‘पिलाटिस्’ या व्यायामप्रकारामुळे होतो शरीराचा सर्वांगीण विकास - यास्मिन कराचीवाला

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 5 Months ago
फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला
फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला

 

तुम्हाला फिटनेसच्या क्षेत्राकडे येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
- मी कॉलेजमध्ये असतानाची घटना आहे. माझ्या एका मैत्रिणीचे एका मुलावर प्रेम होते. त्याच्यावर प्रभाव पडण्यासाठी तिला सुडौल शरीर हवे होते. ती व्यायामासाठी जिममध्ये जायला लागली. सोबत मलाही घेऊन गेली.

तिथे गेल्यावर मला व्यायामाचा नृत्यप्रकार करायला लावतील, असे वाटले. मला व्यायामाबाबत कोणतीही माहिती नसल्याने सर्वजण माझ्याकडे पाहून हसले. मला खूप वाईट वाटले. त्यावेळी मी व्यायाम शिकण्याचा निर्धार केला व त्यादृष्टिने मी प्रयत्न सुरू केले.

मला प्रशिक्षकाकडून मारही खावा लागला. त्यानंतर तिने एके दिवशी मला घरी फोन करून सांगितले, ‘‘तुला आज जिममध्ये इतरांकडून व्यायाम करून घ्यायचा आहे.’’ मी म्हणाले, ‘‘ते कसे शक्य आहे, मला काहीच येत नाही.’’

मात्र, तिने मला त्यादिवशी क्लास घ्यायलाच लावला. मी प्रशिक्षक घेते त्याच पद्धतीने व क्रमानुसार इतरांकडून व्यायाम करून घेतला. आपण हे कसे शिकलो, याचे मला आश्‍चर्य वाटले. दरम्यान, क्लासमधील सदस्यांनी प्रशिक्षकाकडे मी घेतलेल्या व्यायामप्रकारांचे कौतुक केले. तिने मला सायंकाळची बॅच घेण्याची विनंती केली.

काही काळानंतर मला अमेरिकेत जायचे होते. त्यावेळी त्या प्रशिक्षकाने मला ‘तू सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर का होत नाही,’ अशी विचारणा केली. त्याचा मी गांभीर्याने विचार केला. अमेरिकेत मी पूर्ण शिक्षण घेतले आणि भारतात परतल्यावर फिटनेसचे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.

आपण ‘पिलाटिस्’मध्ये खास प्रशिक्षण देता. हे नक्की काय आहे?
- मी लोकांना फिटनेसचे प्रशिक्षण देत होते व त्यांना आनंद आणि समाधान मिळत होते. ही गोष्ट मला नवीन शिकायला प्रेरणा देणारी ठरली. मी सुरुवातीला सर्वांनाच प्रशिक्षण देत होते, मात्र नंतर पर्सनल ट्रेनर म्हणून काम सुरू केले.

साधारण सोळा वर्षांपूर्वी मला ‘पिलाटिस्’बद्दल समजले. त्याचा अभ्यास करण्यामागचे कारण, मूल झाल्यानंतर माझ्या पोटाजवळची चरबी (स्टमक फॅट) वाढली होती. त्यावरील उपाययोजनांसाठी ऑनलाइन संशोधन केल्यावर ‘पिलाटिस्’बद्दल माहिती मिळाली. ते उपयुक्त असल्याचे लक्षात आल्याने अमेरिकेत जाऊन अभ्यास केला. अमेरिकेतून भारतात आल्यावर यावरच काम करण्याचे निश्चित केले.

पिलाटिस् नक्की काय आहे?
- स्टेच आणि स्ट्रेंथसाठी हा उत्तम वॉर्मअप व्यायामप्रकार आहे. हा योगासनाचाच एक प्रकार आहे. त्यातून शारीरिक समतोल साधण्याबरोबर, श्‍वासावर नियंत्रण आणण्यासह शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी महत्त्वाचा आहे.

या व्यायामप्रकारामुळे शरीराचा सर्वांगीण विकास होतो. अनेक सेलिब्रिटी हा व्यायामप्रकार करतात. अलिया भटने बाळंतपणानंतर ‘पिलाटिस्’चा सराव केला. त्याचा तिला खूप फायदा झाला. याशिवाय कॅटरिना कैफलाही चांगले परिणाम जाणवले. मात्र, माझ्याकडे सामान्य नागरिक आणि सेलिब्रिटी असा फरक नाही.
 
शारीरिकबरोबर मानसिक स्वास्थ्यही खूप आवश्यक आहे. मी प्रामुख्याने पिलाटिस‍ या विशिष्ट उपकरणे वापरून शारीरिक व मानसिक क्षमता वाढविणाऱ्या व्यायामाबद्दल सांगत असते. स्वास्थ्याबाबत जागरूक असलेल्यांकडून व्यायामप्रकार करून घेण्यात मानसिक समाधान मिळते.

लोकांना व्यायाम करायचा असतो, मात्र वेळेचे कारण दिले जाते. त्याबाबत काय सांगाल?
- इच्छा असल्यास वेळेचे कारण पुढे येतच नाही. मी नुकतेच दहा मिनिटांत कोठेही सहजतेने करता येणाऱ्या व्यायाम प्रकारांवर लिहिले आहे. हे व्यायामप्रकार घरी, कार्यालयात कोणीही करू शकतो.

व्यायामाचा मानसिक स्वास्थ्यावर काय परिणाम होतो?
- मानसिक स्वास्थ्यासाठी व्यायाम आवश्यकच आहे. तुम्ही योगासने किंवा अन्य कोणताही व्यायाम करत असता, तेव्हा शरीरावर आणि पर्यायाने मनावर चांगला परिणाम होतो. व्यायामाच्या बाबतीत मी खूपच सजग आहे. कायम नवीन वाचत, पाहत असते. नवीन गोष्टी शिकण्याचा माझा कायम प्रयत्न असतो. या क्षेत्रात नवीन आलेल्या गोष्टींबद्दल मी माझ्याकडे फिटनेससाठी येणाऱ्यांना सांगत असते.
 
शब्दांकन:आशिष तागडे (साभार : दै. सकाळ)