आतिर खान
वाहाबी-प्रेरित दहशतवादी नेटवर्क जगभरात—विशेषतः सौदी अरेबियासारख्या त्यांच्या मूळ केंद्रांमध्ये उद्ध्वस्त झाले असताना, पाकिस्तानात तीन कुख्यात दहशतवादी केंद्रे उघडपणे कार्यरत होती: बहावलपूर, मुरिदके आणि सियालकोट. ही ठिकाणे बराच काळ दहशतवादी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखली जात होती. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही ठिकाणे वैध लक्ष्ये बनली.
भारताची ठाम आणि अचूक कारवाई
भारताची प्रतिक्रिया जलद, अचूक आणि सुसंगत धोरणात्मक तत्त्वांवर आधारित होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली ही रणनीती तीन मुख्य तत्त्वांवर आधारित आहे: भारतीय भूमीवरील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला तातडीने आणि ठाम प्रत्युत्तर, अण्वस्त्र ब्लॅकमेलिंगला थारा न देणे आणि दहशतवादी व त्यांच्या समर्थकांवरसीमेपलीकडे जाऊनहीअचूक हल्ले करणे.
राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले, "हा काळ युद्धाचा नाही, पण हा काळ दहशतवादाचाही नाही." त्यांनी पुढे नमूद केले, "पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही." या विधानातून भारताच्या सीमेपलीकडील धोक्यांविरुद्धच्या नव्या दृष्टिकोनाचा संदेश स्पष्ट होतो.
वैध लक्ष्ये आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा
भारताने बहावलपूर, मुरिदके आणि सियालकोट येथे हल्ले करण्याचा निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पटणारा ठरला. दहशतवादाचा सामना करणाऱ्या देशांना भारताची ही कारवाई समजण्यायोग्य आणि न्याय्य वाटली. हा दृष्टिकोन इराणने पाकिस्तानातील दहशतवादी धोक्यांविरुद्ध केलेल्या कारवाईसारखा होता. सौदी अरेबियाने हौथींविरुद्ध केलेल्या हल्ल्यांप्रमाणे आणि अमेरिकेने पाकिस्तानात ओसामा बिन लादेनला ठार मारण्याच्या कारवाईसारखा होता.
पाकिस्तानच्या मुख्य भूभागात खोलवर घुसून आणि दीर्घकाळ संरक्षित असलेल्या दहशतवादी केंद्रांवर हल्ले करून भारताने त्यांचा अभेद्यतेचा भ्रम नष्ट केला. या कारवाईत राजकीय आणि धोरणात्मक नेतृत्व महत्त्वाचे ठरले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ही योजना आखली, तर पंतप्रधान मोदी यांनी तिच्या अंमलबजावणीस मंजुरी दिली. या लक्ष्यांना त्यांनी "जागतिक दहशतवादाची विद्यापीठे" संबोधले.
धोरणात्मक चकवा आणि अचूक हल्ले
पाकिस्तानला सीमेवर पारंपरिक लष्करी चकमकींची अपेक्षा होती. पण भारताने धोरणात्मक चकवा देत त्यांना अनपेक्षित धक्का दिला. 6 मे च्या रात्री भारताने अचूक हल्ले करून 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले. हे हल्ले नागरी किंवा सामान्य लष्करी पायाभूत सुविधांवर नव्हते. त्यामुळे अनावश्यक तणाव वाढला नाहीतर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी ठिकाणे म्हणून ओळखल्या गेलेल्या ठिकाणांपुरते मर्यादित होते. यापैकी अनेक ठिकाणांचा उल्लेख संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अहवालांत आहे.
दहशतवादी ठिकाणांची पार्श्वभूमी
बहावलपूर, मुरिदके आणि सियालकोट ही ठिकाणे लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या गटांशी जोडली गेली आहेत. या सर्व गटांवर संयुक्त राष्ट्राच्या ठरावांद्वारे बंदी आहे. मुरिदके संकुल हे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे. त्याचा संबंध ओसामा बिन लादेन आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यांशी जोडला गेला आहे. 82 एकरांवर पसरलेल्या या संकुलात मदरसा, निवासस्थाने, व्यावसायिक क्षेत्र, प्रशिक्षण मैदाने आणि मासेपालन केंद्र आहे—ज्याचा उपयोग कट्टरपंथीकरण आणि लष्करी प्रशिक्षणासाठी केला जात असल्याचा आरोप आहे.
अनेक तपास आणि चार्जशीटमधून भारतीय भूमीवरील दहशतवादी हल्ल्यांचा उगम या ठिकाणांशी जोडला गेला आहे. यामुळे त्यांची सीमेपलीकडील दहशतवादाला प्रोत्साहन देणारी भूमिका स्पष्ट झाली.
भारताची कारवाई आणि जागतिक उदाहरण
भारताची ही कारवाई आत्मसंरक्षणाचा आणि जागतिक उदाहरणाचा भाग होती. यातून हे दिसते की जेव्हा यजमान राष्ट्र कारवाई करत नाही, तेव्हा एका सार्वभौम राष्ट्राला दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा अधिकारच नाही तर जबाबदारी आहे.
प्रत्युत्तरात पाकिस्तानने तणाव वाढवला. त्यांनी श्रीनगर ते भुजपर्यंत शाळा, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करून ड्रोन हल्ले केले. यामुळे भारताने आपली कारवाई तीन टप्प्यांत तीव्र केली: दहशतवादी तळांचा नाश, लाहोरसारख्या शहरी केंद्रांवर हल्ले आणि धोरणात्मक हवाई तळ नष्ट करणे. याचा पाकिस्तानवर मानसिक आणि लष्करी परिणाम मोठा झाला.
संयम आणि युद्धविराम
तणाव वाढूनही भारताने संयम दाखवला. परिस्थिती दीर्घकाळ चिघळली नाही. शेवटी युद्धविराम पुन्हा प्रस्थापित झाला. भारताने आपली प्रमुख धोरणात्मक उद्दिष्टे साध्य केली. भारताकडे अजूनही महत्त्वाचे राजनैतिक हत्यार आहेत. जसे की सिंधू जल करार आणि आंतरराष्ट्रीय हवाई करार ज्यांचा वापर इस्लामाबादवर दबाव टिकवण्यासाठी होऊ शकतो.
भारताची परिपक्व रणनीती
ही कारवाई परिपक्व आणि संयमित राष्ट्रीय सुरक्षा धोरण दर्शवते. वैध धोक्यांविरुद्ध ठाम कारवाईला प्राधान्य देताना राजनैतिक विश्वासार्हता आणि आर्थिक स्थिरता राखली जाते. संदेश स्पष्ट आहे: दहशतवादाला ठाम प्रत्युत्तर मिळेल, पण भारत वैधता, अचूकता आणि धोरणात्मक स्पष्टतेसह कारवाई करेल.
( लेखक आवाज द व्हाईस या समूहाचे मुख्य संपादक आहेत.)