मुंबापुरीची हवा बिघडली; जगात दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
mumbai
mumbai

 

मुंबई : मुंबईतील वाढते प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोचले असून जगभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानावर पोचली आहे. मुंबईने वाढत्या प्रदूषणाच्या यादीत दिल्लीलाही मागे टाकले आहे. स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स ‘आयक्यू एअर’ने २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान जगातील सर्वात प्रदूषित शहरांची यादी प्रसिद्ध केली. या यादीत ही धक्कादायक माहिती समोर आलीआहे.पाकिस्तानातील लाहोर आणि अफगाणिस्तानातील काबूलचा प्रदूषित शहरात समावेश आहे.


जगभरातील महत्त्वाच्या शहरांतील प्रदूषणाची स्थिती नोंदवण्यासाठी २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान निरीक्षणे नोंदवण्यात आली. सर्व्हेच्या पहिल्याच दिवशी २९ जानेवारी रोजी सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दहाव्या स्थानावर होती; मात्र, ८ फेब्रुवारी रोजी मुंबई दुसऱ्या स्थानावर पोचली. १३ फेब्रुवारी रोजी प्रदूषणाबाबत मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीलाही मागे टाकल्याचे स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्सच्या अहवालात समोर आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील माहितीनुसार आयक्यू एअर, यूएनईपी आणि ग्रीनपीस यांनी मुंबईतील हवेची गुणवत्ता मोजली. तसेच, त्याचे यूएस हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार ‘निरोगी’, ‘अनारोग्य’ आणि ‘धोकादायक’ असे वर्गीकरण केले. यानुसार, गेल्या तीन वर्षांच्या हिवाळ्याच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान मुंबईतील हवा ‘खराब’ आणि ‘खूप खराब’ असल्याचेही अहवालात नोंदवण्यात आले आहे.

 

वाढत्या प्रदूषणाची कारणे

तज्ज्ञांच्या मते मोटार, रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांमधून सतत उडणारी धूळ आणि धूर यामुळे हवेची गुणवत्ता ढासळत आहे. याव्यतिरिक्त, अरबी समुद्रातील ‘ला निना’ प्रभावाने पश्चिम किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग कमी केला आहे, ज्यामुळे प्रदूषण पसरण्यास मदत झाली आहे. निरी आणि आयआयटीबीच्या २०२०च्या अभ्यासानुसार, मुंबईच्या हवेतील कणांच्या भारांपैकी ७१ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा रस्ते किंवा बांधकामांचा आहे. उर्वरित प्रदूषण औद्योगिक आणि ऊर्जा युनिट्स, विमानतळ आणि कचरा क्षेपणभूमीमधून होते.


सर्वात प्रदूषित शहरे

  • लाहोर (पाकिस्तान)
  • मुंबई (भारत)
  • काबूल (अफगाणिस्तान)