यामुळे साजरा केला जातो 'जागतिक एड्स दिन'

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 5 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जगभरात दरवर्षी १ डिसेंबरला ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जातो. एड्स हा एक गंभीर आजार आहे. हा एक संक्रमित आजार असून या आजारामुळे जगभरात आतापर्यंत लाखो रूग्णांनी जीव गमावला आहे.

ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) मुळे होणाऱ्या ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (AIDS) या गंभीर आजाराबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तींना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून साजरा केला जातो.

एड्स या आजारासंदर्भात सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे. आज ‘जागतिक एड्स दिन’ च्या निमित्ताने आपण या दिवसाचा इतिहास आणि महत्व जाणून घेणार आहोत.

जागतिक एड्स दिनाचा इतिहास काय ?
एचआयव्हीचा प्रसार हा सर्वात आधी प्राण्यांपासून झाला होता. १९ व्या शतकात आफ्रिकेतील माकडांच्या एका विशिष्ट प्रजातीमध्ये एड्सचा विषाणू पहिल्यांदा आढळून आला होता. हा रोग माकडांपासून माणसांमध्ये पसरला. आफ्रिकेमध्ये माकडे खाल्ली जात असत. त्यामुळे, हा रोग माकडांपासून माणसांमध्ये पसरल्याचे सांगितले जाते.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्वात आधी १ डिसेंबर १९८८ मध्ये जागतिक एड्स दिनाची स्थापना केली होती. स्थानिक आणि राष्ट्रीय अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरिकांमध्ये या आजाराच्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना या आजाराची माहिती मिळावी, यासाठी या दिनाची स्थापना केली होती.

त्याप्रमाणे १९८८ मध्ये पहिला एड्स दिन साजरा करण्यात आला. ज्यावेळी हा दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी, सुमारे ९० हजार ते १.५ लाख लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह होते, असे सांगितले जाते. त्यामुळे, वैद्यकीय जगतात खळबळ उडाली होती.

त्यामुळे, एड्सबद्दल किंवा एचआयव्हीबद्दल लोकांना शिक्षित आणि जागरूक करण्यासाठी जागतिक संस्थांना एकत्रित करून निधी देण्यावर भर देण्यात आला.

एड्स दिनाचे महत्व
मागील कित्येक वर्षांपासून जागतिक एड्स दिन हा साजरा केला जात आहे. हा एक गंभीर आजार आहे. अशा परिस्थितीमध्ये या आजाराबाबत सर्वांना जागरूक करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

जगभरातून या आजाराचे समूळ नष्ट करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. तसेच, या आजारामुळे होणारे मृत्यू रोखणे आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या पीडितांना योग्य उपचार देणे महत्वाचे आहे.