ६९ वर्षांच्या व्यक्तीचे असल्याने अनेक सर्जनला संकोच वाटत होता.

ट्रांसप्लांट एकच पर्याय
डॉ केजी सुरेश म्हणाले की, दात्याच्या हृदयाची स्थिती चांगली असल्यामुळे आणि काही प्रमाणात आयशासाठी ही एकमेव संधी असल्यामुळे आम्ही धोका पत्करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली आणि काही दिवसांनी आयशाला लाइफ सपोर्ट काढून घेण्यात आला

१७ एप्रिल रोजी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
या शस्त्रक्रियेसाठी आयशाला एक रुपयाही खर्च आला नाही. स्वयंसेवी संस्था ऐश्वर्या ट्रस्ट, माजी रुग्ण आणि डॉक्टर यांच्याकडून निधी गोळा करण्यात आला. १७ एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी आयशाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाचे बिल भरले. हृदय प्रत्यारोपणासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
आयशाची प्रतिक्रिया 
या प्रत्यारोपणानंतर एएनआयशी बोलताना आयशाने सांगितले, "या प्रत्यारोपणामुळे मी खूप खुश आहे, यासाठी भारत सरकारचे मी आभार मानते. एक दिवस मी नक्की भारतात परत येईन. उपचारासाठी मी डॉक्टरांचेही आभार मानते." 
 
आयेशाची आई, सनोबेर यांनीही त्यांचा अनुभव सांगितला. डॉ. बालकृष्णनसह चेन्नई येथील वैद्यकीय पथकाने यशस्वी प्रत्यारोपण करून आपल्या मुलीची जीवनरेखा वाढवल्याबद्दल भारत सरकारचे आभार प्रकट केले.